Wednesday, 2 September 2015

त्रिमितीतून चौथ्या मितीकडे

आयुष्य ही अनुभवांची एक अखेरच्या क्षणापर्यंत चालणारी मालिका आहे. यात कोणता प्रसंग कसा येणार याचं नियोजन प्रत्येक व्यक्ती करते मात्र तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहणं अत्यंत अवघड असतं कारण काळ हा चौथ्या मितीत चालतो तुम्ही - आम्ही त्रिमितीच्या जगात जगतो. अगदी चित्रपट देखील त्रिमितीमध्ये बघायचा असेल तर आपणास वेगळी मेहनत घ्यावी लागते आणि वेगळया चष्म्यांचा आधार देखील घ्यावा लागत असतो.

या जगात आपण आपली प्रतिमा म्हणून जो फोटो बघतो तो देखील त्रिमितीत असत नाही त्यामुळे काळाची गती आणि चौथी मिती आपल्या आकलनापलीकडील असते हे मान्य केलेलं चांगलं. त्यामुळे आपलं आयुष्य आणि त्याचा प्रवास कदाचित अनाकलनीय होत असतो.

आपल्या हिंदू संस्कृतीत कर्माचं महत्व सांगितलं आहे. कर्म काय आहे याचही आकलन प्रत्येक व्यक्तीला होईलच असं नाही मात्र त्यापायी कर्म करण्यात कमी होत नाही. आपण जे काम करतो त्याला कर्म म्हणणार का ? नाही अर्थातच नित्य कामाला कर्म म्हणता येणार नाही. मग कर्म आहे तरी काय ? आणखी एक सवाल आणि मग सुरु होतो तो कर्माचा शोध.

कर्म ज्याला कळलं अशी व्यक्ती कोणाला म्हणायचं या प्रश्नांच उत्तर अर्थात ज्याला आपल्या जन्माचा बोध झाला आहे अशी व्यक्ती असं म्हणता येईल आपला जन्म इथं काही तरी वेगळ करण्यासाठी झाला याची जाणीव झाल्यावर काळाच्या चौथ्या मितीची ओळख होते. ते केवळ एक परिमाण नसून ती एक सिमारेषा आहे. याची जाण होते मग या त्रिमितीच्या सिमा ओलांडून चौथ्या मितीत प्रवेशाचा प्रयत्न सुरु होते. अर्थातच कालसापेक्ष जगणं विसरुन काळाच्याही पलिकडे विचार पोहोचतात हीच सृजनशीलतेची सुरुवात असते.

ज्याला काल आणि उद्या याचा प्रवास साधताना सुखदुख: जाणवत नाही अशीच माणसं सृजनातून जगाला वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न करतात. यात प्रत्येक व्यक्ती यशस्वी होईलच असे नाही मात्र तसा प्रयत्न करण्यात अनेकांनी आयुष्य घालवल आहे. अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हा प्रवास दैनंदिन अनुभवाची मालिका ठरते आणि यातूनच वैराग्याची भावना येत असते.

सामान्य आणि असामान्य यातील फरक कोणता असं विचारल्यावर सांगता येईल की आयुष्यामधील या प्रवासात चढ उतार सारख्याच मानसिक पातळीवर जगण्याची क्षमता ज्या व्यक्तीत येते ती वैराग्याचा अनुभव घेते व दरक्षणी नव्या संकटांचा मुकाबला करायला तयार असते. अशी व्यक्ती असामान्य होय. आयुष्यात आनंदाने काळ व्यतीत केल्यावर काही कडू प्रसंग येतात त्यावेळी मानसिक पातळीवर तितकी सक्षम प्रतिक्रिया देणं जमत नाही म्हणून ज्याला वैफल्य येतं ती व्यक्ती सामान्य व्यक्ती होय. जन्माला येणं ही मृत्यूकडील प्रवासाची सुरुवात आहे. आलेली प्रत्येक व्यक्ती जाणार हे नक्की मात्र वैराग्यातून येणारा मृत्यू आणि वैफल्यातून येणार मृत्यू यात खूप मोठं अंतर असतं वैराग्याचा पुढील प्रवास निरपेक्ष कर्माच्या दिशेने जातो ज्यालाच कदाचित मोक्षमार्ग म्हणणे अपेक्षित असेल.

वैफल्याचा प्रवासमात्र बहुतेक प्रसंगी स्वनाश अर्थात आत्महेत्त्येकडे जाणारा असतो. जन्माला येताना प्रत्येक व्यक्तीला निसर्ग काही अपवाद वगळता सारं दान देवून टाकतो मात्र ते दान सत्पात्री पडलं की नाही हे कर्माच्या मार्गावर कळतं कर्मकांड करणं म्हणजे कर्म नाही हे सुध्दा वेगळं सांगावं लागेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात तसं

मनी नाही भाव

म्हणे देवा मला पाव......

देव अशानं पावायचा नाही रे

देव बाजारचा भाजीपाला नाही रे

केवळ देव - देव करणं म्हणजे कर्मकांड होय. आपण आपल्याप्रती आणि आपल्या जीवनात असणा-या प्रत्येक व्यक्तीप्रती जपलेली भावना म्हणजे कर्म होय आपली अंगी असणारी भूतदया अर्थात प्राणीप्रेम म्हणजे कर्म होय...त्याही पलिकडला विचार करुन जगणं म्हणजे कर्म होय आणि असे कर्म करणारे कालातीत असतात... काळ बदलला तरी आपण न बदलणं हा स्थायीभाव म्हणजे कर्म होय.

प्रशांत दैठणकर

No comments: