Monday, 7 March 2016

कॅमेरा..क्रांती.. करप्शन अन् कॅरेक्टर करेक्शन..!

Add caption
आजपासून २०० वर्षांपूर्वी सन १८१६ साली या कॅमेरा क्रांतीची सुरुवात झाली. निसफोर निसे नामक एकाने सिल्व्हर आयोडाईडचा थर दिलेल्या तांब्याच्या एका तुकड्याला आयोडिनची वाफ देऊन जगातली पहिली प्रतिमा कैद केली. ही प्रतिमा छायाप्रतिमा होती. प्रकाशाशी अत्यंत संवेदनशील अशा या रसायनाचा तो चमत्कार होता. २ वर्षे अभ्यास करुन त्याने प्रकाश नियंत्रित करण्यासाठी एका लाकडी खोक्याचा वापर केला हा जगातला पहिला कॅमेरा होता.

त्या आधीच्या काळातही वेगवेगळ्या साधनांचा वापर करुन प्रतिमा एका ठिकाणावरून दुस-या ठिकाणी बघण्याची पद्धत सुरू झालेली होती मात्र प्रतिमा जतन करण्यासाठी कैद करण्याचा हा पहिलाच यशस्वी प्रयोग होता. याची झलक आपण नुकतीच बाजीराव मस्तानी चित्रपटात बघितलेली आहे.

कॅमेरा तयार करताना आपण खूप मोठा इतिहास घडवत आहोत याची त्याला कल्पना असणार यात वादच नाही मात्र २०० वर्षांच्या कालखंडानंतर सारं जग दिवसभर याचा वापर करेल आणि खूप मोठी क्रांती घडणार याची त्याला कल्पना नसावी.. आज मात्र ती क्रांती घडलेली आहे. आणि जगात सर्वात मोठा उद्योग होण्याच्या मार्गावर आहे हे येथे नमूद करावे लागेल.

सांग दर्पणा मी कशी दिसते.. हा प्रत्येक तरूणीचाच सवाल असतो असे नाही तर प्रत्येकाचं व्यक्तीगत विश्व असतं आणि जगापेक्षा प्रत्येकाला त्या विश्वात डोकावायला आणि रममाण व्हायला अधिक आवडत असतं. आजचं युग हे सोशल नेटवर्कींगचं युग आहे. यात सर्वाधिक धारक संख्या Instagram आहे यावरून काय ते आपणास लक्षात येऊ शकेल कारण ते फक्त फोटो शेअरिंगचं माध्यम आहे. फोटो अर्थात छायाचित्र हा सा-यांचाच विकपॅाईंट आहे ना.

आता ही कॅमेरा क्रांती नेमकी काय आहे याची आपण माहिती घेतलीच पाहिजे. या कॅमे-याने करप्शन अर्थात भ्रष्टाचाराला लगाम बसायला सुरूवात झाली आहे.
. कॅरेक्टर करेक्शनसाठी ( चारित्र्य सुधारणा ) याचा हातभार लागत आहे. आपण म्हणाल हे कसं काय.. कोणत्याही मॅालमध्ये किंवा दुकानात आपण जातो त्यावेळी आपणास फलक दिसतो आपण कॅमे-याच्या निगराणीत आहात.. तिथच आपल्या चारित्र्याच्या सुधारणेला आरंभ होतो. कुणी चोरीच्या इराद्याने आत आलेले असेल तर कॅमे-याच्या भितीने चोरी करीत नाही.

हिंदी चित्रपटात एक डायलॉग आपण ऐकतो नेहमी.. "कोई देखे ना देखे उपरवाला देख रहा है.". कुणीतरी पहात आहे म्हटल्यावर आपणही नकळत चेहरा आणि केसावरून हात फिरवतोच ना.
या कॅमे-याने जशी चित्रपट उद्योगाची निर्मिती केली तशीच माध्यमांची ताकद वाढवली. ऐकणे .. वाचणे आणि बघणे या तीन वेगळ्या प्रक्रिया आहेत. यासाठी आपण आपली तीन वेगळी ज्ञानेद्रिये वापरतो. यात आपला विश्वास कशावर आणि किती ठेवायचा यावर अनेकदा आपल्या मेंदूला कसरत करावी लागते.
ऐकलेले सारे खरेच कशावरून..?
वाचलं ते विश्वास ठेवण्यासारखं असतंच असं नाही..!
दिसतं तसं नसतं..!
मेदू किती किचकट काम करीत असेल याची कल्पना आपणास यावरून येईल. आपल्या निर्णयप्रक्रियेत या तीनही प्रक्रियांचा वापर करून विश्लेषण होत असते आणि अखेरीस आपल्या बुद्ध्यांकानुरूप आपण निर्णय घेतो. यात सर्वाधिक महत्व आपण आँखो देखी अर्थात नजरेने बघितलेल्या बाबीला झुकते माप देतो. आपण सर्व ठिकाणी एकाचवेळी जाऊ शकत नाही अशा स्थितीत कॅमेरा आणि त्याच्या मदतीने काढलेले छायाचित्र आपल्या मदतीला येत असते. ही उपलब्धी गेल्या २५ वर्षात झपाट्याने झालेले तंत्रज्ञानातील विकासामुळे प्रत्येकाच्या हातात आली आहे ती स्मार्ट फोनच्या रूपात.

छायाचित्र काढणे आणि क्षणार्धात ते जगभर पाठविणे आता शक्य आहे. दृष्टीआड सृष्टी या पद्धतीने देशात राजसत्ता सांभाळणा-या कॉंग्रेसच्या नेत्यांना या क्रांतीची जाणीवच झाली नाही आणि सारं काही नजरेसमोर आता दिसायला लागलेल्या नवी नजर आलेल्या पिढीने देशाची सत्ता नरेंद्र मोदींना सोपवली.. ही कॅमे-याने घडवलेली क्रांती इथे थांबलेली नाही तर ती प्रशासनात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यापर्यंत गेली आहे.

      मक्याने आपल्या चित्रपटात न बांधलेल्या विहिरीचे अस्तित्व सिद्ध केले असले तरी आता उपग्रहाच्या माध्यमातून खरेच काम झाले की नाही याचा पुरावा प्राप्त होत आहे. आपली कामे करून घेण्यासाठी लाच मागणारे आणि देणारेही आहेत यांनाही या कॅमे-यात कैद करून आता ख-या कैदैत पाठवणे सोपे झाले आहे त्याचमुळे करप्शनला अटकाव आता
होवू लागला आहे.

दादागिरी करणा-यांना त्यांच्या कृत्याची आता हिंमत होईनाशी झाली आहे कारण कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये छायाचित्र घेईल किंवा शूट करेल याची भिती बसली आहे. अशी कृत्ये कॅमे-यात कैद झाल्याने गुन्हे दाखल होत आहेत. गुन्हेगारांना पकडण्यासही कॅमे-याची सर्वाधिक मदत आज होत आहे.

याच कॅमे-याने २४ तास मनोरंजनाचा रतीब घालणा-या वाहिन्यांच्या उद्योगाला जन्म दिला लाखोंना काम दिलय आणि करोडोंना मनोरंजन. साता समुद्रापार असलेल्या मित्राशी, मुलांशी आणि नातेवाईकांशी आता समोरासमोर व्हिडिओ कॉलच्या आधारे बोलता येतं सा-या जगाला जवळ करण्याचं काम या कॅमे-याने केलं आहे..

कॅमे-याने आणलेली सेल्फीची क्रेझ आणि आपण ही बाब काही नवी राहीलेली नाही हे वेगळं सांगायला नको..

                                                                                                                                                    छायाचित्र
आणि त्याचं वेड ... त्यात मी इंटरनेवरून सर्वप्रथम वापरलेलं लोकमतच्या प्रवासातील पहिलं छायाचित्र प्रिन्सेस डायनाच्या अंत्ययात्रेचं होतं.. याची आज आठवण झाली. नेटवरील छायाचित्र छापण्याचा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग होता हे देखील सोबतच आठवतय
. प्रिन्स चार्ल्सची पत्नी ही ओळख घेऊन जगासमोर आलेल्या या प्रिन्सेसने जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अतिशय बुद्धीमान असणा-या या सुंदरीचा मृत्यू तिचा पाठलाग करणा-या पापारात्झी            ( छायाचित्रकार ) मुळे झाला होता.. अर्थात या मृत्यूला जबाबदार कॅमेरा होता.

प्रशांत अनंतराव दैठणकर

९८२३१९९४६६No comments: