Friday 3 April 2020

स्मृतींची ग्रहणे

तीच सळसळ पिंपळपानांची... अंगणभर पसरत जाणारा त्याचा आवाज आणि सोबतीला तो रातराणीचा दरवळ.. दिवस ते अभ्यासाचे आणि परिक्षांचे तसेच आज ते आठवणीत राहिलेल्या तुझ्या त्या प्रेमाचे .. निमित्त होतं ते अभ्यासाचं आणि तो बहाणा होत हे तुलाही कळत होतं.. तू अबोला धरलास तरी तुझे बोलके डोळे सारं सांगत होते.. ते ताजे झाले पुन्हा आज रात्री जाग अचानक आल्यावर.. कसे आणि किती झरझर सरले ते आज आठवतंय.. अनेक क्षण येतात आयुष्यात ज्यावेळी आपण गाफिल राहतो आणि ते निघून गेल्यावर हातात सोनं पाहून निराश झालेल्या ते परिस शोधणा-यासारखी आपली अवस्था होत असते.. हातात लोखंडाचं सोनं झालेलं पण चालण्याच्या नादात परिसाचं भान राहिलं नाही..
ते आयुष्याला सोनं करणारे क्षण हाती कधी येवून गेले ते कळलं नाही मात्र आयुष्याचं सोनं झालं हे खरं आहे.....

काही दिवस असेच असतात की जे आठवणीत पुन्हा पुन्हा जगले जातात आणि ते आयुष्याचा प्रेरणास्रोत म्हणून कायम मनाच्या एका कोप-यात आपली जागा ठेवून असतात. याच दिवसांना पायाभरणीचे दिवस म्हणावे लागेल.. कारण ते दिवस मंतरलेले नक्कीच नव्हते.. बालपणातून तारूण्यात आल्यानंतरचा सारा काळ मात्र मंतरलेला होता. ते वेड.. ती धुंदी सारं काही वेगळं होतं त्याच्याही आठवणी वेगळ्या आहेत आणि त्यानेही मनाचा एक कप्पा आपल्या ताब्यात घेतला आहे...

अगदी काहीच काम नाही अशावेळी आपणाकडे घर आवरायला घेतात आणि कालानुरूप उपयोग संपलेल्या वस्तूंचा कचरा काढण्याचं काम सुरू होतं.... मनही जरा शांत झालं की ते देखील असं आवरावं आणि अडगळ झालेल्या भावनांचा निचरा करावा .. कधी तो कुणाला सांगून तर कधी त्या कोंडलेल्या भावनांना आपणच आपल्याशी संवाद साधत एकटेपणात डोळ्यातून आसवांच्या वाटे त्याचा निचरा करीत रहावं.. विस्मरण ही मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे.. विस्मरण नसतं तर डोक्यात भावनांनी गर्दी करून जगणं मुश्कील केलं असतं..
असं असलं तरी काही भावना मनाला चिकटून राहण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही वेळीच आपण वेगळी वाट करून मनातून काढलं पाहिजे म्हणजे नव्या सृजनाला त्यात जागा मिळेल...

दैनंदिन आयुष्यात आपण फारसा गंभीर विचार करीत नाही ते रोजचं अंगवळणी पडलेलं जगणं असतं तरी देखील आपण गंभीरपणे जगतो असं अनेकजण म्हणतात त्याचा नेमका अर्थ आणि त्याचा बोध अनेकदा होत नाही हे खरं.. आपण मात्र आयुष्यातील ते काही मनापासून जगलेले दिवस आणि त्यांच्या आठवणींची साठवण यावर आयुष्याची वाटचाल करायची असते असं माझं मत आहे.

आज ग्रीष्माची चाहूल लागल्यावर मन पुन्हा त्या दिवसांकडे धाव घेतं आणि तो क्षण जसाच्या तसा नजरेसमोर उभा राहतो जणू मधल्या काळात आपण काहीच जगलो नाही असा किंवा त्या क्षणांची ताकद इतकी विलक्षण असते की मधला काळ त्यामुळे झाकोळला जावा... अशी स्मृतींची ग्रहणे अधून मधून आयुष्यात येतात तो आयुष्याचा एक भागच म्हणावा... ते आनंददायी वाटलं ती ते तितकसं नसतं याची मनाला जाणीव आतून असते.. ही मळभ दाटण्याची स्थिती संपल्यावर पुन्हा पुढच्या क्षणी आयुष्यात रूजू होताना जरा जडच जातं म्हणा...
ती गाणी खुणावतात आणि त्या लकेरी कानात रूंजी घालत राहतात .. मन वेडं .. ON CROSSROADS .. जरा थबकतं आणि ती आठवण विसरून ( ? ) जगण्याचा प्रयत्न सुरू करतं...

येणारा दिवस सारखा नसतो हे देखील आपल्याला एक वरदान आहे त्यात कामकाजाचा नेहमीचा तोच- तो पणा ( ROUTINE ) कंटाळा आणणारा असला तरी आपण त्यातून नाविन्याचा शोध घ्यायला पाहिजे.. आपण तो घेत नाही यालाच कंटाळाही अंगवळणी पडणं म्हणता येईल. रोजची सकाळ नवी आणि वेगळी असते तसाच दिवस आणि ऋतूप्रमाणे सृष्टी बदलत असते.. आपण किती बदलतो तो महत्वाचं आहे.. आठवणींचा आधार कि भार याचाही सारासार विचार आपल्याला करावा लागेल. मी माझं आयुष्य सुंदर बनवणार हे रोज मी सकाळी आरशासमोर उभं राहून मलाच सांगतो.. कारण माझा आनंद हा माझा आहे.. इतरांना काय कळतं की मी कसा आहे... ते फक्त अंदाज बांधत असतात..

स्मृतींची ग्रहणे ही याच साठी महत्वाची 
आहेत असं मला वाटतं...
काही काळासाठीचा झाकोळ उरलेलं आयुष्य उजळणारा असेल तो हवाच आहे... हा देखील मनाच्या या अगम्य प्रवासाचा एक आवश्यक असा थांबा आहे.. म्हणूनच ते दिवस तसेच्या तसे आठवल्यावर शरीराचं वय वाढलं असलं तरी मन अद्यापही त्याच वयात आहे .. ते चौथ्या मितीत आहे.. एकाच वेळी वास्तवातलं वय जगताना ते तरूणही आहे आणि त्याचं बालपणही संपलेलं नाही याची जाणीव होतं.... स्मृतीपटल कोरा होत जाताना एक नवा आशेचा उजेड दिसू लागतो.
. नव्याने जगण्याचा आणि आनंदी जगण्याचा संदेश देणारा आणि मग....... नवं सृजन करणारा काळ सुरू होतो पुन्हा नव्याने

प्रशांत दैठणकर
98231 99466 



No comments: