Tuesday 21 April 2020

मरणाचे भय अन् जगण्याचे भान...!

....पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा... सुधीर फडके यांनी गायलेलं एक अजरामर असं गीत आणि चिंतन करायला लावणारे त्याचे बोल आज आवर्जून आठवतात कारण अर्थात कोव्हीड- 19 यानेकी कोरोना

कुणीतरी एक छान वाक्य लिहिलय समाज माध्यमांवर ज्या दिवशी आपण या ग्रहावर काही काळाचे पाहुणे आहोत त्याची जाणीव मानवाला होईल त्यादिवशी त्याच्या जगण्याला प्रारंभ होईल अन् त्याच्या जगण्यात निसर्गा बाबत असणारा आदर वाढेल.

सूर्य तर नित्यनेमाने उगवतो त्याचं कुणाला कौतुक नसतं . तो जगण्याचा एक भाग होऊन जातो .मात्र ज्या दिवशी त्याला ग्रहण लागतं त्यादिवशी
साऱ्यांना त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते... प्रकर्षाने जाणवणं काय म्हणतात ते या दिवशी असतं.

चंद्राच्या काय ते वेगळेच Citylight च्या धुरळ्यात त्याकडे लक्ष असतं कुणाचं. पण लहान लहानपणी गावी सुट्टीत जायचो त्यावेळी सांजची जेवण झाल्यानंतर अंगणभर बसलेल्या सतरंजीवर पडून टिपूर चांदणं बघायचो, सोबत आजीच्या गोष्टी असायच्या असं चांदणं नंतर अभावानं बघायला मिळालं... चंद्र... त्याची आठवण तारुण्यातील प्रेमातल्या त्या मंतरलेल्या दिवसांची बाकी वेळा आयुष्याच्या धावपळीत किती जणांना वेळ आहे चंद्र बघायला. फोटोग्राफीची आवड म्हणून किमान पौर्णिमेच्या चंद्राचा फोटो घेतला जातो बाकी मात्र सगळाच अर्धचंद्र निसर्गाला...

आपण
आपल्याच विश्वास गुंतून पडल्यावर वास्तवातील विश्वाकडे लक्षच जात नाही. त्यात भरीस भर म्हणून आता आभासी विश्व त्यात शिरलय. या आभासी विश्वाने अर्थात Virtual Reality ने माणसाला जवळ आणलंय की दूर केलय यावर संशोधनच करावं लागणार आहे.

तंत्रज्ञानानं जग जवळ आणलं, दूर अंतरावरील व्यक्तीला आपण हातातल्या मोबाईलवर बघून गप्पा मारू शकतो, इतकी प्रगती झाली असली. तरी त्यातला कोरडेपणा, रुक्षपणा वाढत आहे हे देखील खरं, नाही म्हणायला औषधाला शिल्लक असणारे दोन-चार मित्र आपण आयुष्यात बाळगतो... याला बाळगतो असंच म्हणावं लागेल. निरागस मैत्र असण्याचा काळ संपल्यानंतर ती मैत्री फक्त Give and Take पुरतीच उरते. नेते मंडळी जसे कार्यकर्ते बाळगून असतात तसं आपण मित्र बाळगतो हेच खरं.
मित्रांसोबत महिन्याकाठी एखादी गप्पांची मैफल हमखास ठरलेली, आता त्यालाही कोरोनाने अटकाव केला आहे.

कोरोनाचं भय साऱ्यांनाच आहे पण वाईटातही काही चांगलं बघायला हवं ना.. कारोनामुळे साऱ्यांना घरातच राहावं लागतय, यामुळे माणसं किमान स्वतःविषयी आणि कुटुंबाविषयी विचार करायला लागले आहेत.

आत्मकेंद्रित राहणारी व्यक्ती आत्मसंवाद करायला लागल्यावर त्याला जगाची जाणीव नव्याने होणारच ना.माझ्यातल्या मी पणात मग्न असणारी माणसं आता या लॉकडाऊनमुळे अति मी पणात अडकली आणि अति तिथं माती या न्यायानं स्वतःचं स्वतःवर असणार प्रेम किती चूक याची जाणीव होणं आणि कुटुंबातील व्यक्ती व जगातील इतर समाज व निसर्गाचे भान येणं याला या कोरोनाने सुरुवात करून दिली असे म्हणायला हरकत नसावी.

नद्यांचं पाणी नितळ झालय, हवा शुद्ध झालीय, दूरपर्यंत असणारे डोंगर दिसायला लागलेत, प्रदूषण आणि कचरा कमी झाला आहे. इतर प्राण्यांचे अस्तित्व मोकळेपणानं दिसतय असे एक ना अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एका अर्थाने आपल्यातील प्रत्येकाला मृत्युच्या भीतीने जगण्याचं भान आलयं... यातूनच इतरांचा सन्मान येणार आहे. इथं तुझंही काही नाही आणि माझही... सब है भूमी गोपाल की... असा वैश्विक दृष्टिकोन या संकटाने दिलाय.



प्रशांत दैठणकर
9823199466


1 comment:

Mahesh Gangaram Mandavkar said...

खुप सुंदर