Saturday 3 October 2015

"कट्टा"... आणखी काय हवं आयुष्यात ?

गावातला कारभार चालणारा गावचा "कट्टा" हा कधीकाळी लहानपणी बघितला होता. हाच कट्टा चित्रपटांमधून बघायला मिळतो. गावातल्या भल्या-बुऱ्यांची खबरबात, गावतल्यांचं दुखणी - खूपणी इथं चर्चिल्या जायची. या गप्पांचं, मजांचं रोजचं असणं गावाच्या कारभा-यांच्या दृष्टीकोणातून राजकारणाचा अड्डा होतं.

अशाच अड्डयांवर कधी-कधी केवळ कुटाळक्या होतांना दिसत मग त्याचा अर्थ आणि स्वरुप बदलायचं. चणे कितीही भिजवून खूप शिजवले तरी एखादा चणा निसर्गाचे नियम मानत नाही आणि तो दगडासारखा कडकच राहतो. चणे खातांना दातांनी मऊ-मुलायम रवंथ करणाऱ्याला अचानक असा चणा दाताखाली आदळून दणका देतो. या दणक्याने थेट डोक्यापर्यंत सणक भरते अशा दाण्याला कुच्चर असं म्हणायचे. गप्पांच्या कट्टयांवर असे समाजाचा परिणाम न होणारे काही महाभाग आणि त्यांचे त्याच पध्दतीने कुच्चर विचार या ओटयाला "कुच्चर ओटयात" बदलून टाकायचे असा एक भाग जालना शहरात आहे. पण त्याचं नावं याच रुढार्थाने पडल्याची साक्ष किंवा पुरावा नाही.

औरंगाबाद सारख्या शहरात शिक्षण घेतांना अधून-मधून ग्रामजीवनाचं दर्शन घडलं तरी ते जगायची संधी मिळाली नाही नंतर एसबी ला (माझं महाविद्यालय आणि त्याचा हाच खरा परिचय) सायन्सला ॲडमिशन घेतली आणि एक नवा कट्टा जीवनात आला. अजिंठा आणि वेरुळात कातळावर कोरुन शिल्प घडवावं तसं त्या काळातल्या प्रत्येकाच्या मनावर तो कट्टा कायमचा कोरला गेलाय. आज 25 वर्षे झाली कट्टा सुटला पण आठवणींमध्ये तो कट्टा रोज भरतो, मुलं-मुली जमतात आणि कट्टयावरल्या गप्पा आठवणींमध्ये रंगतात.

आज माझी मुलगी महाविद्यालयात शिकते परंतु इथला सारा रिवाज बदलता असल्याचं दिसतं महाविद्यालये आणि क्लासेसवाले यांच्या युतीतून शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेची नाही तर फक्त गुणांची सत्ता रंगताना दिसते. मुलांना आवश्यक असल्याने महाविद्यालयात नाव नोंदवावं लागतं बाकी सारं क्लासेसमध्ये हे क्लासेस देखील आर्थिक कुवतीमुळे नवी वर्णव्यवस्था तयार करुन बसले आहेत. अमाप फी भरण्याची ताकद असेल तरच अमक्याची शिकवणी त्यामुळे आर्थिक स्तरावर आधारित मैत्रीचा अध्याय सुरु झाला आहे.

कोणाच्या घरची आर्थिक क्षमता काय याचं आम्हाला काही देणं-घेणं नसायचं असायची ती मैत्री, निखळ मैत्री, आणि एकमेकांच्या व्यक्तीमत्वाची अंतर्बाहय अशी ओळख तिथे कट्टयांवर पैसा हा विषय कधी आलाच नाही. चर्चा व्हायची ती कला-गुणांवर, अवगुणांवरही होत होती हे विशेष. यात एकमेकांची टर उडविणे हा जणू राष्ट्रीय कार्यक्रमच होता त्यावेळचा. ‘कट्टा बोले तो थट्टाʼ हे स्लोगन. याचं कुणाला वाईट वाटलं म्हणून मैत्रीत अंतर आलं असा प्रकार कधीच घडला नाही सगळं कसं निरागस, निर्व्याज आणि निरागस होतं.

त्या कट्टयावर आम्हाला बघून त्यावेळची तथाकथित गुणवंत मंडळी अभ्यास आम्ही बीझी असतांना तुम्हाला कसं बुवा इथं टुकारक्या करायला वेळ मिळतो असा कट्टा टाकून आमच्यात पसरलेला ‘टाईमपासʼ रोगाचा संसर्ग होवू नये याची काळजी घेत लांबूनच जाणं पसंद करीत असत. त्यांच्या दृष्टीने बिघडलेला ( तंत्र की मन:स्वास्थ ?) लोकांचं ठिकाण म्हणजे हा कट्टा होता.

काळाच्या ओघात जाणवतं की त्यांचं ते विचार करणं काय साध्य करुन गेलं ? ते आम्हाला बिघडलेले म्हणत असले तरी आनंद मिळवायला शिकवलं आणि ओळख देखील दिली. त्यांनी काय घडवलं असं म्हणून वाद करणं म्हणजे वेडेपणा असतो हे देखील त्याच कट्टयाने शिकवलं.

गाडी है, गलेलठ्ठ पगार, बँक-बॅलन्स, बिल्डींगे और कारोबर सबकुछ है मेरेपास...तुम्हारे पास क्या है या दिवारचा सीन आठवतो... माझ्या कट्टयावरचा प्रत्येक जण सांगेल हमारेपास शांती है, सुकून है...अजून काय पाहिजे असतं माणसाला ?

वयाची चाळीशी संपन्नता-समृध्दी आणते हे ठिक पण शुगर, बी. पी आणि दुखणी आणणार असतील तर अशा जगण्यापेक्षा आमचं कट्टयावरलं बिघडणं चांगलं होतं. पाण्याला पाणी, आणि मातीला माती मानून पाय जमिनीवर राहिले, निसर्गाचं प्रेम मिळालं आज खळखळून हसायची लाज वाटत नाही आणि ताण घालवण्यासाठी कपिल शर्माचा कॉमेडीचा शो बघण्याची वेळ आपल्यावर येत नाही. आणखी काय पाहिजे माणसाला आयुष्यात ?

बी. पी नही, शुगर नही, सुबह श्याम टेन्शन नाही या नसण्याचं कौतूक अधिक आहे असण्याच्या दु:खापेक्षा आयुष्याचं चित्र काढताना आहे त्यावर रेघोटया मारायच्या की मनाजोगतं चित्र रंगवता येईल इतका कॅनव्हासचा आकार वाढवत न्यायचा...चित्र कोणतं आणि किती चांगलं काढलं याचं समाधान महत्वाचं...वेळेत जमेल तसं पूर्ण करुन इथं मार्क मिळवायचेत कुणाला आयुष्याला हा विचार त्या कट्टयानं दिला आणखी काय पाहिजे माणसाला आयुष्यात ?

आजच्या पिढीकडे कट्टा नाही असं नाही. त्यांनी तो व्हॉटस्ॲप सारख्या नव्या तंत्राने बनवलाय परंतु तो शेवटी आभासीच आहे. तिथं फक्त फिल येतो अनुभव नाही. कट्टयांवरुन TTMM करुन घेतलेला
एक कटींग चहा आणि कांदयांच्या गरमागरम भज्यांसोबत पावसाळी वातावरणात रंगलेली पावसाळी कवितांची मैफल आजही अंगावर रोमांच उभा करते...आभासी जगातही TTMM आहेच ना...तू तूझ्या खोलीत मी माझ्या खोलीत तिथं पाठीवर धप्पा मारता येत नाही की खळखळून हसणं आणि इतरांना हसतांना बघणं जमत नाही...तिथं फक्त इमोजीचे गुद्दे आणि काविळी रंगाच्या त्या स्माईली त्यातून अनुभव सुध्दा आभासीच.

ऑनलाईन जमाना आणि सारं काही ऑनलाईन झाल्यावर तिथं पर्सनल टच राहत नाही...एखाद्याच्या मर्जीशिवाय त्याच्या पर्सनल स्पेसवर अतिक्रमण करुन आपण तिथं स्पेस बनवणं ही खरी मैत्री...आभासी जगात "स्पेस" च्या गप्पा ते देखील एकमेकांशी "स्पेस" सांभाळत...

पैशाने सारं काही मिळालं असतं तर इतरांना जगायला साधनच राहिलं नसतं. जेब खाली हूवा तो क्या दिल से तो अमीर है म्हणत समोरच्याला झटकून ‘चल हवा आने देʼआता सिनेमातच बघावं लागणार बहुतेक. कधी हवा असताना बहुतप्रसंगी जबरदस्तीने लादलेला सहवास सहन करणं म्हणजे मैत्री. नको असताना स्वीकारण्याचाही उत्सव व्हायला लागतो ते ठिकाण म्हणजे ‘कट्टाʼ असा कट्टा आयुष्याला लाभला आणखी काम हवं माणसाला आयुष्यात?

खूप कडक उन्हानं अंगाची काहिली होतेय आणि घामाच्या धारा वाहत आहे अशात वाऱ्याची येणारी एखादी झुळूक सुखावून जाते आणि यानंतर ‘अच्छे दिनʼ येणार हे आश्वासित करते तसा हा ‘कट्टाʼ मनात उलथापालथ झाल्यावर जरा कुठं एकाकी वाटायला लागल्यावर पुन्हा संजिवनी द्यायला येतो.

काळाच्या ओघात जुन्याचं नवं रुप दिसतं तसा हा कट्टा नव्या पिढीनं आभासी जगात जमवलेला आहे तसाच तो आमच्याही आयुष्यात येता झाला कधी काळी लाजरे-बुजरे असणारे मित्र मैत्रिणी...चेहरा नाहीच आठवत अशी फक्त नावाची ओळख असणारी व्यक्तीमत्वं आज प्रगल्भपणे आयुष्याच्या अनुभवानं संपन्न होवून भिडभाड न बाळगता खुलेपणानं पुन्हा आपली मतं मांडायला लागतात, मनातली गुपितं सांगायला लागतात आणि मनापासून प्रेमाची साक्ष देत मनापासून भांडायला लागतात.पुन्हा कट्टा ताजा होतो. ‘अनसिकेबल टायटॅनिकʼ शिप सारखं काळाच्या सागरात हरवलेलं फ्रेंडशिप पुन्हा पाण्यावर येतं. एक लंकेर छेडत मन गायला लागतं.

My heart will go on n on….!
 
Prashant anantrao daithankar
9823199466
let me know you reactions on my blog please.



No comments: