Saturday 4 August 2018

फ्रेन्डशिप. दोस्ताना .. याराना...मैत्री....!

 भारतीय हे मुळातच उत्सवप्रीय आणि तो उत्सव मग कोणताही असो, कोणत्याही धर्माचा असो त्याचे भारतियीकरण करुन आपण साजरे करायला सुरुवात करतो..... असाच गेल्या 3 दशकात लोकप्रिय झालेला उत्सव अर्थातच ' फ्रेन्डशिप डे ' होय.

चित्रपटवेडया भारतीयांनी शोले चित्रपटाला खूप प्रतिसाद दिला. त्यातली ती जय-विरुची जोडी हे दोस्तीचं प्रतिक जितकं सर्वांच्या लक्षात आहे तितकाच अमिताभ-अमजद खानचा याराना लक्षात आहे. रुपेरी पडद्यावर देास्ती फार जुना विषय आहे.....!

एकमेकांचे सुख दु:ख वाटून एकरुप होत जगणं,... म्हणजे मैत्री अशी साधी सोपी व्याख्या सांगता येईल पण मैत्रीचं नातं त्याच्याही पलिकडे जगलं जातं.... भावनिक ओलावा.... भावनिक पोकळी.... आणि मानसशासत्रीय दृष्ट्या बरेच असे पैलू आहेत ज्यावर मैत्रीचं हे नातं निर्माण होत असतं.

या मैत्रीच्या नात्यात आणि विवाहात खूप फरक आहे हे देखील सोबत सांगावं लागतं..... लग्नानंतर जोडीदाराशी मैत्री होणं वेगळं आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात व पुढे विवाहात होणं वेगळं मैत्रीला नात्याच्या बंधनाची गरज नसते....मैत्री म्हणजे give and take नसते....
कोणतीही अपेक्षा न ठेवता अर्थात निरपेक्ष वृत्तीने एखाद्याशी ' वेवलेंग्थ ' जुळली तरच पक्की मैत्री होत असते.

शाळेत वर्गात 40-50 मूलं मुली असतात ते वर्गमित्र असतात... आसपास आपण अनेक जणांसोबत काळ व्यतीत करतो.... खेळतो... ते सवंगडी असतात.... त्यात काहीच जणांना आपण मित्र म्हणून जवळ करतो....! आपल्या जमेच्या बाजू जगासमोर आरडून सांगण्याची आपली वृत्ती ही नैसर्गिक आहे.... पण आपल्यातला कमीपणा आपण जगाला सांगत नाही.... तो शेअर करायला आपल्याला 'मित्र' लागतात....! ते एक वेगळं मोकळं असं नातं... चूकल्यास चूक दाखवून देणारं.. त्याचा वाईटपणा वाटत नाही आपल्याला... एकमेकांसाठी झोकून देणं... काळ वेळ याचे भान हरपणं.. म्हणूनच मी म्हणतो की मैत्री ही शंकराच्या मंदिरासारखी असते.... शंकराच्या मंदिराला दार असतं नाही.. ते कायम खुलं असतं....

आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की, त्या आपण सख्ख्या नात्यात शेअर करत नाही अगदी पत्नीसारख्या नात्यातही शेअरिंगच्या मर्यादा असतात.
असा आडपडदा मैत्रीच्या नात्यात राहत नाही....!

लम्हे चित्रपटात एक सुंदर दृश्य आहे. नायक अनिल कपूर एका संतापाच्या क्षणी त्याची सावली बनून राहणाऱ्या मित्राला, अनूपम खेरला माझ्या आयुष्यातून निघून जा असं सुनावतो त्यावेळी अनुपम खेर म्हणतो.... मै नही जा सकता, मुझे पता है तुम्हे रोनेके लिये एक कंधेकी जरुरत पडती है..... हनी इराणीने मैत्रीच्या नात्यातील हा पदर मोठया नजाकतीने समोर आणला आणि अनुपम खेरने आपल्या अभिनयातून तो अजरामर केला..... त्याचं सोनं केलं.

हिंदी चित्रपट सृष्टी गाणी, नातेसंबंध आणि भावना यांचं सुरेख मिश्रण आहे. त्यात असंख्य चित्रपट याच फ्रेंडशिपवर आधारलेले आपणास दिसतील......!

सात अजुबें इस दुनियां में आठवी अपनी जोडी....

तोडे से भई टुटे ना ये धरम-वीर की जोडी .....!

धमेंद्र आणि जितेंद्रची ही जोडी एक काळी खूप गाजली होती..... त्या मैत्रीच्या नात्याला अधोरेखीत करणारा असा हा चित्रपट होता.

मैत्रीचे अनेक पैलू विविध चित्रपटात आपण बघितले आहेत. याच मालेत अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा ' दोस्ताना ' प्रचंड यशस्वी ठरला होता....

पता कोई पुछे तो कहते है हम
के इक दुजे के दिलमें रहतें है हम....!


मैत्री अशीच असते ते नातं खूप खूप वेगळं नातं आहे.... यात दोस्त.... हो पक्का आणि सच्चा दोस्त़ इच्छा, आकांक्षा पुर्ण जाणून असतो. त्यामुळेच सच्चा दोस्त पक्का वैरी होण्याचाही मोठा धोका असतो.... भावनिक खुलेपणा कधी कधी वेगळे आणि कठीण असे प्रसंग आयुष्यात निर्माण करु शकतो याचीही जाणीव असावी असा पाठ देणारा हा ' दोस्ताना '.

विषय मैत्रीचा आहे म्हटल्यावर शोमन राज कपूरला कसं विसरता येईल.

दोस्त दोस्त ना रहा.....!
प्यार प्यार ना रहा....


अर्थातच चित्रपट ' संगम ' मैत्रीच्या नात्यात फूट पडणं काही नवं नाही पण हे अंतर केवळ गैरसमजातून पडतं.... कधी कधी ' अहं ' आडवा येतो..... पर चलता है दोस्ती मैत्री थांबत नाही.

पठाणाच्या भूमिकेतला प्राण ज्यावेळी मित्र बनतो त्यावेळी.

यारी है इमान मेरा ....यार मेरी जिंदगी....!

सारखं मैत्रीचं उदाहरण समोर येतं...
मैत्रीच्या या नात्याचा चित्रपट कथानकात सर्वात चांगला वापर फिरोज खानने केला... त्याला विनोद खन्ना सारखा उमदा नायक मैत्री साठी सापडला होता.... 80 च्या दशकातला ' कुर्बानी ' असो की 90 च्या दशकातला ' दयावान ' या दोघांची ऑनस्क्रीम आणि ऑफस्क्रीन मैत्री सर्वांसाठी आगळं उदाहरण ठरली.

चित्रपटांपलिकडे या मैत्रीचा विचार करु त्यावेळी अमेरिकेत पहिला फ्रेंडशिप डे साजरा झाला. त्याला उद्या बरोबर शंभर वर्ष पुर्ण होतील..... 1919 मध्ये सर्वप्रथम अधिकृत ' फ्रेंडशिप डे ' साजरा झाल्याची नोंद आहे. आपल्या भारतात हल्ली याचं महत्व वाढलय. जगभरात अनेक देशात संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला फ्रेंडशिप डे हा 30 जुलैला साजरा होतो.

आम्हाला उत्सव साजरा करायला दिला की, आम्ही त्याला भारतीय रंग देऊन मोकळे होतो. त्यामुळे मैत्र या नात्याची ओळख म्हणून ' कृष्ण-सुदाम्याचे ' नाते आम्ही समोर करतो.... चारच दिवसांपुर्वी टिळक पुण्यतिथीला सोशल मिडियावर लोकमान्यांनी न खाल्लेल्या आणि न उचलायच्या शेंगाची टरफलं पसरली तसं या मैत्री दिनी आता येणारे 48 तास सुदाम्याचे पोहे सर्वांना सापडतील.

...... चाळीशी ओलांडल्यानंतर मैत्री होणं अवघड अशा स्थितीत मैत्री टिकवण्यासाठी ' फ्रेडशिप डे ' साजरा करायचा पण त्यातील किती जणांना ' फ्रेंडझोन ' माहिती आहे ?.... फ्रेंडशिप डे च्या पलिकडली वाटचाल करणाऱ्या नव्या पिढीलाच ते माहिती आहे....!

चाळीशीतल्यांनी फक्त प्रार्थना करायची. ...
. सलामत रहें दोस्ताना हमारा.....!

Happy Friendship Day.

 प्रशांत दैठणकर

9823199466

2 comments:

Anonymous said...

लई भारी

TERRIOR said...

The best.