Thursday 8 December 2011

अभिव्‍यक्‍तीची सुनामी ... !


          सध्‍या आपल्‍या आसपास जी परिस्थिती दिसत आहे ती माहितीच्‍या अणुस्‍फोटाचा परिणाम आहे. मुक्‍त अर्थव्‍यवस्‍था आल्‍यावर काय होवू शकतं ते आपण बघितलं आहे. त्‍याच प्रकारे माहितीचा स्‍फोट झाल्‍यावर काय घडू शकतं ते सध्‍या घडतय.
     लहान मूल म्‍हणजे जन्‍माला आलेलं बालक देखील रडण्‍याच्‍या माध्‍यमातून भावना व्‍यक्‍त करतं तसं प्रत्‍येकाच्‍या व्‍यक्‍त होण्‍याला माहिती तंत्रज्ञान क्रांतीनं नवं परिमाण दिलं. आमंत्रण-निमंत्रण या मर्यादांच्‍या पलिकडे जाऊन व्‍यक्‍तीला व्‍यक्‍त होण्‍याचं तंत्र फेसबूकनं दिलं त्‍यामुळे ही अभिव्‍यक्‍तीची सुनामी आली आहे.
     व्‍यक्‍ती तितक्‍या प्रकृती आणि प्रवृत्‍ती असं म्‍हणता येईल. नायक आहे म्‍हणून खलनायक आणि खलनायक नसेल तर नायक येणार कुठून हेच खरं. हे असं झालं की कोंबडी पहिले की अंडं पहिले. पण हे चालणार. या जगात नाण्‍याच्‍या दोन बाजू आहेत.
     या माध्‍यमाचा वापर करणारे जसे आहेत तसेच गैरवापर करणारे देखील आहेत. त्‍यात फरक फक्‍त प्रगल्‍भतेचा आहे. प्रगल्‍भता यायला वेळ आहे इतकं सांगता येईल कारण आता कुठे मुक्‍त छंदाला सुरुवात झाली आहे. यमकातून मुक्‍त छंदाकडचा प्रवास असाच अपरिपक्‍व असणार त्‍याला प्रगल्‍भ व्‍हायला वेळ लागेल पण निश्चितपणे प्रगल्‍भता येईल. तो प्रवास अद्यापही अपूरा आहे.
     समाजमन प्रगत आणि प्रगल्‍भ असेल तर काय घडू शकतं हे `फ्लॅश इव्‍हेंट ` च्‍या रुपाने लंडन, न्‍यूयॉर्कच्‍या रेल्‍वेस्‍थानकांवर नेहमीच दिसतं. आपल्‍याकडे आता कुठे याला सुरुवात झाली आहे. हजारो लोक ज्‍या अतिरेकी  हल्‍ल्‍यात मरण पावले त्‍या वर्ल्‍ड ट्रेड सेंटरवरील हल्‍ल्‍याचे प्रक्षेपण सलग आठ दिवस बीबीसी व सीएनएन वाहिन्‍या दाखवित होत्‍या मात्र एक क्षणही छिन्‍नविछिन्‍न देह किंवा रक्‍ताचा सडा न दाखवता घटनेचं गांभीर्य त्‍यांनी दाखवलं ही प्रगल्‍भता.
     विदेशात माध्‍यमं 50 च्‍या दशकातच खुला श्‍वास घेत होती त्‍यांचा प्रवास खूप मोठा आहे. आपलाही प्रवास तसा मोठा राहणार नाही. कारण आपण सर्व भारतीय जन्‍मजात बुध्‍दीमान आहोत. माध्‍यम प्राप्‍त होताच आरंभीच्‍या घाईत ही गडबड सुरु आहे त्‍यापुढे पाणी नक्‍की  स्थिरावेल आणि प्रगल्‍भता येईल.
     आयेगा वो दिन जरुर आयेगा !
                                  प्रशांत दैठणकर
    

No comments: