Thursday, 11 October 2012

बाबू मोशायबाबू मोशाय..... जहाँपनाह.. बादशाह... शहेनशाह... बादशहा खाँ.... विजय दिनानाथ चव्हान..... And on and on…. And on… सत्तरीच्या दशकात जगासमोर आलेला हा अँग्री यंग मॅन... अमिताभ हरिवंशराय बच्चन... आज सत्तरीचा झाला त्याला भावी आयुष्यात उदंड यश मिळो हीच कामना.. आज मी चाळीशी पार केल्यावर घर म्हणून विचार करतो त्यावेळी मला अमिताभ बच्चन. लता मंगेशकर सचिन तेंडूलकर हे आपल्याच घरातील सदस्य वाटतात. इतके आपण यांच्यात गुंतलो आहोत. त्यातल्या त्यात अमिताभ तर .. बोलायलाच नको.
                  त्याची पहिली भेट अर्थातच औरंगाबादच्या स्टेट सिनेमाच्या पडद्य़ावर झाली.. चित्रपट होता शोले... नंतर काळाच्या प्रवाहात वेगवेगळ्या संदर्भातून तो आपला होत गेला... संदर्भ तो यारानातील मैत्रीचा कधी होता तर कधी लक्षात रहाणा-या शराबीचा होता... महाविद्यालयीन काळात म्युझीकल फिशपाँड मध्ये एकदा एका सुंदर कन्येला.. १८ बरसकी तू होने को आयी रे... जतन कुछ करले.. चा देखील होता. आता चाळीशीत सारे आठवताना एक जाणवतं की आपण त्याला तंतोतंत फॅन म्हणून नाही तर आपल्या आयुष्याशी जोडत गेलो.. त्यात मग रेखा आणि अमिताभ यांचा .. जगताना हे सारं जाणवतं.
                     मला जे वाटतं ते असं की हा सिलसिला आवश्यक आहे. त्याच्या करिअरला ते वळण अतिशय गरजेचं होतं. त्याला अमिताभ बनविण्यासाठी ती होती. आयुष्यात प्रत्येकाला आपल्यातला हिरो बाहेर काढण्यासाठी प्रेरणा गरजेची असते आणि ती त्याची प्रेरणा होती. कान्हा कुणाचा तर तो राधेचा.. असं काही तरी हे गणित आहे. सार हाच की त्याच्या कारकिर्दीला अनोखं वळण देणारी ती होती. नाही म्हणायला अमिताभने जयासोबतही सिनेमात काम केलं पण ती केमिस्ट्री नाही जुळली.. नायकाला नायिका हवी.. ती रेखा गणेशनच होती ही बाब नाकारता येणा नाही. ही प्रेरणा कोण कुणाला, कधी, कशा माध्यमातून देईल हे सांगता येत नाही.

हा महानायक काळानुसार बदलत गेला.. कधी काळी कभी कभी चित्रपटात त्याची नायिका असणारी राखी १९८२ च्या मुशीर रियाजच्या शक्ती मध्ये त्याच्या आईच्या भुमिकेत आली.. नायकाचं मोठेपण हेच असतं.. तो आजही चित्रपटात सम्राटच आहे आणि त्याची लोकप्रियता वाढतच आहे.. आणि ती वाढतच राहणार... हीच त्याच्या वाढदिवशी शुभेच्छा..


प्रशांत दैठणकर

No comments: