Wednesday 1 August 2018

हाथ से छूकर इसे रिश्तोंका इल्जाम ना दो ....


ती आठवणीतली . . लहानपणीची . . कोणास ठाऊक आज कुठे आहे ती ? त्या वेळी ती माझी सावली असल्याप्रमाणे वावरायची आज मला वेळ नाही अन् कदाचित तिला फुरसत नसावी . .. संसाराच्या राम रगाडयात गुंतली असणार हे नक्की . . .!

माझी उंची जेमतेम 5 फूट होती त्यावेळी वर्ग आठवा . . . आजही आठवतो आणि तिची उंची साधारणपणे 6 फूट . . . सशक्त . . . शाळेच्या बास्केटबॉल टिममध्ये होती . . . रंग गोरा पान आणि लोभसवाण्या मुखडयावर पडणारी ती खळी . . . त्यात अधिक जमेची बाजू म्हणजे निचे घारे आणि टपोरे डोळे . .
. मला सहसा घाऱ्या डोळयाची माणसं आवडत नाहीत पण ती आवडायची . . . !

साऱ्या गल्लीभर होणारी ती चर्चा कानावर कधी आली तरी आम्ही दोघांनी त्याकडे कधी लक्ष दिलं नाही आठवी ते दहावीच्या त्या प्रवासात ती माझी सखी होती ती माझी राधा होती . . . मैत्र आणि मैत्रीच्या पलिकडे मनात कुठलाही विचार कधी आला नाही . . निखळ मैत्री, मुलगा आणि मुलगी हो मुलगा आणि मुलगी यांच्यातही निखळ मैत्री होवू शकते याचं ते उदाहरण होतं प्रत्यक्षातलं . . आज मागे वळून बघितल्यावर जाणवतं . . . मन निष्कलंक, निष्पाप असेल तरच अशी मैत्री होते . . तशी ती मैत्री होती . . . !

ती मुलगी असूनही मित्र मात्र ' गर्लफ्रेंड' म्हणता येणार नाही. असं नातं जपंल होतं. त्यात ती राजस्थानी असल्याने माझ्या घरी तिला अन् तिच्या घरी मला घरच्यासारखं अगदी कुटूंबातील एक व्यक्ती आहे असं म्हणून वागणूक मिळायची.

तिच्या अंगणात भलं मोठं पिंपळाचं झाड आणि त्याचा पार होता. त्या पाराजवळ बैदूल अर्थात गोटया खेळणाऱ्या गल्लीतल्या साऱ्या मुलांचा सकाळ संध्याकाळ कल्ला सुरु रहायचा साधारण एकाच वयोगटातील गल्लीत असणाऱ्या मुलांची संख्या 35 पेक्षा अधिक होती.
त्या मुलांनी गोटया खेळायला सुरुवात केली डावावर डाव जिंकत गोटयांची संख्या इतकी वाढायची की चक्क परात घेऊन गोटयां फेकाव्या लागत होत्या तो रंगलेला डाव तासनतास बघण्यातील गंमत वेगळीच होती.

टि. व्ही विरहीत असलेल्या दिवसांमध्ये शाळेचा वेळ सोडला तर बाकी सारा वेळ हा फक्त खेळण्यासाठी होता आणि विशेष म्हणजे ते सर्व खेळ मैदानी होते. नाही म्हणायला उन्हाळी सुट्टयात दुपारच्या उन्हात जायची बंदी असलेल्या काळात एखाद्याच्या घरात बसून ' व्यापार ' खेळणे किंवा पत्त्यामधील लाल पान सात , पाच तीन दोन तर कधी झब्बू असे खेळ रंगायचे. गल्लीत कॅरम दोन- तीन जणांकडेच होता. अगदी हक्काने माझा पार्टनर म्हणून ती हट्ट करायची .

माझ्या सोबत दुपारी घरात बसून आईच्या हातचं जेवण हा दोघांचा दुपारचा नित्यक्रम ठरलेला . घरं तसं खूप मोठं नव्हतं साधारण 12 बाय 12 ची एक खोली त्यामध्ये आई - नाना मी आणि दोन लहान बहिणी असा परिवार जागा रहायच्या दृष्टीने छोटी असली तरी मनात भरपूर जागा असल्यानं ती माझ्या घरातली एक सदस्य बनली होती.

प्रशांत मुझे History -Geography पढाओना असा तिचा हट्ट पुरवण्याचं काम मी देखील आनंदानं पार पाडत होतो. इतिहास आणि भूगोल या विषयात मला पैकीच्या पैकी मार्क मिळायचे त्यामुळे शाळेतही तसा आग्रह असायचा तिची मातृभाषा मराठी नव्हती. त्यामुळे तिला हे विषय अवघड वाटत होते . .
आमच्या दोघामध्ये एक साम्य होतं ते गणिताच्या बाबतीत . . . दोघांचं मैत्रीचं गणित पक्क होतं पण अभ्यासातील गणिताच्या विशेषत: अंकगणिताचा विषय नावडीचा होता.

दिवसामागून दिवस जात राहिले आणि मैत्रीचा धागा अधिक घट्ट झाला . . . त्याच सुमारास गल्लीतलं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी घर घेतलं दरम्यानच्या काळात नववी व दहावी दरम्यान आमच्या दोघांच्या मैत्रीत आणखी एक मैत्रीण Add झाली होती त्यामुळे मैत्रीची रंगत अधिकच वाढली होती.


घर बदललं त्याच सुमारास दहावी पूर्ण होवून सायन्सला प्रवेश घेतलेला तिने मात्र दुसऱ्या कॉलेजला प्रवेश घेतला होता. घर आणि महाविद्यालय दोन्ही दुरावल्यावर नव्या विश्वात सामावून घेताना नवे मित्र होत गेले बदलाचं आणि अधिकाधीक बदलण्याच हा काळ होता. त्याच सुमारास माझी आणि विजयाची भेट झाली . . . पहिल्याचं भेटीत तिने खणखणीत सवाल केला लग्न करणार असेल तरच . .पहिली भेट आणि स्विकार . . . आयुष्याला पूर्ण कलाटणी होती ती . मी बाराव्या वर्गात तर विजया अकरावीला त्या भेटीनंतर जग बदललं. . . या नात्यात आता ब-यापैकी अंतर  पडलं होतं . . .हे अंतर नंतरच्या काळात वाढतच गेलं.... हळू हळू संपर्क कमीच झाला आणि भेटी होईनाशा झाल्या एव्हाना तिच्या कुटूंबियांच्या दृष्टीनं ती लग्नाच्या वयात आलेली अन् झटपट लग्नही झालं होतीच ती तितकी सुंदर अगदी आरसपानी सौदंर्य म्हणतात तसं ते सौदंर्य . . माझी गल्ली सुटली आणि मैत्री देखील . . .सुटले नाहीत ते आठवणींचे धागे... काळ आपल्या गतीने चालतच आहे मात्र आठवणींचे धागे देखील काळासोबत अधिक घट्ट होताना मला जाणवतात हा प्रवास असाच चालणारा असतो हे काही वेगळं सांगायला नको...
त्या वयात असणा-या तिच्या सौंदर्याची भूरळ इतरांना निश्चितपणे पडली होती. . आजही कटरिना कैफ पडद्यावर दिसली की तिची आठवण येते . . . अगदी तशीच सुंदर होती ती . . . इतक्या वर्षांनी आठवण . . . येते अधून - मधून . . मन कधी एखाद्या क्षणी त्या काळात गेलं तर तिची आठवण येते . . . ते मैत्रीचं नातं आठवून आनंद होतो . . !

ती कुठे असते . . . किंवा ती सध्या काय करते याची उत्सुकता असली तरी आजवर मी त्याबाबत कधी विचारणा केली नाही . . . माहिती घेण्याचाही प्रयत्न केला नाही . . . काही नाती फक्त नशिबानं मिळतात . . . ते भाग्य दोघांचं होतं . . . ती तिच्या विश्वात असेल अन् मी माझ्या विश्वात . . . !

त्या वयात पडलेलं ते स्वप्न समजून आजवर ते नातं उरात जपलय . . .
वहीत ठेवलेल्या पिंपळपानांसारखं, तिची ती निखळ मैत्री . . . ते सौंदर्य अन् ते घारे डोळे . . . आता इतका काळ गेलाय की तिचा चेहराही धुसर झालाय स्मृतीत गेला... आज ती एखा्द्या वेळी समोरून गेली तरी मी तिला ओळखेनच याचीही खात्री नाही माझ्या मनाला..... आठवणीत असणारी  अजूनही 12- 13 वर्षांचीच आहे  आता तीच आठवण जगायची ... तिच्या आठवणी सोबत गाणं अंतर्मनात वाजायला लागतं.

हमनें देखी है इन आखोंमे महकती खुशबू

हातसे छुके इसे रिश्तोंका इल्जाम ना दो . .


निखळ मैत्रीतली ते निष्पाप प्रेम आजही नात्यात बांधायचा विचार देखील मनात येत नाही . . कदाचित आयुष्य अशाच नात्यांची गुंफण असतं .

प्रशांत दैठणकर

9823199466 



2 comments:

Archnana Shambharkar Gadekar said...

ती सध्या काय करते? तरल भावनांचं सुरेख सादरीकरण

TERRIOR said...

मस्तच