Monday, 7 December 2015

कॉफी पेस्ट आणि फॉरवर्ड ....!

आपण आपल्याशी संवाद कधी केला अखेरचा? हा प्रश्न खुप महत्वाचा आहे. धावपळ आणि नाही त्या गोष्टी मागे पळणे आधीच सुरु आहे. अशा स्थितीत आज इन्टरनेटच्या जाळयात सारेच अडकले आहेत. आपलं स्वत:चं काय बघण्यापेक्षा संगणक आणि मोबाईलच्या त्या खिडकीतुन जगाच काय चाललय हे बघण्याची उत्सुकता अधिक आहे. काही जणांच आयुष्यच या जाळयात फसलेलं दिसतयं.

सकाळ व्हावी ती निसर्गाच्या साथीनं. पुर्वेला निसर्गाची ती रोजची रंगपंचमी बघत सूर्याच्या साक्षीनं. तो रोजच येतो पण त्याच्या येण्याच्या छटा रोज वेगळ्या असतात. तो पहाट वारा आणि त्याला साथ देणाऱ्या पक्षांचा किलबीलाट हे सारं काही भुरळ पाडणारं असच आहे. मात्र इथं पहाट होते ती गुड मॉर्निंग च्या संदेशाने अणि दिवसाचा शेवटही गुडनाईट स्वीट ड्रीम म्हणत. थकवा इतका येतो की हल्ली स्वप्न देखील पडत नाहीत.

आपण इतर प्राण्यांप्रमाणे असलो तरी काळाच्या प्रवाहात आपण आपल वेगळं स्थान निर्माण केलय. हे शक्य झालं ते आपल्या सामाजिक जाणीवा विकसित झाल्यामुळे. आता या जाणिवा आपण अधिक प्रमाणात दाखवतो. पण त्यात कोरडेपणा वाढला याला कारण अर्थातच आजकालचं हे सोशल नेटवर्कीगचं असणार फॅड होय.

आपण आपल्या जाणिवा आणि भावना व्यक्त कराव्यात यासाठी धडपड करीत असतो. सोशल नेटवर्कींग माध्यमांनी हीच बाब नेमकेपनान हेरली आणि त्यांनी अभिव्यक्तीसाठी नवं व्यासपीठ उपलब्ध करुण दिलं. आता आपण आपल्या सोईनुसार हा अर्थ सहज लावत असतो मात्र या नाण्याला व्यावसायिकरणानी दुसरी बाजू देखील आहे याचा आपल्या मनात विचार देखील येत नाही.


या व्यवसायिकरणाचा उलगडा 13 वर्षेपुर्वीच आपणास झाला शताब्दीचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या "कौन बनेगा करोडपती" या रियलीटी शो मध्ये आपण एस एम एस केला की आपल्याला किमान लाख रुपये तरी मिळतील या अशेपायी कोटयवधी जणांनी एस एम एस केले. साधारण एसएमएस आणि हे एसएमएस यांच्या दरात तफावत होती. त्या एका कार्यक्रमात कोटयवधी रुपये कमावून केवळ दिवसाला एक लाखाच प्रसंगी तीन लाखाच बक्षिस दिलं गेलं हे या माध्यमानी लोकांच्या भावनांशी खेळून पैसे कमावणं होत.

रुपयाचं मुल्य घसरलय म्हणत काय होतय दहा रुपयात असं तुम्ही - आम्ही म्हणायचं आणि शक्कल लढवण्याची अक्कल असणाऱ्यांनी करोडपती व्हायचं असाच हा खेळ. यातूनच आता हातात आलेल्या स्मार्टफोननं क्रांती घडवली. भावना खरेपणानं किती जण व्यक्त करतात? यातील नव्वद टक्के हे "कॉपी पेस्ट आणि फॅारवर्ड" अशा गटातील आहे.हे फॉरवर्ड म्हणजे पुरोगामी नाहीत. त्यातूनच नाही नाही ते विषय चर्चेला येतात आणि मेसेजची राळ उठते. सलग दोन वर्षे तोटयांत राहणारी बीएसएनएल सारखी शासकीय कंपनी यामुळे यंदा चक्क नफ्यात आली आहे. जय हो नेटवर्कींग असच म्हणावं लागेल.

गेल्या काही दिवसात झालेले वाद बघतांना वाटतं की भारतात असणाऱ्या सर्व समस्या संपल्या सारं काही "ऑल इज वेल" आहे. म्हणून आपण समाजाच्या प्रश्नावर चर्चेची गुऱ्हाळं लावत आहोत. आजचा चर्चेचा विषय राष्ट्राचा विकास, संपन्नता आणि सधनता नसून आमीर खान ची बायको काय म्हणाली आणि इम्रान खानची बायको विमानाच्या कॉकपीटमध्ये कशी बसली असे आहे. राष्ट्रभक्तीवर मला आक्षेप नाही तो कुणालही असनार नाही. पण चेन्नईत भुतो न भविष्य ती राष्ट्रीय आपत्ती असता आपण आपला वेळ कुठे व कसा घालवतो यावर आहे.

सध्या चर्चेचा विषय अर्थातच असहिष्णूता आणि सहिष्णू भारत . नाक्यावर ठेला लाऊन फळ विकणारा संध्याकाळी घरात खायला मिळेल का या चिंतेत आहे. पाण्याअभावी महाराष्ट्रात अनेक भागात शेतकरी संकटात आहे. चेन्नई पुराने त्रस्त आहे. यात अडकलेल्या कुणालाही विचारा त्यांना या आपत्तीत सावरणं महत्वाच आहे. दिलेले पुरस्कार परत करणाऱ्यांनी सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातुन चर्चा घडवून आणली ती नेमक्या कोणत्या हेतुने याचा आपण वेध घेतच नाही "फक्त कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड" चा उद्योग सुरु राहतो.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात‍ सैनिक कमी लढतील सारी युध्दे याच तंत्रज्ञानाने लढली जाणार आहेत याच भान आपल्याला आल पाहिजे. "पीके" वरुन गाणि डाऊनलोड करुन ऐकणाऱ्या आपल्या मुलांना त्या वेबसाईडवरचा धोका कधी समजाऊन सांगितला का, मुळात तो आम्हालाच माहित नाही. शत्रु राष्ट्रे आपणास गाफील करुन आपली महत्वाची माहिती नेत आहेत हे वास्तव आहे. याला कारण आम्हीच. आम्ही इतके बिझी आहोत कार चालवण्यात की आम्हाल थांबून पेट्रोल भरायलाही वेळ नाही.

कुठेतरी थांबून आपण यावर विचार केला पाहिजे आल भान जागवलं पाहिजे यासाठी हा लेखनप्रपंच

प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

No comments: