Wednesday 14 December 2011

सायकल बघावी चालवून... !

आठवणींच्‍या सागरावर सर्फिंग करताना मन क्षणात एका लाटेवरुन दुस-या लाटेवर स्‍वार होत जातं आणि अल्‍पावधीत सुरुवात कुठे झाली हे आपण विसरतो असं काहीसं चंचल असणारं हे मन. मात्र ही चंचलता काही घटनांच्‍या बाबतीत शिथिल होते आणि मन एखाद्या लाटेवर अडकतं. रेकॉर्ड प्‍लेअरच्‍या सुईप्रमाणे एकच वाक्‍य पुन्‍हा पुन्‍हा  ऐकावं तसं काहीसं असणारं हे मन आणि काहीशा तशा घटना.
     लहानपणी होणारे अपघात हे नवीन नाही मात्र त्‍यातील गंमत-जंमत कधी कधी त्‍या अपघातांना विनोदाची किनार देते आणि प्रसंगी आठवला की मनातून हसू येतं. मी माझा छोटा दोस्‍त मनीष कुलकर्णी. आम्‍ही नव्‍याने सायकल शिकलेली सायकलवर फेरफटका मारायचा मला छंदच जडला.
     वडील ऑफिसमधून आले की त्‍यांची सायकल घेऊन गायब व्‍हायचं आणि औरंगपुरा कधी एसबीचं लाल ग्राऊंड, आमचा सराव सुरु असायचा. जरा दूर भटकायला जायचं म्‍हणून मी मनीषला सोबत घेतलं तो समोर सायकलच्‍या दांडीवर बसायचा रपेट मारत आम्‍ही खडकेश्‍वरच्‍या मंदीरापर्यंत आलो.
   खडकेश्‍वरच्‍या महादेव मंदीरात श्रावणी सोमवारला जत्राच भरायची इतर वेळी मात्र शांतता. त्‍या शांत अशा मैदानावर चार फे-या करुन आम्‍ही निघालो. येताना अंजली टॉकीज समोरचा उतार, गाडी वेग घेणारच. सायकलच्‍या दांडीवर हा मन्‍या आणि सायकल वेगानं निघालेली. पुढचा. क्षण ... !
    टॉकीज ओलांडून पूलापर्यंत आलो आणि काय झालं कळलंच नाही. चित्रपटात दाखवतात तसं स्‍लो-मोशन मध्‍ये मी हवेत जात होतो. सायकल मागिल बाजूने उंच झालेली. मी समोर पडतोय हे मला दिसत होतं आणि आम्‍ही दोघेही पडलो एक क्षण पूर्ण अंधार ......... डोळे उघडून बघतो तर आसपासचे तीन-चार जण धावत आलेले. त्‍यातील एकाने प्‍यायला पाणी आणलं होतं. त्‍यांनी आम्‍हाला धीर दिला. मला चिंता छोट्या मन्‍याला कितपत लागलय याची.
     जरा सावरुन पाणी पिऊन चार ठिकाणी खरचटलं रक्‍त आलं हे जाणून दोघेही निघालो. सायकल हातात धरुन नेटानं ढकलत घरापर्यंत पोहोचलो. सुदैवाने घरी कुणी रागावलं नाही. काही नवं करताना असं चालयचच. पडो-झडो माल वाढो अशी म्‍हण माझी आई वापरायची ... मला नेमका अपघात का झाला हाच प्रश्‍न पडलेला.
     जखमांमुळे पुढे 15 दिवस सायकल बंद झाली. मी मन्‍याला विचारत होते अरे नेमकं काय झालं की आपण असं शिर्षासन केलं सायकलवर पण मन्‍या. सांगे ना ... महिना भराने गप्‍पा मारताना मन्‍याला राहवलं नाही. त्‍यानं ते कोडं सोडवलं माझ्या डोक्‍यातलं.
     अरे यार आपण निघालो उतारावर त्‍यावेळी मला हवा कमी वाटली म्‍हणून मी समोरच्‍या चाकातली हवा चेक करायला चाकात हात घातला... मला तेव्‍हाही आणि आता प्रसंग लिहितानाही हसू फुटतं... ऐसा भी होता है. आणि प्रसंग पुन्‍हा नव्‍यानं ताजा होत जातो.
                                            पॅसिफिक

No comments: