Tuesday 7 August 2018

लाईफ . . असही . . !


पिंपळपानांची संथ.. लयबद्धशी सळसळ

 अंगणभर नुसता सडा गुलमोहराचा

अन् पसरलेला लिंबाचा पाचोळा

त्यावर घुमणारा तो  झाडूचा नाद

वैशाख वणव्यातही येणारी अल्हादक झुळूक 

धीर - गंभीर आवाजात साद देणारी

मंदिरातली भव्य पितळी घंटा

अन् त्या सादाचा गावभर येणारा पडसाद . .

सांज समय . . . मंद मंद  तेवती समई 

दारोदारी तुळशीत तेवणाऱ्या ज्योती

कुठे तरी दूरवरच्या अंगणात

न थांबलेला चिवचिवाट

शुभंकरोती . . म्हणणारे चिमुकले सूर

शांत चित्तानं जोडलेले दोन हात

शांत . . शांत . . संथ असं आयुष्य





भॉ s s s करत भेकत निघालेली 6.41 ची फास्ट

स्टेशन सरताना कमी होत जाणारा

सारा गलक्याचा आवाज

एकमेकांना चिकटून घट्ट उभी गर्दी . . .

घामानं निथळणारे कोमेजले चेहरे

उगाच . . वारा घालतोय अंसं दाखवणारा

असमर्थ असा लटकता पंखा

त्याही गर्दीत वाट काढणारे फेरीवाले

घर दूर अन् आठवण मनात

घरी . . वाट बघणार एक दार आहे . .

रेटयानं उतरणं, गर्दीतून सावरत

वाट शोधत पुन्हा फेरीत लागणं

केवळ रंगांचा गोंधळ . . मात्र

वासाचा पत्ता नसलेला तो गजरा

आवडीनं . . की सवयीनं . . ? घ्यायचा

रांगत जाणाऱ्या रांगेत आपणही

मुंगी होवुन रिक्षा पकडायची

मनासह थकल्या देहानं घर गाठायचं


घराघरातील किचनमध्ये

धडाडत्या कुकरच्या शिटटयांचा ऑर्केस्ट्रॉ

अन् कॉरिडॉरमध्ये घुमणारा

सास - बहू सिरियलचा आवाज

दिवसभर अंग - पलंग मोडून थकले

छातीत हवा भरुन पार्कातनं परतणारे

सक्रीय आयुष्यातून बाद झालेले

पेन्शनधारी मुंग्यांचे घोळके



घर - दार प्रसन्न करुन

दोन घडी हसण्याचा प्रयत्न करतानाच

दुसऱ्या दिवसाच्या रणांगणाची

तयारी करत... शस्त्र फळीवर ठेवणारे

बिच्चारे चाकरमानी योध्दे


आयुष्य असंच . . कुठं सक्रीय

कुठं गंभीर तर कुठं निक्रीय

आपण . . फक्त बघायचं

पर्याय नाही असं म्हणत प्रत्येकानं

शेवटच्या श्वासापर्यंत धीरानं

मरण येत नाही म्हणत जगायचं

------------------------------ मुंबई ते डोंबिवली . . 10-4 2001 

प्रशांत दैठणकर
9823199666


2 comments:

Unknown said...

छान कसे काय जमते बुवा तुला असे सुंदर सुंदर लेख लिहायला 👍🙏

Prashant Anant Daithankar said...

Thanks Kalyan ..
This is nothing but Maa Saraswati Ki Krupa...