Friday, 11 December 2015

साहेब ... !

काही व्यक्तीमत्वे आयुष्याहून अधिक उंच होत असतात आणि अशी उंची गाठणारी माणसं असणारा प्रांत म्हणून आपल्या महाराष्ट्राचे नाव घेता येईल. एक कुशल राजकारणी संवेदना असणारा नेता, उत्तम प्रशासक, उत्कृष्ट वक्ता आणि संघटक .. शब्द कमी पडतील इतक्या गुणांसह वाढणारं हे व्यक्तीमत्व राजकारणासोबत कला, क्रीडा आणि संस्कृती यातही आपली छाप टाकतं असं एक आणि एकमेवाव्दितीय व्यक्तीमत्व अर्थात साहेब..!

पश्चिम महाराष्ट्रात साहेब म्हटलं की बाकी काही ओळख देण्याची गरज नसते ती ओळख हळूहळू संपूर्ण राज्याने आणि आता देशानेच नव्हे तर जगाने मान्य केलीय. होय साहेब 75 वर्षाचे होत आहेत. आरंभी अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा द्यायलाच पाहिजे. "शरदचंद्र पवार" हे त्या उत्तुंग अशा व्यक्तीमत्वाच नाव.

शरद पवार यांच्या व्यक्तीमत्वाला अष्टपैलू नाहीतर सहस्त्रपैलू आहेत असं म्हणावं लागेल. राजकारण सारेच करतात परंतु राजकारणातील गट-तट बाजुला ठेऊन या नेत्याच्या अमृतमहोत्सवाला राष्ट्राच्या प्रथम नागरिकापासून साऱ्या पक्षांचे सारे बडे दिग्गज उपस्थित राहतात. हा आदर उगाच प्राप्त होत नाही त्यामुळे साहेब म्हणतांना आनंद वाटतो आणि मराठी मातीतला माणूस हिमालयाची उंची गाठतो. या अभिमानाने प्रत्येक मराठी माणसाची छाती रुंदावते.

मराठी माणसाने या आधीही खूप उंची गाठली त्यात शरद पवारांच स्थान माझ्या मते खूप वेगळं आहे. ते वेगळेपण आपण जाणूनच घेतल पाहिजे. काँग्रेसची सत्तासुत्रे हायकमांड चालवते हे काही नवं नाही. ज्या काळात अर्जूनसिंग आणि इतर नेत्यांच्या रांगेत राज्याचा क्रमांक खूप खाली यायचा आणि नवं नेतृत्व मान्य करणाऱ्या काँग्रेसने सोनिया गांधींना नेता म्हणून स्वीकारलं त्यावेळी त्या रांगेत न उभ राहता स्वतंत्र पक्षाची निर्मिती करुन या नेतृत्वाच्या बरोबरीने बसण्याची ताकत कमावली. इतकंच नव्हे तर नंतरच्या काळात सत्ता चालवतांना त्या नेतृत्वापेक्षा मोठं होवून आपण राजाकारणातील "चाणक्य" आहेत हे साहेबांनी दाखवून दिलं.

अठरा पगड जाती, धर्म, प्रांत, भाषा आणि तितकेच राजकीय पक्ष अशा स्थितीत बहुपक्षीय सरकार चालविण्यासाठी सर्वमान्य नेतृत्व लागतं अशी मोट बांधण्याची ताकद गेल्या काळात दोनच महाराष्ट्रीयन माणसांकडे आहे हे देशानं बघितलं. यात भाजपासाठी चाणक्य असणारे दिवंगत प्रमोद महाजन आणि दुसरे अर्थातच शरद पवार.

सर्वात कमी वयात मुख्यमंत्रीपद प्राप्त करतांना देखील काँग्रेसच्या विरोधात जावून स्वत: पक्ष बांधण्याची आणि तो यशस्वी करण्याची किमया करणारा किमयागार ही साहेबांची ओळख.

1993 च्या लातूर भूकंपात तातडीने धावणारा त्यांच्यातील माणूस अतिशय जवळून बघितला. संवेदनशिलता हे खरं यशाचं गमक हे त्याच क्षणी जाणवलं. अजातशत्रू अशा साहेबांनी ज्या क्षेत्रात पाऊल टाकलं त्याचं सोनं केलं अगदी क्रिकेटचं देखील. आयुष्यात याच अजातशत्रुपणामुळे त्यांना कधी पराभवाचं तोंड पहावं लागलं नाही. बीसीसीआय च्या अध्यक्ष पदापासुन आयसीसी च्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचतांना त्यांनी बीसीसीआय ला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ बनवून दाखवलं.

सत्तेत असतांना देशाच कृषीमंत्री पद आणि नसतांनाही आपत्ती व्यवस्थापन व देशाचं नेतृत्व साहेबांनी केलं. इतकी उंची गाठल्यावरही दौऱ्यावर फिरतांना कार्यकर्त्यांस नावानिशी ओळखणारा आणि आत्मीयतेने संवाद साधणारा नेता साऱ्यांनाच भावतो हेच साहेबांच्या यशाचं गमक आहे. अशा या मोठया मनाच्या साहेबांना मनापासुन अमृत महोत्सवी सदिच्छा .. !
प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

No comments: