Friday, 11 December 2015

संघर्षयात्री

वक्तृत्व अणि संघटन यांच्या जोडीला मनमिळाऊपणा आणि रुबाबदार व्यक्तीमत्व असे सारे शब्द ही अल्पशी ओळख आहे एका संघर्षयात्रीची. संघर्ष आणि संघटनातून शालेय राजकारणापासून राज्याचे उपमुख्यमंत्रीपद आणि नंतर केंद्रीय मंत्रीपद असा आलेख असणारं मराठवाड्यातील व्यक्तीमत्व अर्थात दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे.

गोपीनाथराव आज हयात नाहीत हे मराठी माणसाचं दुर्दैव म्हणावं लागेल. काळाच्या ओघात हवी हवी वाटणारी माणसं नेमकी निघून जातात हा अनुभव त्यांच्या जाण्याने आला. राजकारणात असतांना पक्क्या मित्राला देखील कडवा विरोध करुनही मैत्री जपणारा हा खरा मैत्र अशीही त्यांची ओळख.

बुलंद मुलख मैदानी तोफ असं हे नेतृत्व सर्वमान्य असं नेतृत्व होतं. महत्वाकांक्षा सारेच बाळगतात मात्र ती पूर्ण करण्यासाठी ज्या अग्नीपथावरुन चालावं लागतं आणि जो संघर्ष करावा लागतो त्यासाठी कुणाचीच तयारी नसते. मात्र या नेत्याचा आयुष्याचा प्रवास वेगळा आणि सर्वांनी आदर्श घ्यावा असाच राहिलेला आहे.

मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख म्हणायचे मराठवाडा ही संथांची भूमी आहे. त्या संथ झालेल्या समाजप्रवाहाला जागृत करुन प्रगतीच्या दिशेला नेण्याचं काम गोपीनाथरावांनी केलं. आपल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या काळात धाडसी निर्णय काय असतात ते कसे घ्यावे हे दाखवून दिलं. विलासराव आणि गोपीनाथराव राजकीय पटलावर दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते होते. मात्र त्यांच्या मैत्रीमध्ये हे राजकारण कधीच आलेले आपणास दिसणार नाही. दिवंगत केद्रीय मंत्री प्रमोद महाजन हे नात्यातीलच झाले मात्र त्याआधी त्यांची असणारी मैत्री अखेरच्या क्षणापर्यंत जपण्याचं काम गोपीनाथरावांनी केलं. या तीन राजकारणी व्यक्तीमत्वांनी मराठवाड्याला मराठवाडा ही नेत्यांची भूमी आहे असं सिध्द करण्याचं काम केलं.
वक्तृत्व हा गोपीनांथरावांचा खास गुण होता. नेते अनेक होतात अनेकांनी अनेक पध्दतीने राजकारणात यश प्राप्त केलं पण त्यातील सारेच जण वक्ते नव्हते. सभेला गर्दी होणं ही खरी लोकनेत्याची ओळख होती. या बाबतीत कुणाचंच दुमत असणार नाही की गोपीनाथराव खरे लोकनेते होते.

सत्तेत असताना त्यांना जितका आदर मिळाला तितकाच आदर विरोधी पक्षात बसतांनाही सर्वांनी दिला. अभ्यासपूर्ण भाषनांनी विधासभेत आवाज बुलंद करतांना देखील अधून-मधून मार्मीक भाषा वापरण्याची त्याची शैली सगळयांनाच भावणारी होती.

सत्तेचा सोपान चढल्यानंतरही जमिनीवरच पाय ठेवणे आणि माणुसकी जपणे ही गोपीनाथरावांची खास ओळख. राजकारणी व्यक्तीमत्वामागे एक हळवं मन जपलेला असा हा आगळा संघर्षयात्री ... अशा या लोकनेत्याला विनम्र अभिवादन.

प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

No comments: