Tuesday 13 October 2015

हुई और भी मुलायम...!

सहजपणे बोलतांना टपली मारावी त्या पध्दतीनं काल तिनं माझ्या कानावर फोनव्दारेच टपली मारली. संवाद प्रेमाचा चालू असताना हो ना ते प्रेम 20 व्या वर्षी कळत-नकळत होतं असं म्हणताना...उरलेलं 40 व्या वर्षी होतं आणि 80 व्या वर्षी बॅलन्स NIL होतो अशी पुस्ती जोडली. फोनवरलं संभाषण सरलं मात्र आता सुरुवात झाली ती आत्मसंवादाची.

महाविद्यालयातले ते दिवस...शाळेत असतांना कुतूहल असणारा तो विषय प्रत्यक्षात शाळेतून लाजत - बावरत किंचितसं घाबरतच ती महाविद्यालयाची पायरी गाठली त्या क्षणी जाणवलं की शाळेचे ते दिवस कसे चिमण्यांचा थवा उडून जावा आणि फांदी रिकामी व्हावी असे नजरेसमोर उडाले...झाड रिकामं आणि पारंब्या...त्या वडाला बांधलेला सुवासिनींचे धागे तितके उरावे अशी स्थिती.

त्या धाग्यांप्रमाणे स्मृतीचे धागे आणि त्यांचं रिंगण झाडाभोवती सातत्याने गहिरं होत होतं वर्षागणिक त्या भाविकतेने साता जन्माचा पती का मागतात याचं बालसुलभ कुतूहल संपून तारुण्यात पाऊल ठेवताना स्त्रियांचा तो ' सूता वरुन स्वर्गा ' चा मार्ग जरा खटकला पण जगरहाटी...चालायचं तसं...आणि आपल्यालाही थांबता येत नाही काळाची गती आपण पकडली नाही तरी लोककला लटकलेल्या गर्दीमध्ये आपसूक पुढे ढकलला जातो आणि फलाटावर उतरतो तसा काळ आपल्याला चालवत असतो.

चालत चालत इथवर आल्यावर मागे वळून बघतांना आपण स्वत:लाच धुंदीत जगताना बघायचं धुंदी असते वयाची एक प्रकारचा तो कैफ म्हणतात ना वय वेडं असतं...म्हणून काय इतका वेडेपणा करायचा असं टोकणारे होतंच ना पण त्यांचं ऐकायला वेळ आहे कुणाला...विषय नसताना रंगणाऱ्या त्या गप्पांच्या मैफली नेमक्या कसल्या होत्या आज कुणालाच सांगता येणार नाही...सारं कसं मंतरलेलं जग होतं.

ती पाहताच बाला...असा कलिजा खलास झालेल्या त्या खलाशांचे जहाज आज स्थिरावलेले दिसते कारण त्यावेळी असणारं Love at first Sight खरं असलं तरी तो पहाटवाऱ्यात प्राजक्त फुलांवर पडलेल्या दवबिंदूचा आनंद होता...झाडाच्या पानापानांवर पडणारी ती 'ओस की बुंदे ' कोवळया उन्हात विरुन जायची तशी स्वप्नं ही अनेकांना दवबिंदूच्या रुपातलं मृगजळ ठरली होती…… आसपास हिरवळ आणि सुगंधाचा दरवळ असताना काही वेडे पार या स्वप्नांच्या मृगजळामागे धावताना दिसले.

मुकद्दर का सिकंदर मधला तो सिकंदर मेमसाबच्या मागे अन मेमसाब वकिल बाबूच्या प्रेमात आणि प्रेमवेडया सिकंदरच्या प्रेमात हिरा चाटून (हे कसं काय बुवा आजवर कळलेलं नाही) जीव देणारी जोहराबाई आणि त्या जोहराच्या प्रेमाने वेडा झालेला दिलावर.... असं न पुरं होणारं वर्तूळ आणि त्याचं ते " धकाधकी " चं आयुष्य...बघता बघता त्या मेमसाब कुण्या वकिलबाबूचा हात धरुन पाखराप्रमाणं उडून गेल्या याची चिंता करणारे लढवय्ये सिकंदर मित्र आसपास वावरत होते...नुसतं गंमत म्हणून बघायचं दुसरं काय.

खरच वय वेडं असतं...त्या वयात प्रेमात पडलो आणि काय...पडतच गेलो. आज त्याबाबत टोचणी देण्याचा प्रयत्न करणारे कमी नाहीत शेवटी 'कुछ तो लोग कहेंगे...' म्हणत बेधूंदपणाने आपण आपलं चालत रहायचं इतकंच त्या वयात कळत होतं. सुखावलेले कमी आणि दुखावलेले प्रेमभंग झालेले जीव अधिक...तुला कसं Character नाही असं हिणवतात तेव्हा हसू येतं...चारित्र संपन्न व्यक्तीमत्वाचा धांडोळा घेतांना मग अधिकच हसू यायला लागतं...संपन्न असं चारित्र वगैरे सारं अंधश्रध्दा असतात…….. जगणाऱ्याला ते जाणवतं Character by Choice आणि Character by Force यात फरक असतो... " हमसे आया ना गया तुमसे बुलाया ना गया" असं म्हणत या सैन्याच्या अनेक फळया धारातिर्थी होवून अपरिहार्यपणे चारित्र्यसंपन्न झाल्या...... त्यांचाही सार्थ ( ? ) अभिमान वाटतो.
ती माझ्या राशीची नाही...अपने को नही पसंद,..... म्हणत तिची ओळख न होताच तिला बिनलग्नाचा घटस्फोट देणारे अनेक जण आता चारित्र्यसंपन्नतेची झुल पांघरलेले बघतो त्यावेळी अधिकच हसू येतं...त्यातही जहाल - मवाळ अशी गटवारी होती. जहाल गटवारीतील युवक छाती पुढे काढून ' वो मेरे दिलमे प्यार की तरह और मै उसके दिल मे नासूर की तरह रहूंगा' असं म्हणत शैार्यपूर्वक शहादत स्विकारुन शौर्यपदकाच्या सन्मानासह चारित्र्याच्या महामार्गावर मार्गस्थ झालेले बघितले त्या बिचाऱ्यांना आज बाजारात बायकोसोबत हातात पिशव्यांच्या ढाली घेऊन लढणाऱ्या ' भाजीप्रभू ' च्या रुपात लढताना बघून वाईट वाटतं...आधीच पावन झालेल्या या नश्वरांनी खिंड लढवायचा विचार करायच्या पूर्वीच स्वत:ला खिंडीत सापडलेलं बघून सभ्यपणाचं पांढर निशाण काढलेलं बघितलय...


खरच वय वेडं असतं... "नशीब प्रत्येकाचं असतं असं नाही आणि नशीब प्रत्येकावर रुसतं असही नाही " ...कोणाचं कसं हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग म्हणावा लागेल.

अर्धांगिनीला अर्धसत्य सांगा असं म्हणणाऱ्यांना माझं पूर्ण सत्य पटणार नाही...प्रेमात पडून आता वीस वर्षांच्या खंडानंतर अगदी खरोखर 'वीस साल बाद' सारं पूर्णसत्यात अर्धांगिनीला सांगितल्यामुळे काय काय घडू शकतं याची अनुभूती घेताना अचानक चाळीशीच्या उंबरठयावर ती दिसते...आणि हो दगडं कशी पाझरणार...वितळायलाही मेणासारखं मऊ असावं लागतं कदाचित खंबीर असणारं मन अधिक हळवं होतं की हळवेपणात कणखरपणा अधिक असतो ...पण पुन्हा प्रेमाचं विश्व तरुण मनातलं तारुण्य शरीरालाही तरुण ठेवतं असंच काहीसं...

धुंद वाऱ्याच्या लहरींसोबत अलवारपणे खांद्यावर दोलायमान खांद्यावर रुळणारे गेसू ... बाईकवर वय विसरुन एक्सलेटरचा कान पिळून वाऱ्याशी युध्द खेळणारं शरीर आणि त्यातलं मन आजही त्याच वयाचा 20 व्या वर्षात जगायला भाग पाडतं आणि वय वेडं असतं...आणि मावळतीला जाणाऱ्या सूर्यासोबतच्या प्रवासात ती हळूवार गाणं गुणगुणते कानावर शब्द तालासह नाचायला लागतात.

हुई और भी मुलायस मेरी शाम ढलते ढलते......

प्रशांत अनंतराव दैठणकर

9823199466

6 comments:

Dr.sandip lanjewar said...

हुई और भी मुलायम मेरी शाम धलते धलते । खूप सुंदर लिखाण आहे सर

Dayanand Kamble said...

Great writing..

Anirudha Ashtaputre said...

Class. The expressions are touchy , from bottom of your heart.

ऊन - सावली said...

खूपच सुंदर👌👌👌

ऊन - सावली said...

खूपच सुंदर👌👌👌

ऊन - सावली said...

खूपच सुंदर👌👌👌