Monday 20 April 2020

माका म्युझीक नाको रे...

मन सैरभैर... का अचानक व्हावे. काय ठाऊक असा सवाल आणि मन मनाच्या डोहातलं सारं ढवळून निघतं... अलगद एखादा भावनेचा खडा हे सारं ढवळून काढतो.. मग मन शांत व्हायला बराच काळ जातो... म्हणूनच कधी कधी नकोशी वाटतात काही गाणी..

संगीत मनाला उभारी देतं असं कुणीही आणि कितीही ओरडून सांगितलं तरी ते मला तरी किमान मान्य नाही. शुष्क झालेल्या त्वचेवर नखाने ओरखडा उमटावा तसं ही गाणी मनावर ओरखडे काढत असतात.

रणरणत्या उन्हात तापलेल्या डांबरी रस्त्यावर सारं शांत असताना एखादा टुकार वाहनचालक विना सायलेन्सर ची गाडी दामटवताना जो कानाला त्रास होतो होईल त्याच तिव्रतेचा त्रास मनाला अशा एखाद्या गाण्यामुळे होतो.

ते क्षण दुःखाचे होते का ?
तर तसं नाही ते क्षण आनंदाची होते पण त्याची आज अचानक आलेली आठवण दुःखात का टाकत असेल असाही विचार मनात येतो.

उसके खेल निराले... अर्थात मनाचे खेळ आणि भावनांचा घोळ हा खूप अनाकलनीय प्रकार आहे. मुळात मन हे शरीराचा भौतिकार्थाने भाग नसणारं परंतु साऱ्या शरीरावर नियंत्रण ठेवणारा अजब असं अंग आहे.

सारा का सारा सिर्फ सुनाई दे .... 
 या प्रकरणातला शरीरातला मिस्टर इंडिया म्हणजे हे मन... बरं त्या मिस्टर इंडिया ला किमान लाल रंगात बघायची सोय तरी होती. इथं मनाचा गुंताच वेगळा... त्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करताना तेच आतून ओरडतं..

ये लाल रंग कब मुझे छोडेगा

मेरा गम कब तलक......


मनाचा शोध आणि त्याचा बोध हा अज्ञाताचाच प्रवास आहे.
वेगळ्या भाषेत सांगायचं तर त्याचा शोध संगीतातल्या ८ व्या सुरात शोध किंवा इंग्रजीतील 27 व्या अल्फाबेट चा शोध घेण्यासारखं आहे.

मन शोधताना त्याचा लहरीपणा प्रथम समोर येतो... लहरीपणा ज्याला सोप्या मराठीत मूड म्हणता येईल. तसंही आपण मौसमी पावसाच्या क्षेत्रात म्हणजे लहरी निसर्गाच्या क्षेत्रात राहतो... निसर्गाची कोणती लहर, काय लहर करेल याचा भरवसा नाही. त्यामुळे त्याच्याही येण्याचा आनंद कमी आणि धास्ती अधिक असते.... आता त्याचं काय कमी तर बहुतेकांच्या Better half चाही एक स्वभाव मुडी असतो आणि उरलेली कसर इतरांच्या लहरीपणामुळे लक्ष देण्यात भरून काढली जाते.

मन स्थिर ठेवायचं तर मनोनिग्रह महत्त्वाचा असतो... मन शांत करणं हे डायटिंग सारखं असतं नेमकं डायटिंग ठरवावं त्यावेळी चमचमीत पदार्थ खुणवायला लागतात.... पाणीपुरीचा गाडा नजरेसमोर तरळतो आणि आपसूक तोंडाला पाणी सुटतं...

मनाच्या खोड्या मन शांत करताना सुरू होतात. पिपाणी वाजवणाऱ्या समोर लहान मुलांनी खिजवत चिंचेचे बोटूक चोखावे तसं शांत होताना मन अधिक अशांत होतं... 
क्या करे क्या ना करे... कैसे मुश्किल म्हणून 
हाय !.......................................  करण्याखेरीज आपल्या हाती काहीच नसतं..

संगीत हा जगण्यात काळाच्या समांतर चालणारा प्रवास आहे आणि आदमी मुसाफिर है.... तो आते जाते रस्ते में यादे सोडून जातो.... या आठवणींच्या खुंटीवर या गाण्याची गाठोडी टांगली जातात आणि म्हणूनच ते गाणं लागलं की ती खुंटी स्पर्शली जाऊन त्या आठवणींची साठवण उधळली जाते आणि मन क्षणार्धात वास्तवातून भूतकाळात जातं.... याची गती प्रकाशाच्या गतीपेक्षाही अधिक असल्याने मन सावरण्यापूर्वी पसरलेलं असतं.

संगीत साधना....
Music थेरपी.... आणि खूप काही ज्याला ज्यात आनंद वाटतो तो त्याने आपला आपला मिळवावा.... पण Maximum Time संगीत आठवण कमी आणि अडचण अधिक असल्याचा माझा वैयक्तिक अनुभव आहे...

आपलं मन आपण मांडाल तर स्वागतच पण माझं मन मत स्वीकाराच असा आग्रह आणि अट्टहास मुळीच नाही. प्रत्येकजण वेगळ्या विश्वात प्रवास करीत असलं तरी अनुभवांचा प्रवास आणि अनुभूती सारखीच                                 
   अर्थात...हमसे आया ना गया 

उनसे बुलाया ना ... गया 

 बघा  काही आठवतय काही आपल्या आयुष्यातलं... ?


प्रशांत दैठणकर

9823199466

No comments: