Wednesday, 19 August 2015

या जन्मावर......या जगण्यावर                सौंदर्य..... याची परिभाषा कुणाला करता आली आहे आजवर. चित्रपट सृष्टीतलं शापित सौंदर्य अर्थात मधुबाला असो की हॉलीवूडची मर्लिन मन्रो......प्रत्येक सौंदर्याला शाप असू शकत नाही......तसं पाहिलं तर सौंदर्य हे आपल्या बघण्याच्या नजरेवर अवलंबून असतं.
               छत्रपती शिवरायांनी सुरतेवर चढाई केली त्यावेळी राजांसमोर हजर करण्यात आलेल्या सूरतच्या सुभेदाराच्या पत्नीच्या सौंदर्याची वाखाणणी राजांनी अतिशय आदरानेच केली होती. सौंदर्य आणि त्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन आपलं व्यक्तीमत्व कसं आहे ते सांगत असतो.
              सौंदर्य प्रत्येकाच्या ठायी आहे पण म्हणतात ना हि-याची पारख फक्त जोहरी करु शकतो. पारखी नजर म्हणजे सौंदर्य शोधणं. आज बखरकारांनी केलेलं मस्तानीचं वर्णन आपल्या नजरेसमोर तेच सौंदर्य नव्यानं साकार करतं.
              तसं म्हटलं तर कबरस्थान काही फिरायला जाण्याची जागा होवू शकत नाही मात्र त्यातही सौंदर्य असेल तर जगातल्या सात आश्चर्यापैकी एक असणारा ताजमहल हे त्याचचं प्रतिक आहे. आपल्या लाडक्या मुमताज च्या प्रेमाखातर हा सुंदर ताजमहल उभा करून तिच्या स्मृतीला अजरामर करुन ठेवलय असचं म्हणता येईल.
            सौंदर्य आणि प्रिती हे हातात हात घालून चालतात असं म्हटल्यास वावगं ठरु नये मर्लिन मन्रोचे आणि जे.एफ.के.यांच्यातील बंध याच सौंदर्याच्या धाग्यात गुंफले होते. इकडे हॉलीवूडच्या चर्चा हल्ली जास्त होत आहे कारण माध्यमांचा विस्तार झाला आहे.मर्लिन पेक्षाही अधिक सौंदर्य असणारी अभिनेत्री म्हणजे एन्ग्रीड बर्गमन होय. तिचं सौंदर्य ख-या अर्थाने आरसपानी असं होतं.
         
   सौंदर्याचं बखाण करताना त्याच सुंदर शब्दांचा वापर करावा लागतो पंकज उधास यांच्या आवाजातील एक गाणं इन्ग्रीडचं सौंदर्य आपल्यासमोर उभं करतं
चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल.........
 एक तू ही धनवान है गोरी बाकी सब कंगाल
              काय ती कविकल्पना.....खरचं जो न देखे रवि ते देखे कवी असचं म्हणावे लागेल.
               उगवत्या सूर्याची प्रभा आणि मावळतीचा सूर्य यांच्या जोडीला पौर्णिमेच्या एक दिवस आधीचा चौदहवी का चांद म्हणजे सौंदर्य......त्याचं वर्णन देखील शब्दातीत
               बॉलीवूड मध्ये निरनिराळया शायर लोकांनी या सौंदर्याच्या वर्णनात शब्दांचा जो वापर केला आहे त्याला काही तोडच नाही असं म्हणता येतं ते यासाठीच
              जुल्फे......हा शब्द म्हणजे सौंदर्य.......बलखाती लट, गेंसू असे निरनिराळे उर्दू शब्द सौंदर्याचं रुप आपल्या डोळयापुढे उभं करीत असतात.
              सौंदर्य म्हणजे एक आंतरिक भावना......मनाला जे भावतं ते सौंदर्य असतं......पावसानंतर हिरवाईने नटलेल्या डोंगर रांगा......पहाटेच्या उन्हात चमकणारे गवतांवरील दवबिंदू म्हणले सौंदर्य......दूरपर्यंत पसरलेल्या पिकांमधून वाहणारा वारा आणि त्याच्या तालावर डोलणारी ती कणसांची रांग म्हणजे सौंदर्य.....हसताना गालावर पडणारी खळी अर्थात डिंपल म्हणले सौंदर्य.....अनेक रुपात आपणास ही अनुभूती येते.
             लता मंगेशकरांचा आवाज आणि आशाबाईंचा सूर देखील सौंदर्यच.....सौंदर्य नजरेतूनच कळतं असं नव्हे तर ते श्रवणातून, गंधातून आणि स्पर्शातून देखील कळत असतं. एखादा मनाला भावणारा आणि सतत ऐकत रहावं असा वाटणारा आवाज म्हणजे देखील सौंदर्य.
            माझे एक मुस्लीम सहकारी सांगायचे की, फल, सब्जी, अनाज यह जिस्म का खाना है| तो सुगंध रुह का......तप्त अशा धरतीवर पावसाचे थेंब पडायला लागतात आणि तापलेल्या मातीशी थेंबांचे मिलन झाल्यावर जो दरवळ येतो तो मृदगंध म्हणजे देखील सौंदर्यचं.......

    असं आयुष्य जगणा-यांचे काही अनुभव आपणास वेगळ्या जगात नक्कीच नेणारे असतात. पण त्यातून एकच जाणवत की जगताना धुंद होवून जगायचं असतं.. जगात असणारी सुंदरता आपण टिपायची असते. जग जाणायचं असतं.. कारण इथलं इथंच संपणार आहे.
   सौंदर्य एक अनुभूती असते आपल्या जगण्याची......जगत राहण्याची आशा तर कधी प्रेरणा असते म्हणूनच म्हणावं.

इथल्या पिंपळपानांवरती.................................

....... या जन्मावर या जगण्यावर..शतदा प्रेम करावे.

                                                                                    - प्रशांत दैठणकर

No comments: