Friday, 9 October 2015

प्रवास आपला टपालासोबतचा...!

नव्या पिढीला फारसा परिचित नसला तरी जाणत्या पिढीमधील तुमच्या-आमच्या पिढीत साऱ्यांनी खेळलेला खेळ म्हणजे मामाचं पत्र हरवलं आता त्या वयात निरागस असल्याने खेळताना कधी प्रश्न पडला नाही की मामाचंच पत्र का हरवायचं आणि ते नेमकेपणने मलाच का सापडायच ? यातला विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर मामाचं पत्र म्हणजे आईच्या माहेरचा दुवा होता. त्यात माहेर म्हटलं की सगळ्याच स्त्रिया हळव्या होत असतात माहेरुन ख्याली खुशाली सांगणारं त्याकळचं ते 15 पैशांचं पोस्टकार्ड जगण्याचा घटक होता आणि तो पत्र आणणारा पोस्टमन आपल्या घराकडे कधी येतो याची सर्वांना वाट असायची.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नागरिकरणाला वेग आला आणि गावातली तरुण पिढी शहराकडे वळली. ज्यांनी मातीशी नातं जपलं अशी मोठी पिढी गावातच राहिली. त्याकाळी टेलिफोन फक्त श्रीमंताघरची वस्तू होती म्हणून पत्रव्‍यवहार हा जगण्याचा घटक होता.
मुंबईत नोकरीसाठी कोकणातून आलेल्या चाकरमानी लोकांसाठी संदेशवहनाचा तो खात्रीलायक आणि स्वस्त मार्ग होता.
संदेशवहनाच्या पध्दती काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार बदलत गेल्या आता व्होडाफोनचा जमाना असला तरी पूर्वी घोडाफोनचा जमाना होता. घोड्यावरुन संदेशवाहक पाठवून राजे एकमेकांशी पत्रव्यवहार करीत तर प्रशिक्षित कबुतरांकडूनही संदेश पाठविले जात होते.
युरोप आणि अमेकरकेत टपाल व्यवस्था सुरु झाली. ब्रिटीश भारतात आले त्यावेळी त्यांनी हे साधन भारतात आणले टपालाची शिस्तबध्द वितरण व्यवस्था असणारी टपाल कार्यालये दिडशे वर्षांपूर्वी थाटायला लागली त्याकाळी तार अर्थात टेलिग्राफ ही गतीशील संदेशवहनाची यंत्रणा टपाल कार्यालयाचाच भाग होती.
अशाच 15 पैशांच्या पोस्टकार्डमुळे विलंबाने का होईना शुभवर्तमान, ख्याली खुशाली, लग्न जुळल्याच्या बातम्या कधी निधनाच्या बातम्या कळायच्या पत्र जमवून ठेवायला घराघरात तारकेट असत. याच टपाल विभागाच्या तिकिटांमुळे हजारो जणंनी तिकिट संग्रह गोळा केलेले दिसतात निरनिराळया देशांची टपालाची तिकिटे गोळा करणे हा एक चांगला छंद आहे.
पोस्टमनला बऱ्याच वेळा इतरांची पत्रे लिहून देणे तसेच आलेल्या पत्राचं वाचन करुन देणे करावे लागे. न शिकलेल्या पिढीला त्यामुळे पोस्टमन अर्थात डाकिया घरातलाच सदस्य मानत होते. त्याला दिवाळीला आवर्जून पोस्त दिली जायची.
काळ बदलला तसं संदेश वहनाचं स्वरुप बदललं मात्र आजही व्यापारी वर्ग आणि ग्रामीण भागात राहणाऱ्यांना पोस्टकार्ड जवळचं वाटतं. नव्या पिढीत आता मोबाईलवर मेसेज पाठविणं, चॅटींग करणं, फेसबुक वर केलेलं स्टेटस् अपडेट आणि व्टिटरवर केलेलं व्टिट आदी मार्ग उपलब्ध आहेत त्यातच ही मंडळी रमते. पत्र लिहिणे आता भाषा विषयात काही मार्कांपूरतं उरलं आहे.
पत्र लिहिताना मोठ्यांना केलेला नमस्कार मग पत्राचा मायना. पत्र पूर्ण झल्यावर लिहायचं राहून गेलं म्हणून लिहिलेलं ता.क. अर्थात ताजा कलम. निधनाची वार्ता कळवणं आलं की त्यात टाकलेली टीप हे पत्र वाचताच फाडून टाकणे आणि आपणही ते फाडायचं ही पध्दत या पत्रालाच तार समजून लवकर निघावे या आशयाची खास टिप आदी अनेक बाबी टपाल आणि पोस्टकार्डशी जुळलेला आहे.
याच टपाल खात्यमुळे आवर्ती ठेव अर्थात आर.डी. रिकरिंग डिपॉझिट च्या रुपाने अनेकांना व्यवसायची संधी लाभली आजही टपाल खात्याशी ही माणसं निगडीत आहेत. भविष्य निर्वाहासाठी पीपीपी. अर्थात टपाल भविष्य निर्वाह निधीच्या रुपाने अनेकांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी टपाल खात्यावर विश्वास टाकला.
9 ऑक्टोंबर हा या टपाल खात्याची आठवण देणारा टपाल दिन. आज तंत्र बदलल्यावर टपाल विभागाने  ई-ट्रान्सफर आणि ई-मनी ऑर्डर सुरु केली पण शहरात व वसतीगृहात राहून हॉस्टेल लाईफ ज्यांनी जगलय यंना या मनी ऑर्डर म्हणजे लाईफ लाईन असायची. या मनी ऑर्डरच्या भरवशावर होणरी उधारी आणि पार्ट्या यांचं सान त्यांच्या आयुष्यात एखाद्या आठवणीच्या कुपीसारखं आहे.
लष्करी सेवेत असणाऱ्यांना सिमेवरुन घरी पैसे पाठवणं आणि आपली खुशाली कळवणं या साठी टपालाचाच आधार आहे. संदेसे आते है हमे तडपाते हे हे बॉर्डर चित्रपटातलं गाणं याचा भावनेला व्यक्त करणारं आहे.नाम चित्रपटात पंकज उधासने गायलेल व त्याच्यावरच चित्रित झालेल चिठ्ठी आई है या गाण्यावर हॉस्टेल मधले मित्र रडताना मी बघितले आहेत. डाकिया डाक लाया हे काका अर्थात सूपरस्टार राजेश खन्नावर चित्रित झालेलं गाणं असो की स्मिती पाटीलचं हमने सनम को खत लिया ही गाणी डाकिया, डाकबाबू अर्थात पोस्टमन आणि टपालाचं महत्व अधोरेखीत करतात.
आजही टपाल खातं महत्वाची कामगिरी बजावत आहे. अंगडिया सेवा आल्यवर खाजगी सेवेचा दर्जा पाहून अनेक जण कुरिअरकडे वळले असले तरी महत्वाचे दस्तऐवज पाठविण्यासाठी आजही टपाल खात्याची स्पीडपोस्टसेवा पसंद केली जाते. 
टपाल खात्यात असणारा आरएमस अर्थात रेल मेल सर्व्हीस आजही गतीमान प्रवास तुमच्या-आमच्या आयुष्यात अगदी महत्वाचा आहे. घरोघरी जाऊन टपाल वाटप करणारा पोस्टमन आणि त्याच्याशी निगडीत यंत्रणेला टपालदिनी सलाम आणि चौकातल्या लाल रंगाच्या टपाल पेटीलाही सलाम.


                             -प्रशांत अनंत दैठणकर- 

No comments: