Friday 16 December 2011

मला फेसबुकानं झपाटलं...


     मानसशास्‍त्र हा गुंतागुंतीचा विषय आहे आणि त्‍यातून निघणारे तर्क हा त्‍या ही पलिकडचा प्रवास असतो. भविष्‍य जाणून घेण्‍याचं कुतूहल सर्वांनाच असतं, म्‍हणतात ना उम्‍मीदपर दुनिया कायम है. ही उम्‍मीदच माणसाला जगवते आणि कधी कधी नाचवते देखील.
     याच प्रकारची पुनरावृत्‍ती आपणास नव्‍या जगाचं व्‍यासपीठ झालेल्‍या  फेसबूकवर दिसते. चार क्षण आनंदाचे आपणाला जगता आले तर उत्‍तम वाटता आले तर अधिक उत्‍तम अन् शक्‍य नसेल त्‍यावेळी बघता आले तर चांगलं या भूमिकेतून फेसबूकवर पडीक असणा-यांची संख्‍या कमी नाही.
           ज्ञानेश्‍वरांनी भिंत चालवली
           आजचे ज्ञानेश्‍वर वॉल चालवतात
           कधी ती रंगवतात प्रेमानं
           कधी कधी धुळवड करुन
           त्‍याच वॉलवर चिखल उडवणं
           न जाणत्‍यांच्‍या शब्‍दात अडकून
           मनातनं प्रेमात पडणं
           समोरच्‍याच रडक्‍या लिंक बघून
           मनापासून मग ते रडणं
           काही जणांना जमतं डेअरिंग
           आपण फक्‍त करावं शेअरिंग
                     - इति-प्रशांत
     आता फेसबूकची गंमत वाटते ती इथही भविष्‍य सांगण्‍यासाठी अनेकांनी दुकानं उघडलीत आणि त्‍यातले प्रकार रंजक आहेत.
     तुमचा फोटो बघून तुम्‍ही कसे आहात हे सांगणारे इथं आहेत.
एकदा अलाव् केलं की रोज फॉरच्‍यून कूकीज (राशीभविष्‍य) चा वरवा (रतिब)टाकणारे इथं आहेत.
     तुमचे टॉप टेन फ्रेण्‍ड तुम्‍ही नाही तर त्‍या सॉफ्टवेअरने सांगायचे. सगळा हा आभासी जगाचा खेळ, लायकीचं विचारु नका पण `लाईक` करत नाही याचा अर्थ तुम्‍हाला मॅनर्स नाहीत असा समजला जातो. मराठीत सांगायचं तर मराठी लिहा.. नाही जमत नाही म्‍हणत मराठी शब्‍द इंग्रजी लिपित लिहायचे असा अनोखा प्रकार इथं घडताना दिसेल.
           इंग्रजीच्‍या हट्टापायी
           शब्‍द शब्‍द हा पडला
           फेसबूकच्‍या नादापायी
           वृक्ष ज्ञानियांचा झडला
                  - इति प्रशांत
     असं. या फेसबूकच्‍या मराठी बाबत म्‍हणावं लागेल.
     तुम्‍ही कोणाच्‍या टॉप टेन मध्‍ये आहात हे संगणकाच्‍या पडद्यावर झळकताच तुमचा चेहरा उजळतो. स्‍टेट्स अपडेट करायची इतकी धडपड आणि घाई... घरात आईबापाशी बोलायला या वेड्यांना वेळ नाही.
     मधल्‍या काळात सा-याच समाजाला डिस्‍कोनं झपाटलं होतं आणि `इथून तिथून मिथुन` फिरायला लागले होते. आता फेसबूकनं झपाटलय फरक फक्‍त इतकाच इथ फिरत नाहीत तर सारे त्‍या स्‍क्रीनला चिटकून बसले आहेत इतकच.
                                     - प्रशांत दैठणकर

No comments: