Tuesday 28 June 2011

ऑनलाईन शॉपिंग करताना... !

आपण इंटरनेट वापरता का? याला अनेकजण हो असं उत्तर देतील आपण ऑनलाईन खरेदी विक्री साठी क्रेडीट किंवा डेबीट कार्ड वापरता का? हा त्यापुढील सवाल आहे. याचं उत्तर हो असं सकारात्मक आल्यास लगेच पुढील सवाल येतो की आपण सुरक्षित आहात का? हा प्रश्नांचा भडीमार यासाठी की इंटरनेटवर आर्थिक व्यवहार करताना खबरदारी बाळगली नाही तर आपणाला खूप मोठे नुकसान होवू शकते.

साधारपणे बाजारपेठेचा विचार केल्यास गेल्या 4 दशकात विक्रीची पध्दत सातत्याने बदलताना आपणास दिसेल यात दुकानातून विक्रीची पध्दत आहे. वस्तू दुकानात विक्रीसाठी ठेवायच्या आणि ग्राहकांनी त्या दुकानात जाऊन खरेदी करायच्या असा प्रकार होता हा पारंपरिक प्रकार आजही सुरु असला तरी नव्या पध्दती यात आल्या आहेत.

पारंपरिक पध्दतीत वस्तु सुस्थितीत आहे की नाही याची प्रत्यक्ष खात्री शक्य असते आणि विक्रेता देखील आपल्या परिचयाचा असतो यानंतर आलेली पध्दत अर्थात थेट विक्री (Direct Marketing) आपल्या घरी येवून वस्तू विकणारे सेल्समन आपण अनेक बघतो. यात त्या सेल्समनचा परिचय नसला तरी वस्तू पारखुन आपण घेऊ शकतो. मात्र तो विक्रेता निघून गेल्यानंतर आपल्याला त्यात काही बदल करता येत नाही.

नंतरच्या काळात आलेला प्रकार अर्थात टेलेमार्केटींगचा टिव्हीवर जाहिरात दाखवून फोनवर खरेदीची मागणी नोंदविण्याचा, यात आता वृत्तपत्रात देखील जाहिराती रोज दिसतात. इथं आपणाला क्रेडीट कार्डव्दारे खरेदी करता येते त्याच प्रमाणे आपण वस्तू घरी पोहचल्यावर अर्थात कॅश ऑन डिलीव्हरीचा पर्याय देखील निवडू शकतो यात उत्पादक कंपन्या 14 दिवसात वस्तू पसंद न पडल्यास परत घेण्याचे आश्वासन देतात इथंही खरेदी करताना आपण योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक असतं

यापुढचं पाऊल अर्थात इंटरनेटचं या महाजालात आपणात वस्तूंची विक्री करणा-या अनेक संकेतस्थळांना भेट देवून वस्तूच्या वर्णनावरुन खरेदी करता येते मात्र यात विश्वासार्हता कमी आहे. आपण आपल्या बँकेची तसेच क्रेडीट व डेबीट कार्डची माहिती देताना पूर्ण माहिती घेऊन व सुरक्षिततेची खबरदारी बाळगूनच व्यवहार करावा ही माहिती पळवून आपल्या खात्यातला सारा पैसा गिळंकृत करणारे अनेक हॅकर्स फक्त माहितीच्या या दुव्याचीच वाट बघत असतात.

नेटबँकींग करताना तसेच ऑनलाईन खरेदी करतांना केवळ एकच विंडो खुली आहे याची खात्री करा आपल्या संगणकाला अॅन्टीव्हायरस असेल तरच खरेदी करा नसता या फंदात पडू नका.

अनेक सुरक्षित साईटस्‍ इथं आहेत त्या साईटस्‍ आपणास 'व्हर्च्युअल की बोर्ड' स्क्रीनवर उपलब्ध करुन देतात त्यामुळे माहिती चोरली जाण्याचा धोका नसतो. काही बँकांनी आता खास मर्यादीत रकमेची क्रेडीट व डेबीट कार्डस्‍ जारी करायला सुरुवात केली आहे. त्यावरील ती रक्कम संपताच कार्ड रद्द होते अशा कार्डांमुळे धोका कमी होतो. तसेच ऑक्सीकॅश सारखी रिचार्ज आणि प्रिपेड कार्डस देखील बाजारात उपलब्ध आहेत त्यांच्या वापरानेही सुरक्षित खरेदी करता येते.

सुरक्षेची काळजी घ्या आणि ऑनलाईन खरेदी करा असं सर्वांनी लक्षात ठेवावं

-प्रशांत दैठणकर

No comments: