Thursday, 29 November 2012

बडे धोके है इस राह में !     आमची पिंकी इतकी हुशार आहे की ती लहान असूनही इंटरनेट वापरते असं मुलांबाबत कौतुकानं बोलतात त्या सोबतच माध्यमाचा वापर करणं किती धोकादायक आहे याचीही जाणीव प्रत्येक पालकानं ठेवली पाहिजे. गेल्या काही दिवसात वापराऐवजी गैरवापरातून फेसबुक सारख्या माध्यमातून दंगल होण्याचे व सामाजिक वैमनस्य वाढीला लागण्याचे प्रकार समोर येत आहेत.
     मुळात इंटरनेटचा वापर धोकादायक आहे हे शंभरपैकी पंच्यान्नव जणांना माहिती नाही हे वास्तव आहे. मुलं झटपट नवी गाणी इंटरनेटवरुन डाऊनलोड करतात यासाठी वापरलं जाणारं पोर्टल हे पाकिस्तानी आहे. गाणे डाऊनलोड करताना आपण अटी-शर्ती कबूल करीत असतो. याचा आधार घेत अशा कंपन्या त्यांच्या संगणकातून तुमच्या पर्सनल कॉम्यूटरचावापर करतात. त्यांचा डेटा ते आपल्या संगणकात ठेवत आहेत याची कल्पना देखील आपणास येत नाही.
     अशा प्रकारे संवेदमक्षम माहिती आपल्या संगणकात ठेवायची आणि त्याचा वापर आपल्या विरुध्दच करायचा असं छुप सायबर युध्द आताच सुर झालं आहे. कोणत्याही प्रकारे सैन्य न पाठवता लोकभावनेला हात घालून आपल्यात सामाजिक वितुष्ट निर्माण करणारं हे युध्द आहे.
     काही दिवसांपूर्वी पूर्वांचलातील राज्याच्या मुलांमध्ये भिती उत्पन्न करणारी छायाचित्रे आणि चित्रफिती इंटरनेटवर आल्याने खूप गोंधळ उडाला होता हा सर्व प्रकार पाकिस्तानात असणाऱ्या चार वेबसाईटस्नी केला हे उघड झालं आहे.
     आपली मुलं, या माध्यमाचा वापर करतात त्यावेळी आपणास याची जाणीव असायला हवी. सायबर कायद्यांबाबत आज विधीज्ञांमध्येही ज्ञान पोहोचलेले नाही. भारतीय माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या सोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर क्राईम लॉ 2003 मध्ये सर्व देशात लागू झालेला आहे. त्यात 2008 साली मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली यानुसार फेसबूक सारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर आपले मतप्रदर्शन आक्षेपार्ह आढळल्यास 7 कोटी डॉलर पर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. यासाठी प्रथम पालकांना याचं ज्ञान मिळवावं लागणार आहे.
     आपण इ-मेल वापरतो त्यावेळी वैयक्तिक स्वरुपाची माहिती, छायाचित्रे यांचा कमीत कमी वापर करावा. आज फेसबुकवर पोस्ट करायला पैसा लागत नसला तरी उद्या तो लागू शकतो. फेसबुकनं झपाटलेली पिढी आपण बघतोय अगदी खट्ट वाजलं तरी ते फेसबुकवर अपडेट करण्याचा आटापीटा करणारे याबाबत किती जागरुक आहेत हे विचारण्याची वेळ आता आली आहे.
     सायबर गुन्ह्यांची व्याप्ती जगभर आहे. आपणास लॉटरी लागली आहे. कृपया माहिती पाठवा सोबत अमूक बँक खात्यावर शंभर रुपये जमा करा असा संदेश पाठविला जातो. गेले तर शंभरच जातील अशा हिशेबानं आपण जरी शंभर रुपये भरत असलो तरी असे कोटेवधी लोक जाळ्यात अडकल्याने अशा मेलद्वारे कोटेवधी कमावणारे इथं कमी नाहीत आणि याची संख्या वाढतच आहे.
     सायबर क्राईमचं जाळं हे या इंटरनेटच्या जाळ्यातून गुंफून त्याद्वारे अनेक प्रकारचे गुन्हे होत आहे. त्यामुळे जरा सावध !

                                                                                                            - प्रशांत दैठणकर 

No comments: