Thursday, 30 June 2011

मस्तानी... माझ्या बालपणातली !

dpacific@hotmail.com
                                                                दि.30 जून 2011

      मस्तानी...बाजीरावची नाही तर बालपणाची एक आठवण. मी घरी दूध मिळतं म्हणून शिवूरकर वकीलांच्या घरी रोज सायंकाळी दूध आणायला जायचो. औरंगाबादेत आल्यावर वडीलांनी घरालगत असलेल्या नगरपालिकेच्या शाळेत नाव टाकलेलं. त्यांच आडनाव जोशी पण गावाची आठवण म्हणून माझं आडनाव दैठणकर टाकलं आणि घराण्यात पहिला दैठणकर जन्मला. शाळेत वर्गात पहिला क्रमांक यायचा. माझी बोलण्याची पध्दत बघून शिवूरकर वकीलांच्या पत्नी ज्या स.भू. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या त्यांनी माझं नाव चौथ्या वर्गात स.भू.शाळेत घालायला लावलं.
      सरस्वती भूवन शिक्षण संस्थेचा तो परिसर ज्याला सारे एसबी नावाने नावाजलं आहे. नंतर पदवी उत्तीर्ण होईपर्यंत जीवनाचं एक अंग बनला. त्या परिसरात शिरताना रस्त्यावर ही मस्ताना कुल्फी. ज्याला आम्ही मस्तानी म्हणायचो कुल्फीवाला सिंधी मात्र अस्खलीत मराठी बोलायचा.
      आता मुलांना पैसा माझ्या नाणेसंग्रहात दाखवतो त्यावेळी मात्र तो चलनात होता 5 पैशाची कुल्फी आठवडयात ज्यावेळी हाती पैसे येतील त्यावेळी हक्काची. आईने सकाळी दिलेले पैसे त्या हाफ चड्डीच्या खिशात ठेवल्यानंतर मध्यांतरापर्यंत ते हरवणार नाहीत याची काळजी करत सारखा हात खिशाला लावणं म्हणजे मंदीरात दर्शनाला गेल्यावर चपलांवर लक्ष ठेवण्यासारखं असायचं.
      मध्यांतराची घंटा वाजताच धावत कुल्फीची गाडी गाठायची मोठया आनंदानं त्या सिंधी कुल्फीवाल्यास 'एक कुल्फी देना' सांगायचं त्याच्या गाडीवरच्या त्या आसमानी रंगाच्या पेटीतून तो कुल्फीचा ऑल्यूमिनियमचा साचा काढायचा कुल्फी ढिली होण्यासाठी शेजारच्या पाण्याच्या बुधल्यात बुडवून जादू करावी तशी तो कुल्फी काढून हातात द्यायचा. स्वच्छ पांढरे शुभ्र कपडे आणि तितकेच शुभ्र पांढरे केस असा त्याचा वेष आणि त्याच्या गाडीचा तो आसमानी रंग आधी शाळा नंतर कॉलेज असा साधारण 12 वर्षाचा काळ स.भू च्या परिसरात घालवला तो संपूर्ण काळ मस्तानीत आणि तिच्या चवीत बदल झाला नाही.
      काळानुसार आवडी बदलल्या आणि सवंगडी येत राहिले आणि बदलत राहिले नंतर चहा आणि वडा पावचा चस्का लागला. गुलमंडीवर रहायला गेलो त्यावेळी मागच्या जोहरीवाडयात तो कुल्फीवाला रहातो हे कळलं. तो रोज सकाळी गाडी घेऊन निघालेला दिसायचा. एक दिवस त्याची मस्तानी कायमची दुरावली.
      आठवणींचा गलका वाढत जातो. त्या शाळेच्या किलबिलाटात कुल्फी अशी त्याची आरोळी आणि 5 पैशांची कुल्फी मात्र आजही जिभेला पाणी आणते.
                                                 -प्रशांत दैठणकर                                          


No comments: