Saturday, 16 January 2016

दो बूंद जिंदगी के...!


देशात असणारी जनजागृती वाढत गेल्याने भारतातून आपणास पोलिओ हद्दपार करण्यात यश आले आहे. या आपल्या भव्य अशा आसेतुहिमाचल पसरलेल्या देशाचा भौगोलिक विचार आणि मोठी लोकसंख्या असताना हे काम अतिशय अवघड आणि अशक्यप्राय काम करण्यात आले आहे. आपली आरोग्य यंत्रणा तसेच शिक्षण यंत्रणा यांचा यात मोलाचा वाटा आहे. तितकाच मोलाचा वाटा माध्यमांनी यात उचललेला आहे. हे आपणास जाणून घ्यावे लागेल.

आपल्या देशात जितके प्रांत तितक्या भाषा असं आहे. त्यातही प्रत्येक राज्यात 10 कोसावर भाषा आणि भाषेचा लहेजा बदलत असतो. संपूर्ण देशाची एक भाषा नसणे, यामुळे पोलिओ हद्दपार करण्याचे काम अतिशय मोठे आव्हान होते.

प्रसिद्धी मोहिम अनेक पद्धतीने राबविण्यात येतात. त्यामध्ये पोलिओसाठी राबविण्यात आलेले प्रसिद्धी अभियान हे सर्वांना मार्गदर्शक असे ठरले आहे. ब्रॅन्ड तयार केला जातो त्या पद्धतीने या मोहिमेसाठी प्रथमच ब्रॅन्डसेटींग झाले. कोणत्याही अभियानाला काही टॅगलाईन आवश्यक असते ती सर्वोत्तम आणि अगदी साध्या सोप्या भाषेत असणारी टॅगलाईन या मोहिमेला देण्यात आली ."दो बूंद जिंदगी के" अशी सर्वांना लक्षात राहील, अशी टॅगलाईन सर्वांच्याच लक्षात राहणारी होती.

ब्रॅन्डसेटींगमधील अन्य संकल्पना या मोहिमेत "पोलिओ रविवार" च्या रुपाने वापरण्यात आली. रविवार हा तसा सर्वांचा सुटीचा दिवस पण "पोलिओ रविवार" च्या माध्यमातून लोकांचे लक्ष वेधून लोकांना मुलांच्या आरोग्य आणि चांगल्या भविष्यासाठी घराबाहेर पडण्याची सवय यानिमित्ताने लावली गेली. आज व्हॉटसॲप आणि ट्वीटरच्या काळातल्या पिढीला संदेश वहन हे खूप सोपे प्रकरण वाटते. 10 सेकंदात हजारो लोकांपर्यंत संदेश पोहोचविण्याची क्षमता आज तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे प्रत्येकाच्या हातात आली. 1998 साली या पोलिओ मोहिमेला आरंभ झाला. त्यावेळी मोबाईलचे नव्याने आगमन झाले होते. फोन करुन बोलायला जसे पैसे लागतात तसे इनकमिंगसाठीही मिनिटाला 16 रुपये लागत. असा तो काळ त्यामुळे ही प्रसिद्धी मोहीम जुन्याच प्रसिद्धी तंत्राचा वापर करुन सुरु झाली होती.

या मोहिमेसाठी अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर, ए.आर. रहेमान तसेच जॅकी श्रॉफ यांनी ब्रँन्ड अम्बॅसिडर म्हणून काम केलं. मात्र प्रसिद्धीचे सर्वाधिक वलय असणारा महानायक अमिताभ बच्चन हा शतकातील महानायक या पोलिओ प्रसिद्धी मोहिमेचा खरा चेहरा बनला. लोकांच्या मनात वेगवेगळ्या वयात गेल्या 45 वर्षात या महानायकाने अनेक पिढ्यांसमोर कामे केली आणि त्यांच्या आठवणीचा भाग बनला. त्यामुळे सर्वाधिक लोकप्रियतेचा फायदा या महानायकाने या प्रसिद्धी मोहिमेस करुन दिली.

17 जानेवारी 2016 पुन्हा एकदा पोलिओ रविवार आला आहे. आपल्यातील प्रत्येकाने घराघरातील 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ डोस मिळेल याची खात्री करुन घेतली पाहिजे. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आले. आता जिंकलयं ते राखण्यासाठी अधिक काटेकोरपणे प्रयत्न करायचे आहेत. केवळ हाच उद्देश नसून येणाऱ्या भारतात एकही पोलिओचा रुग्ण राहणार नाही व आरोग्य संपन्न अशी नवी पिढी हे आपले ध्येय असले पाहिजे. देता ना मुलांना दो बूंद जिंदगी के...

-प्रशांत अनंतराव दैठणकर,

No comments: