Saturday 12 September 2015

विकासाची मानसिकता ...


बदल ही संसार का नियम है अस भगवदगीतेतलं एक वचन आहे. ही संज्ञा सर्वत्र लागू होते. या बदलाची दुसरी बाजू म्हणजे विरोधाची असते. जितका मोठा बदल अधिक मोठा विरोध ही मानवी भूमिका अनुभवास येत असते.

लोककल्याणकारी संकल्पनेतील लोकांनी लोकांसाठी चालविलेलं राज्य म्हणजे लोकशाही होय. या संकल्पनेनुसार राज्य चालवताना एकत्रित झालेल्या या समाजघटकांच्या उन्नतीसाठी लोकांकडून प्राप्त करातून उपाययोजना करणे अपेक्षीत असते. ही उन्नतीसाठी करावी लागणारी प्रक्रिया म्हणजे विकास होय. आता या विकासाच्या नाण्याची दुसरी बाजू अविकसितपणा असायला हवी मात्रआजकाल त्याची दुसरी बाजू विरोधाची बनली आहे. कारण अर्थात विकास ही बदलाचीच प्रक्रिया असते.

माझ्या घराचा, वस्तीचा आणि गावाचा विकास मला नक्कीच हवा आहे असं आग्रहाने प्रत्येक व्यक्ती सांगते मात्र त्या विकासासाठी येणाऱ्या बदलांना विरोध करणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणावर वाढल्याने विकास होत नाही अशी स्थिती थोडयाफार फरकाने सगळीकडे दिसते.

विकासाच्या या प्रक्रियेत जे अडथळे आहेत त्यात भूमिकेचे आकलन न होणे ही बाब महत्वाची आहे. आजची स्थिती याच "डेडलॉक" वर आली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी असणारी त्यागाची भूमिका आता विस्मरणात गेली आहे. दूरदृष्टी असेल तर विकास शक्य होतो मात्र त्याच्या अभावाने short sight फायद्यासाठी होणाऱ्या विकासकामांना विरोध झाल्यामुळे विकासाची गती खुंटते आणि अल्पकालीन व दिर्घकालीन दोन्ही लाभ दूर राहतात व तेहही गेले, तुपही गेले म्हणत धुपाटणे हाती राहते व विकास झाला नाही, अन्याय होत आहे अशी ओरड करीत धोपटण्याचा कार्यक्रम सुरु होतेा.

विकास हवा पण कोणते मोल देवून ही आता परवलीची भूमिका मांडणारे समोर आले आणि त्यामधून प्रवाह अडला हे सर्वांनी ध्यानी घेतले पाहिजे. विकास घडवून आणण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही योगदान द्यावे लागत असते. काही जणांना त्याग देखील करावा लागतो मात्र प्रत्येक जण केवळ फायद्याचा विचार करीत असेल तर विकास होणारच नाही.

आपण ज्यावेळी हक्काची लढाई म्हणतो त्यावेळी आपण आपल्या कर्तव्यांचे किती पालन करतो असा सवाल आपण अंतर्मनाला करावा लागणार असल्याने आपण comfort zone न सोडण्याची भूमिका घेतोय असही जाणवेल.

आपण आपली मानसिकता काय हे तपासले पाहिजे. गरज असल्यास त्यात बदल केला पाहिजे म्हणजे बदल होईल. प्रत्येक व्यक्तीने या दृष्टीकोनातून विचार केला तरच समाजाची मानसिकता बदलेल आणि असे झाल्यानंतर आपण विकासाची पहिली पायरी गाठू. शिखर गाठायला फारसा वेळ लागणार नाही हे देखील तितकंच खरं.

प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

No comments: