Tuesday 19 January 2016

तू आणि पाऊस माझ्यासवे...!

पाऊस उगाच पडतो... निवांत शांत जानेवारीतली पहाटेची निरव वेळ आणि जरास दाटून आलं भावनांप्रमाणेच... याला काय पर्याय ही तर आपली भावनांची दिंडी. असं म्हणून गुड मॉर्निग करायला आरशाकडे वळलो. एकल अन् एकटेपणा अपरिहार्य असल्याने आताशा पहाटे स्वत:लाच बघायची सवयच झाली... दर्पणात माझ्या नजरेला नजर भिडली आणि त्यातून साद प्रतिसादाचा खेळ सुरु झाला.

एकाकी होण्यापेक्षा एकटं राहणं चांगल असं म्हणायचं सुरु झालेला आत्मसंवाद केव्हा पुन्हा त्या मंतरलेल्या दिवसांकडे घेऊन गेला तेच कळलं नाही. एखाद्या चित्रपटातला प्रसंग समोर दिसावा तसा तो यौवनपट स्पष्टपणे नजरेसमोर फिरायला लागला. काळाच्या ओघात आज या वळणावरुन मागे वळून बघतांना मग प्रश्नांची वर्तूळं पायाशी गुंता करताहेत असं जाणवतं.

आज शब्द संपावर गेलेत की विस्मरणात असा सवाल पडतो त्याकाळी चहाच्या एका कपासाठी पैसे गोळा करुन तुझ्या भेटीची वाट बघणं... रस्त्यात वावरणाऱ्या तुला नि मला एकत्र पाहून साऱ्यांच्याच नजरा वळत होत्या त्या नजरबंदीतून चालत त्या छान अशा हॉटेलचा तो कोपरा गाठणं. कागदी फुलांच्या अर्थात बोगनवेलीच्या तटबंदीत पायाखालची वाळू खेळवत त्या एका चहावर तास न् तास गप्पा मारणं... काय असायचे त्या संवादाचे विषय असा आज मनातला आणखी एक सवाल.

सारं जग बघत असलं तरी आपण कसं चोरुन भेटतोय याचं असणारं "थ्रिल" आजही रोमांच उभे राहतात मग आज काय झालं... संवाद कुठे विरला, हरवला की विसरला..... प्रेमात सर्व क्षम्य असतांना घडणारा संवाद आणि आज हा शब्दांचा दुष्काळ.

लग्न म्हणजे सप्तपदी पण असं काय वेगळं घडतं डोक्यावर अक्षता पडल्यावर की साऱ्या भूमिकाच बदलतात मग उगाच वाटतं तू माझी पत्नी व्हायला नको होतं... तू अशी अबोल होशील असं माहिती असतं तर लग्नाचा विचारच सोडला असता....लग्न हा विधी, आनंद सोहळा की लग्न म्हणजे बंधन अशी प्रश्नांची रेल्वे धावत राहते.

एक सच्चा मैत्र अस असणारं मैत्रीच नातं वेगळ्या नात्यांची गुंफण होताच कसं काय संपू शकतं. टिपिकल शब्द देखील चपखलपणे लागू पडावा असा बदल प्रत्येकीत का होतो ? मग विचार गती घेतात "जागून ज्याची वाट पाहिली ते सुख .." असं म्हणतांना कमावण्याचं स्वप्न आणि त्यासाठीची धडपड समोर येते, कमावलेलं राखायचं देखील असतं ते राखतांना साऱ्या मनोभुमिका एका रात्रीतून कशा काय बदलू शकतात.

त्या दोघांच ते जगणं पुन्हा डोळ्यावर तरळतं मग चार्ली आठवतो.. धंद होवून पावसात भिजणारे अनेक आहेत. ती धुंदी तो कैफ निराळा असतो..... इथं त्याला तर स्वत:चे अश्रु लपवण्यासाठी पावसात जावं असं वाटतं.

भावना अनावर झाल्यावर इथं अस तिथं काय असाही सवाल येतो. अनाहुतपणे त्याची आठवण तीव्र होत जाते. चार्लीचं सोडा हे तर तुझं आयुष्य आहे. दर्पणातून माझ्याशीच मी बोलत असतो... मन एव्हाना शांत झालेलं म्हणून खिडकीबाहेर दोन्ही हात पसरल्यावर जाणवतं त्याच दान खूप मोठ आहे.... कारण हातावर याही दिवसात आठवणीला प्रतिसाद देत पावसाचे थेंब नाचत असतात. पावसाच्या त्या थेंबानी मधला काळ धूवून टाकलाय जणू असं म्हणत मन पुन्हा बाईकवर रस्त्यावरुन पाऊस अंगावर झेलत वेगानं पुढे जातेय असं जाणवतं .. अण त्याचवेळी अरे हळू..... असं म्हणत तू भिजल्या अंगानं पाठीला बिलगलीय असं जाणवतं...!

प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

No comments: