Monday, 22 October 2012

कभी कभी मेरे दिलमे...!

साऱ्या सिनेजगताला आणि सिनेरसिकांना स्वप्न दाखवणारे यश चोप्रा गेले... चॅनेलवाले न्यूज ब्रेक करीत होते आणि त्याचवेळी एक लंबा प्रवास भूतकाळाकडे मनाने सुरु केला होता. नावातच यश असणारे यश चोप्रा यांनी अतिशय सुंदर पध्दतीने प्रेमाला पडद्यावर आणलं. अनेक पिढ्यांच्या प्रेमाचे ते सारे चित्रपट साक्षीदार आहेत.

आपल्या आयुष्याला जोडणारे प्रसंग आपणास पडद्यावर दिसले आणि आपलं प्रतिबिंब त्यात जाणवलं तरच आपण तो चित्रपट जवळ करतो आणि यशजींचे सर्वच चित्रपट या कॅटेगरीत मोडत होते त्यामुळेच ते ब्लॉकबस्टर ठरले त्यांच्या चित्रपटातील जमेची बाजू म्हणजे कथानकात विभिन्न प्रकारचे केलेले  प्रयोग आणि चित्रपटाचं संगीत.

भारतीय सिनेमा संगीतप्रधान आणि रसिकांची त्याला मान्यता आहे. संगीत ऐकणं हा आमच्या जीवनशैलीचा एक भाग आहे. कानसेनांना तृप्त करणारी गाणी चित्रपटात पेरता आली पाहिजे इतकंच. कभी कभी मेरे दिलमे... धीर गंभीर आवाजात अमिताभने व्यक्त केलेला रोमांस आणि त्यानंतर खुलणारं गाणं.

सिलसिला हा अमिताभ जया आणि रेखाचा वैयक्तिक आयुष्याचा पट आहे असं गॉसिप झालं असलं तरी असा सिलसिला घरोघरी कुठे व्यक्त कुठे अव्यक्त स्वरुपात कुटुंबांमध्ये आहे त्या समाजाचं प्रतिबिंब या निमित्ताने रुपेरी पडद्यावर उमटलं त्यामुळेच सिलसिला हिट झाला अमिताभ मधला रोमॅन्टीक हिरो यशदांनी समोर आणला त्यापूर्वी त्याला अँग्री यंग मॅन च्या प्रतिमेत सारे बघत होते. अनिल कपूरच्या टपोरी, उडाणटप्पू अशा लखन इमेजला धीर गंभीर नायक म्हणून दाखवण्याचं काम लमहे ने केलं हनी इराणी ने आपल्या पतीला अर्थात जावेद अख्तरला मागे टाकत सुंदरसं कथानक या चित्रपटाला दिलं या कथानक खरोखर काही डिफरंट असं पडद्यावर आलं होतं.

शाहरुख आणि यशजी यांची जोडी तर कुणीही विसरु शकणार नाही हा यशराजच्या करिअर मधला एक स्वप्नवत काळ होता. माधुरी, करिना, ऐश्वर्या नायिका बदलत गेल्या पण शाहरुख एका बाजूने कायम राहिला. आणि त्यांचा अखेरचा अद्याप प्रदर्शित व्हायचा जबतक है जान देखील शाहरुख सोबतच होता पुन्हा नायिका बदलली आता अनुष्का आली.

स्वप्नं तयार करणं आणि आठवणींची जपणूक करणाऱ्या मनाला कायम ताजेपणांन जगायला लावणं हे यशजींच्या यशाचं गमक... किती जगलात यापेक्षा काय जगलात हे महत्वाचं असा संदेश देणाऱ्या या महान दिग्दर्शकाला अखेरचा सलाम.

अलविदा यशजी, अलविदा....!

Prashant Daithankar
9823199466
dpacifics@gmail.com

No comments: