Thursday, 8 October 2015

सिनेसृष्टीचा हा मिडास राजात्याची आणि माझी ओळख अर्थातच मला कळायला लागलं त्या वेळेपासूनची वयानं बापापेक्षाही मोठा असणारा तो आजही मला तो म्हणावा इतका जवळचा आहे याला कारण त्याच्यातलं आणि माझ्यातलं नातं. हे नातं माझंच नाही तर या भारतवर्षात अनेक पिढयांनी ते जगलय आणि अनुभवलं आहे. तो शतकाचा महानायक. आपल्याला जगायला निरनिराळया पध्दतीनं प्रेरणा देणारा...नाही म्हणायला महत्व कमी असणाऱ्या जगातला तो अनेक पिढयांचं विचार विश्व कधी व्यापून बसला तेच कळलं नाही तो म्हणजे अमिताभ हरिवंशराय श्रीवास्तव उर्फ अमिताभ बच्चन.

'हम जहां खडे होते है वहीं से लाईन शुरु होती है' अशा करारी बाण्याची सवय त्याच्याच व्यक्तिमत्वाने लावली. रुपेरी पडद्याचं ते विश्व जगणारे अनेकजण आहेत पण त्याची तोड नाही आणि तुलना देखील नाही. कालातील व्यक्तीमत्वांपैकी एक व्यक्तीमत्व अमिताभचं. 11 ऑक्टोंबर 2015 ला वयाची 73 वर्षे पूर्ण करणाऱ्या या महानायकाला आणि त्याच्या प्रवासाला बघताना जाणवतं की त्याचा प्रवास तसा साधारण अशा चित्रपट आणि कथानकातून सुरु झाला असला तरी त्याचं स्वत:चं व्यक्तीमत्व त्या भूमिकांना मोठं करणारं होतं. त्याच्या असण्यानं अनेक भूमिका अजरामर झाल्या. त्याला विशिष्ट पठडीत बांधायचा प्रयत्न झाला मात्र त्याची उंची त्याहीपेक्षा अधिक निघाली. काही प्रतिमा अशा असतात ज्या चिरतरुण असतात त्यापैकी एक प्रतिमा अमिताभची आहे. राखी सारखी अभिनेत्री त्याची नायिका म्हणून आली आणि त्यानंतरच्या काळात त्याचं नायकपण बदललं नाही परंतु राखीला त्याच्या आईच्या भूमिकेपर्यंत वृध्दत्व आलं...यासाठीच त्याला चिरतरुण म्हणायचं.

त्यानं चित्रपटात स्ट्रगल केला तो साऱ्यांनाच करावा लागला आणि आजही अनेकजण करीत आहेत मात्र त्याची तुलना करणं अशक्य आहे इतकी मोठी झेप त्याने घेतली.

आजच्या पिढीला अमिताभचं ते वलय आणि त्याच्यातल्या त्या 'ॲग्री यंग मॅन ची क्रेझ' फक्त पुस्तकात आणि लेखांमध्ये वाचायला मिळेल प्रत्यक्षात तो काळ ज्यांनी बघितला त्यांनाच त्याची अनुभूती आली.

सलिम खान आणि जावेद अख्तर या जोडीने अर्थात सलिम-जावेद यांनी हा अँग्री यंग मॅन घडवला असला तरी त्याचं सातत्यपूर्ण नायक रहाणं 'Entertainment' च्या माध्यमातून जारी राखलं ते कादरखान या लेखक अभिनेत्याने अमिताभला स्वत:च्या व्यक्तीमत्वाला अधिक खुलवण्याचं काम शब्दांनी केलं. नुसते शब्द असून चालत नाहीत तर त्या शब्दांना व्यक्त करण्याचं म्हणजे शब्दफेकीचं कौशल्य असावं लागतं ते अमिताभमध्ये ठासून भरलेलं आहे.

बोलतांना शब्द जितके महत्वाचे त्यापेक्षा त्या शब्दांच्या उच्चारात असणारं योग्य अंतर (पॉझ) अधिक परिणाम साधत असतं ते अमिताभने दाखवून दिलं त्यामुळे त्याच्या समकालीन नायकांमध्ये त्याला आपलं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करता आलं.

प्रत्येक व्यक्ती स्वत:वर प्रेम करते आणि आपलं व्यक्तिमत्व श्रेष्ठ असं मानते अशा या जगात प्रत्येकाच्या मनातल्या 'मी' ला साद घालून आपली प्रतिमा त्याच्या मनात बसवण्यात अमिताभ यशस्वी ठरला.

सर्व दृष्टीने श्रेष्ठ असं अमिताभला म्हणता येणार नाही. नृत्य हा त्याचा 'विक पॉईंन्ट' त्यात तो कच्चा लिंबू मात्र आवाज हा त्याचा सर्वात स्ट्राँग पॉईन्ट म्हणून त्यानं स्वत:च्या मर्यादा ओळखून वाटचाल आजवर केली.

कथानक लिहून त्यात अभिनेते घ्यायच. गाणं लिहून त्याला संगीत द्यायचं हे सारे प्रघात अमिताभने आपल्या करकिर्दीत कालबाहय केले. लेखक लिहितांना अमिताभ नायक आहे याची जाणीव ठेवून कथानक लिहायचे, गाणीदेखील त्याच्यासाठी लिहिली जात होती. नृत्यामध्ये ता कमजोर आहे हे जाणून त्याच्यासाठी नृत्यदिग्दर्शक त्याच स्वरुपाची रचना करायचे नायक म्हणून वाटचाल करताना वेगवेगळे टप्पे या महानायकाच्या प्रवासात आले त्यात सर्वात महत्वाचा टप्पा अभिनेत्री रेखा सोबत आला अमिताभच्या कर्तृत्वाला वलय होतंच पण त्याला स्वप्नवत यश मिळवून देणारा अभिनेता बनवण्याइतपत खुलवण्याचं काम रेखा गणेशनने केलं.


अमिताभने आपल्याच क्षेत्रातील दिग्गज अभिनेत्री जया भादुरी सोबत विवाह केला मात्र त्याची चर्चा अधिक झाली नाही. अधिक चर्चा अमिताभ रेखा यांचीच झाली. अमिताभने अभिनेत्री रेखापेक्षा अणिक चित्रपट जयाप्रदाच्या सोबत केले असले तरी आजही चर्चा अमिताभ आणि रेखाचीच होते.

अमिताभ म्हटल्यावर त्याचे संवाद आठवतात आणि त्याची गाणी आठवतात अमिताभ्‍ म्हणजे जय-विरु ची जोडी आठवते. त्याचा प्रत्येक चित्रपट आगळा ठरलेला आहे. शोले असो कि दिवार त्याला सलिम जावेदची संवाद साथ होती मात्र नंतरच्या काळात व ही जोडी नसली तरी केवळ स्वत:च्या बळावर अमिताभने चित्रपट हिट केलेले दिसतात.

मनमोहन देसाई, आणि प्रकाश मेहरा यांचा तो फेवरेटच राहिला. त्याच्या चित्रपटात सर्वोत्तम बघायला आणि ऐकायला मिळायचं 'ओ साथी रे' ची धून देणारे. कल्याणजी-आनंदजी यांचा उल्लेख केल्याशिवाय हा प्रवास अपुरा ठरेल नंतरच्या काळात बप्पी लाहिरी व आदेश श्रीवास्तवपर्यंतचा संगीतप्रवास झाला असला तरी कल्याणजी-आनंदजीच्या म्युझीकला चॅलेंजच नाही. याच काळात या संगीतकार जोडीने असंच अवीट संगीत फिरोजखानच्या ही चित्रपटांना दिलं हे इथं आवर्जून सांगावं लागेल.

मिडास राजाच्या कथेप्रमाणे सिनेसृष्टीचा हा मिडास राजा, ज्याला स्पर्श करेल त्याचं सोनं करीत गेला मात्र त्यालाही अडचणींचा सामना करावाच लागला गांधी घराण्याशी असलेले घरोटयाचे संबंध आणि राजीव गांधींशी असणारी मैत्री यातून त्याने राजकारणात येण्याचा प्रयत्न केला आणि रसिकांनी त्याला अव्हरेलं त्यावेळी त्याचा उतरणीचा काळ सुरु झाला नंतरच्या काळात 250 रुपयांत अभिनेता होणारी अमिताभ बच्चन कार्पोरेशन लिमिटेड अर्थात एबीसीएल चा घाट देखील त्याला धक्का देणाराच होता.

संपला-संपला अशी चर्चा असताना या महानायकाने नवी इनिंग सुरु केली ती आजवर दिमाखात सुरु आहे. छोटा पडदा अर्थात टिव्ही या छोटया पडद्यावर पदार्पण करणाऱ्या शाहरुख खानने रुपेरी पडद्यावर आल्यावर पुन्हा वळून छोटया पडद्याकडे पाहिले नव्हते अशा काळात अमिताभने 'कौन बनेगा करोडपती ' अर्थात केबीसीच्या माध्यमातून छोटया पडद्यावर पदार्पण केले आणि छोटा पडदा आपल्या अस्तित्वाने मोठा करुन दाखवला.

अमिताभ हे सिनेदृष्टीला मिळालेलं वरदान आहे कारण त्याने ज्या-ज्या क्षेत्रात यायचा निर्णय घेतल ते गाजवलं त्यात गायनाचाही समावेश आहे. आरंभीच्या काळात चित्रपटात गायकांनाच नायक म्हणून घेत मात्र नंतर पार्श्वगायन पध्दती सुरु झाली आणि नायकांना गायकाचा उसना आवाज मिळायला लागला. अमिताभने गाणं म्हणायला सुरुवात केली आणि इतिहास घडवला. ज्या आवाजाला ऑल इंन्डिया रेडिओने नाकारलं तो आवाज साऱ्यांचा आवडता आवाज बनला.

अमिताभला राजकीय अडथळयांमुळे वाटचाल करताना अडचण कायमच आली आहे. शतकाच्या या महानायकाला भारतरत्न मिळाल नसले तरी तो बऱ्या अर्थाने भारतरत्न आहे. सचिन तेंडूलकर च्या कर्तृत्वाला ज्याप्रमाणे तोड नाही त्याचप्रमाणे भारताचं नाव जगभरात नेण्यात अमिताभचा मोठा वाटा आहे.

अशा या महानायकाला त्याच्या नव्या वाटचालीकडे वाट बघतोय इतकच प्रत्येक चाहता म्हणेल.

प्रशांत अनंतराव दैठणकर

9823199466

No comments: