Wednesday 8 August 2018

"पिकनिक" ब्रेक तो बनता है !


पिकनीक हा शब्द आपण ऐकतो, पिकनीक स्पॉटला भेटी देखील दिल्या आहेत आणि पिकनीकवर जाण्याचा आग्रह धरला जातो. परंतु पिकनीक चा इतिहास आणि त्याची आवश्यकता यावर आपण कधी गांभीर्याने बघितलेले नसणार. पिकनीक आणि मानसिक आरोग्य यांचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि शारिरीक आरोग्यासाठीही पिकनीक आवश्यक ठरत असते.

एखाद्या निसर्गरम्य ठिकाणावर घराबाहेर फिरताना घेतले निसर्गभोजन अशी पिकनीकची व्याख्या करता येईल. अशाठिकाणी मोकळे मैदान, आरामासाठी खोल्या असाव्यात अशा ठिकाणी घरुन पिकनीक बास्केट मध्ये जेवणाचे पदार्थ घेऊन यायचे आणि तेथे मोकळया वातावरणात बार्बेक्यू करणे तसेच सॅन्डविच व इतर खाण्याचे पदार्थ बनवणे.
खेळ खेळणे, निसर्ग भटकंती करणे मग भोजन करणे आणि आराम करणे अशा स्वरुपाच्या पिकनीकची सुरुवात 15 व्या शकतकाच्या सुमारास झाली अशा नोंदी आपणास इतिहासात सापडतात.

मनुष्य प्राणी उत्क्रांत झाल्यावर आरंभी टोळयांमधून जगभर फिरला त्यानंतर समाज घडण्याची सुरुवात झाली. समाज म्हणून स्थिरावल्यावर शेती आणि इतर आवश्यक व्यवस्था अस्तित्वात आल्या मात्र त्या काळात आयुष्याला फारशी गती प्राप्त झाली नव्हती. आयुष्याला गती प्राप्त झाली यातून पुढील काळात राजेशाहीत समाज घटकांची वाटणी झाली यामध्ये मध्यमवर्ग किंवा कामगार वर्ग असा प्रवास सुरु झाला.

सलग काम करण्यातून येणारा थकवा आणि एककल्लीपणा दूर करण्याच्या भूमिकेतून अधून-मधून निसर्ग भटकंतीतून पुन्हा ताजेतवाने होणे या भूमिकेतून कुठेतरी पिकनिक शब्दातील भ्रमंती सुरु झाली. याला निश्चित असा लेखी पुरावा उपलब्ध नाही मात्र 15 व्या शतकानंतर या स्वरुपाची पेंटींग्ज त्या काळात रंगवली गेली. त्यांचा पुरावा मानून पिकनीक आपणास सांगणे शक्य आहे.

18 व्या शतकात आलेल्या औद्योगिक क्रांतीनंतर आयुष्याला अधिक गती वाढली त्यासोबतच श्रमिकांची संख्या वाढली. या श्रमिकांकडून सतत काम करुन घेताना त्यांची काम करण्याची क्षमता हळुहळू कमी होताना दिसत होती. यातूनच धार्मिक आधारावर युरोपमधून प्रथम रविवारी सुटी घेण्याची प्रथा सुरु झाली. हा श्रमिक वर्ग या साप्ताहीक सुटीचा वापर पिकनीक साठी करायला लागला.

आरंभी आसपासच्या जागांवर होणारे हे ठराविक काळानंतरचे पिकनीक नंतर कोटयवधींचा व्यवसाय बनलेल्या आणि जगाला गवसणी घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या आपल्या प्रत्येकासाठी पर्यटन उद्योगात विस्तारीत होताना आपण बघितलाय.

पिकनीक का आवश्यक आहे...
यांच उत्तर रुटीनमधून चेंज हवा म्हणून, असे देता येईल. ती जितकी आपली शारिरीक गरज आहे त्याहीपेक्षा ती आपली मानसिक गरज अधिक आहे असे सांगता येईल. मानसशास्त्रीय अभ्यासातून असा हा पिकनीकचा ब्रेक आपणास आयुष्यात आवश्यक आहे हे सांगता येते.

सतत आजारी राहणाऱ्या व्यक्तीला डॉक्टर सल्ला देतात की जरा हवापालट होईल असे बघा. याचं कारण विविध ठिकाणी शहरी भागात आज प्रदुषणाने हवेतील घातक घटकांचे प्रमाण वाढलेले आहे. दमा किंवा तत्सम श्वसन विकार असणाराच नव्हे तर प्रत्येकाला याचा त्रास होत असतो. निसर्ग भ्रमंती करतांना चांगल्या दर्जाची प्राणवायू ने भरपूर असणारी हवा आजारातून सुटका करण्यास लाभदायी ठरते. त्यामुळे शारिरीक सुधारणा आणि तंदुरुस्तीसाठी पिकनीक आवश्यक ठरते.

आज घराघरात आई-वडील आणि मुलं हे आपआपल्या मोबाईलवर स्वत:च्या आभासी विश्वात गुंतत चालले आहेत. त्यामुळे कुटुंबातील नैसर्गिक बंध धोक्यात आले आहेत. घरात कुटुंबातील व्यक्तींचा संवाद कुंठला आहे. आणि जवळपास संपत आला आहे. अशा या आजच्या काळात चार दिवस वेगळया ठिकाणी आणि वेगळया विषयावर कुटुंबात चर्चा झाली तरच हे बंध पूर्ववत होवू शकतील यासाठीही पिकनीक आवश्यक आहे.

आपआपसातील संवाद वाढण्यासोबतच
पिकनीकच्या माध्यमातून आपणास नात्यांमध्ये मोकळेपणा निर्माण करणे व काळासोबत धावतांना ताणलेले संबंध सुधारणे आणि एकमेकांबाबत असणारे गैरसमज दूर करणे व नात्यांमधील दुरावा संपविणे अशा पिकनीकच्या माध्यमातून शक्य होत असते. यासाठी ही पिकनीक आजकाल आवश्यक झाले आहे.

अशा प्रकारच्या पिकनिक मध्ये दैनंदिन जीवनात असणाऱ्या बंधनातून मन सहाजिकच मोकळे होते. त्यामुळे त्याचे लक्ष इतर बाबींकडे जाते. यातून करायच्या राहीलेल्या गोष्टी करण्याकडे सर्वांचे लक्ष जाते. ज्यातुन बॅडमिंटन पासून बुध्दीबळासारखे खेळ खेळले जातात. यातुन शारिरीक व मानसिक पातळीवर झाल्या गोष्टी विसरुन नव्याने सुरुवात करण्याची मनोवृत्ती जागी होते. आणि वेळोवेळी आयुष्यात असे घडले तर मानसिक पातळीवर तरतरी कायम राहते असे आपणास दिसते.

पिकनीक' दरम्यान आपण जे खेळ खेळतो त्यातून आपले स्नायू मोकळे करण्यासोबत..... तणावाखाली आलेले मन मोकळे करण्याची संधी आपणास मिळते. त्याच सोबत येणाऱ्या काळात येणाऱ्या तणावाखाली मन तयार करण्याचा मार्ग देखील सापडत असतो.......  लहान मुलांसाठी उन्हात खेळणे आवश्यक आहे परंतु आजकाल नेटवरील खेळातून त्यांना ती फुरसतच मिळत नाही. आपली हाडे कॅल्शियमपासून तयार होतात. हे कॅल्शियम साधारण वयाच्या 30 वर्षापर्यंत शरीरात जमा होते.
आणि त्यानंतर त्याचा साठा होत नाही तर ते केवळ खर्च होत असते. उन्हात खेळताना सुर्यप्रकाशातून मिळणारे व्हिटामिन डी-3 हे हाडे मजबूत करीत असते. त्यामुळे जितका वेळ लहानपणी उन्हात खेळण्यात जातो तितका काळ हाडे मजबूत राहतात त्या दृष्टीकोणातूनही पिकनीक लाभदायक ठरते.

त्याचा मूड ठिक नाही असे आपण म्हणतो......., हा मूड म्हणजे तत्कालिक मानसिक अवस्था असते. थोडासा मोकळेपणा आणि वेगळे वातावरण मिळाल्यावर हाच मूड बदलायला वेळ लागत नाही....मूड बदलण्यासाठी देखील या प्रकारच्या पिकनीकची मदत होते. ... म्हणतात ना मूड होता नहीं है... मू़ड बनाना पडता है..

माझ्या दृष्टीने पिकनिकचा सर्वात मोठा फायदा कोणता असेल तर तो या काळात घडणारा आत्मसंवाद होय. टिपिकल अशा ऑफिस किंवा कामाच्या रुटीनमधून बाहेर पडताना घरी आल्यावर घरच्या कामांची जंत्री वाट बघत असते. त्या पूर्ण करुन होतान न होतात तोच पुन्हा नव्याने स्पर्धेत धावावे तसे कामाला जुंपून घ्यावे लागते. हे एक प्रकारचे न टाळता येण्यासारखे दुष्टचक्र असते. यातून बाहेर पडणे म्हणजे पिकनीक होय.

पिकनीकच्या काळात शब्द बदलतात,..... माणसांची संगत बदलते..... आपणाला जाणणारी आणि मनापासून जपणारी माणंसं आपलं कुटुंब आपल्यासोबत असतं जे आपल्या पडत्या काळात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभं राहत असतं. जगातल्या साऱ्या संकटांचा मुकाबला करण्याचं बळ आपणास देत असतं.
रोजच्या धावपळीत आणि धकाधकित आपण तेच तर Miss करीत असतो. पिकनीकच्या निमित्ताने ते पाठबळ पुन्हा आपणास मिळतं.

आपण काय स्वप्न बाळगलय, आणि आज वास्तव काय आहे. यात अंतर पडत असेल तर आपलं नेमकेपणानं काय चुकतय या साऱ्यांचा परामर्ष घडवून आणणाऱ्या आत्मसंवादाची संधी पिकनिक आपणास देते.

पिकनिकला मराठीत सहल असा शब्द आहे. " फूलपाखरं आली सहलीवर...... रविवारची सुटी घालवू.......चला घडीभर गंमत करु " असं एक छानसं गाणं आहे. गाण्यात जी घडीभरची गंमत सांगितली आहे त्याचा अर्थ खूप गहन असाच आहे.

" पिकनीक " शब्द तसा छोटा पण यातून आयुष्याला नव्याने उभारी देण्याची ताकद आहे....
. त्यामुळे आपणही वेळ काढून पिकनीकसाठी भ्रमंती करायला पाहिजे....... ही काळाची नव्हे तर प्रत्येकाची मानसिक आणि शारिरीक गरज आहे.

मग करतायना प्लान पिकनिकचा ...... !

-प्रशांत दैठणकर
9890422826

No comments: