Friday, 4 September 2015

श्रवण संस्कृती
आजकाल एक शब्द नव्याने प्रचलनात आला आहे. श्रवणसंस्कृती हा नवा नाही तर जुनाच शब्द आहे. मात्र गेल्या काही दशकात हा मागे पडला होता. श्रवण म्हणजे ऐकणे. आता हे ऐकण्याची काय संस्कृती असू शकते. मुळात केवळ ऐकणं हे मानवी स्वभावास पटणारं नाही.

एखादी व्यक्ती जर बोलत असेल तर दुसरी व्यक्ती केवळ एकत नाही. ती यक्ती त्यावर प्रतिक्रिया देते. हा झाला संवाद मात्र आपल्याकडे विद्वान व्यक्तींची संख्या कमी नाही त्यामुळे संवादावरुन वादाकडे नंतर वादविवाद आणि अखेरीस विसंवाद असा प्रवास सुरु होतो. "मी का म्हणून ऐकून घ्यायचं" असा अविर्भाव असेल तर संवाद होणार नाही आणि श्रवणसंस्कृती या शब्दाचा संबंध येणार नाही.

आजचा जमाना माहिती तंत्रज्ञान विस्फोटाचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात तंत्रज्ञान स्मार्टफोनच्या रुपाने खेळतय. उचलला फोन लावला कानाला या उक्तीप्रमाणे सहजरित्या फोन उचलून लावणारी ही आजची पिढी आहे. सत्तरच्या आणि ऐंशीच्या दशकात ही स्थिती नव्हती भारतात दूरदर्शनचं जाळं विस्तारण्यापूर्वी केवळ रेडिओ हे एकच मनोरंजन आणि माहितीचं साधन होतं. त्यावेळी जी संस्कृती अस्तित्वात होती ती म्हणजे श्रवण संस्कृती.

कुतूहल हा मानवाचा स्थायीभाव आहे. रेडिओच्या त्या छोटयाश्या डब्ब्यामध्ये माणसं नेमकं कुठं बसून बोलतात या कुतूहलापायी रेडिओचं पोस्टमार्टेम मी लहानपणी केलं. आपणापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल आणि काही जणांनी ही कृती देखील केलेली असेल. त्यावेळी एक आणि एकमेव पर्याय म्हणून याला स्वीकारणं भागच होतं

त्या काळात चित्रपट गृहांची संख्या देखील मर्यादीत अशीच होती. यामुळे नाक्यांवरील हॉटेल्सवर रेडिओवर गाणी ऐकणे आणि चित्रपटातील डायलॉगच्या ग्रामोफोन तबकडया ऐकणे हा "टाइमपास" होता आता ते चित्र डोळयासमोर आल्यावर हसू येईल मात्र हे सत्य आहे.


रेडिओने निर्माण केलेल्या या संस्कृतीने रेडिओ श्रीलंका अर्थात रेडिओ सिलोन वरील अमीन सायनीच्या बिनाका गीतमालाला सर्वाधिक श्रवणीय कार्यक्रमाचे स्थान दिले होते. आजच्या भाषेत त्याला टिआरपी म्हणता येईल. गावांमध्ये सणासुदीला भरणा-या यात्रांमध्ये वाजणारे भोंगे हे यात्रांची ओळख होते.

श्रवण संस्कृतीचा एक निराळा अर्थही त्याकाळात लागू होता. कमी शिक्षित समाजात एखादया जाणकार व्यक्तीने आणि तज्ञाने दिलेली माहिती लोक ऐकायचे त्यासाठी गर्दी व्हायची. साहित्यिक क्षेत्रात याच श्रवण संस्कृतीने व्याख्यानमालांची मुहूर्तमेढ रोवली व अशा व्याख्यानमाला रुजल्या त्यातून प्र.के.अत्रे यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाने श्रोत्यांना भूरळ घातली त्यामुळेच त्यांना वक्ता दशसहस्प्रेशु नामाविधान देण्यात आलं.

या व्याख्यानमालांच्या नंतरच्या काळात या श्रवणसंस्कृतीचा ताबा राजकारणाने घेतला अठरापगड जातीच्या या समाजात आसेतूहिमाचल अशा आपल्या भारत देशात राजकीय सभांच्या माध्यमातून श्रवणसंस्कृती फोफावली याचा विनियोग मात्र केवळ सत्तेसाठी झालेला दिसून येतो. नंतरच्या काळात तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतीमुळे टि.व्ही. नावाचा इडियट बॉक्स घराघरात आला आणि सायंकाळी मोकळया हवेत खेळणारं तरुणपण आणि निसर्गाला साद घालत रपेट करणारं प्रौढपण घरात या इडियट बॉक्ससमोर विसावलं त्यामुळे ज्यांना खेळण्याची नितांत आवश्यकता आहे अशी खेळण्याच्या वयातही मुलं देखील खेळण विसरली. ऐकण्यासोबतच दिसण्याची ताकद असणारं हे टिव्हीचं माध्यम घराघराचा ताबा घेतं झालं.

यावेळी जी सर्वांची प्रतिक्रिया होती ती अनिल कपूरच्या मिस्टर इंडिया चित्रपटात चांगलीच उमटली आहे. असं आपणास जाणवतं

मिलना क्या जो दिखाई ना दे

सारा का सारा सिर्फ सुनाई दे,

क्या करना है मिलके

ऐसे मिस्टर इंडियासे. 

खरच आहे. आजकालच्या स्वाईप आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या जमान्यात नुसतं ऐकण्याचं कोणतं ते कौतूक असं म्हणावं लागतं.

टिव्हीच्या अतिक्रमणानंतर श्रवणसंस्कृतीला उतरती कला लागली. राज्याला नेतृत्व देणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे आदींचे नेतृत्व याच संस्कृतीने वादविवाद स्पर्धांच्या रुपाने समोर आले होते. टिव्हीचे आगमन झाल्यानंतरच्या काळातही डॉ. शिवाजीराव भोसले यांच्या ओघवत्या शब्दांची व्याख्याने ऐकायला गर्दी जमतच होती. मात्र समाजातले बदल झपाटयाने होत होते. "जुने जाऊ द्या मरणालागुनी" अशा आशयाची एक म्हण मराठीत आहे. त्याप्रमाणे सभांना आणि व्याख्यानांना होणाऱ्या गर्दीचे प्रमाण घटले. यातच दररोज मालिका अर्थात डेली सोपच्या रतीब इडियट बॉक्सवर सुरु झाला आणि त्यातून निर्माण झाली केवळ दर्शन संस्कृती.

दर्शन संस्कृतीत दूरदर्शनवरील आरंभीच्या काळात प्रक्षेपित हमलोग सारख्या मालिकेपासून ये जो है जिदंगी, खानदान, बुनियाद नंतरच्या काळात रामायण - महाभारत असा काळ गाजला या क्षणी जर कुणी म्हटलं असतं की श्रवण संस्कृती पुन्हा येणार आहे. तर त्याला उपचाराची गरज आहे. अशी प्रतिक्रिया इतरांनी दिली असती.

या स्थितीत "जुनं ते सोनं" या मराठी म्हणीचा प्रत्यय आला आणि पुन्हा एकदा श्रवण संस्कृतीला उभारी मिळाली ती एफएम रेडिओमुळे. "नव्याचे नऊ दिवस" अशी म्हण देखील यामुळेच सिध्द झाली.आपणास एका ठिकाणी अडकवून ठेवण टि.व्ही. ने साध्य केलं मात्र आपण एका जागी स्थिरावत नाही. दैनंदिन कामं करताना मनोरंजन व माहिती यासाठी रेडिओ हेच माध्यम उत्तम आहे हे नव्याने सिध्द झालं.

ऑल इंडिया रेडिओ ज्याला आपण आकाशवाणी म्हणून ओळखतो हा 86 वर्षापासून सेवा देत आहे. मात्र गेल्या दशकात आलेल्या खाजगी मनोरंजन एफएम वाहिन्यांनी सादरीकरणाच्या आधारे खूप मोठी आघाडी घेतली. यातील अर्थकारणाचा भाग बाजुला सोडला तरी एक बाब महत्वाची ती म्हणजे श्रवणसंस्कृती शाबूत आहे.

दोन व्यक्तींमधील संवादात एकानेच बोलणे म्हणजे संवाद होतच नाही. त्यात क्रिया-प्रतिक्रिया असा आलेख अपेक्षित असतो. मार्मिक पध्दतीने पती-पत्नी यांचे संवाद संबध आपल्याकडे सांगतात त्यावेळी हा संवाद


एक सवाल मै करु

एक सवाल तुम करो

हर सवाल का जवाब

सवाल ही हो.

अस असलं तरी ऐकण्याची ही नैसर्गिक सवय एक प्रकारची संस्कृती बनली आहे.

इंग्रजीत म्हणतात you should be a good listener to be become a good editor. यात इंतरांच ऐकुन घेणं अपेक्षित आहे. आपण व्यक्तीमत्व आणि त्याचा विकास यांच्या प्रवासात या श्रवण संस्कृतीच महत्व देखील जाणून घेतलं पाहिजे.

समर्थ म्हणतात दिसामाजी काही तरी लिहावे आणि पुढे प्रसंगी अखंडीत वाचित जावे असंही म्हटलयं.

वाचन म्हणजे इतरांच कथन आपण आपल्या नजरेतुन ग्रहण करणं हा देखील श्रवण संस्कृतीचाच एक पैलु आहे. त्यामुळे वेळ काढून वाचन करावं त्याहीपेक्षा महत्वाच आपण आपल्या अंतरंगाचं म्हणणं ऐकून घ्यावं.

आपल्या बाह्यरंगात आपण वेगळे आणि अंतरंगात वेगळे असतो. आपल्या मनातही संवाद होत असतो. आपल्यापैकी कितीजण तो ऐकतात? आसपासची परिस्थिती आणि आपली भूमिका याला न्याय देण्याच्या प्रयत्नात आपण आपला स्वत:चाच अंतर्मनातील आवाज ऐकत नाही हे देखील वास्तव आहे. आपण आपला आवाज ऐकणं हा या श्रवण संस्कृतीचा कळस असतो.

बॉस म्हणाला म्हणून करावं लागतं, कौटुंबिक गरजा म्हणून ऐकाव लागतं याच्या पुढे जाऊन आपला आतला आवाज ऐकणारी माणसं जग बदलतात असा अनुभव आहे.

"ऐकावे जनाचे, करावे मनाचे"

अस वचन तेच सांगत. त्याच महत्व वेगळं आहे. पण ऐकतो कोण?

ही स्थिती न आणता तांत्रिक श्रवणाच्या या संस्कृती प्रमाणेच या श्रवण संस्कृतीकडे वळण्याची हीच वेळ आहे.

--- प्रशांत अनंतराव दैठणकर

मो. 9823199466

जिल्हा माहिती अधिकारी,

गडचिरोली 1 comment:

prashant daithankar said...

All the readers requested to register their comments for future improvements

prashant daithankar