Thursday, 22 December 2011

आठवणींची प्राजक्‍त फुलं ...!

सौजन्य मायबोली
 मन अचानक असच निघालं आणि झाटकन गेलं ते त्‍या कॉलेजच्‍या काळात. होतं असं कधी कधी. कॉलेजचा तो कट्टा मनाला खुणावत असतो आणि सवंगड्याच्‍या  बोलण्‍याचे डिटेल्‍स आठवत राहतात.
     सारंग टाकळकर, प्रवीण देशमुख, संदीप पालोदकर, अर्चना मेढेकर, दिपा राहुरीकर, भालचंद्र जावळे, सुन्‍या,मंगेश देसाई, मकरंद अनासपुरे, पंकज कुबेरकर, गजानन मांजरमकर, सुरेश बोडखे, अनिल काळे अशी नावं डोळ्यासमोर यायला लागतात. कॅम्‍पसमध्‍ये आम्‍ही सारी वस्‍ताद मंडळी. धिंगाणा करायला अग्रेसर तसेच सांस्‍कृतिक धिंगाणा करायला देखील ही सारी मंडळी आठवली इथ युवा महोत्‍सवातला जल्‍लोष बघून.
     युवक महोत्‍सव आणि त्‍याची तयारी ते नाटकांचं असणारं वेड आणि आपलीच गँग आणि आपलं कॉलेज पुढे राहील याची धडपड असायची. एका बाजूला नाटकाचा तर दुस-या बाजूला नृत्‍याचा, मग नृत्‍यात सुरेश बोडखे आणि अनिल काळे. अन्‍याचे एक डान्‍स बसवला त्‍यात मला पंजाबी नृत्‍याचं ज्ञान सल्‍याने तो सारखा चिडत राहीला आणि खांदे नेमके कसे उडवायचे हे मला काही जमलं नाही.
     अन्‍या आणि सुरेश कॉलेजची शान होते. त्‍यावेळी ब्रेक डान्‍सचं फॅड जोरात होतं आणि आणि दोघेही कमालीचे डान्‍सर. नाही म्‍हणायला अन्‍या सेाबत राहून चार स्‍टेप मला देखील शिकता आल्‍या. त्‍यावेळी अन्‍याची एसबी कॉलनीत रुम होती. ही रुम बराच काळ आमचा अड्डा होती. इथच तो ब्रेकडान्‍सचे क्‍लास चालवायचा.
     युथ फेस्‍टीव्हलला डान्‍स बसवायचं काम अन्‍याचं एका बाजूला डान्‍स आणि दुस-या बाजूला सुन्‍या, अष्‍ट्या, मक्‍या मंग्‍या, भालू यांच्‍यासोबत नाटकाची तालीम असा कॉलेजचा अर्धा काळ सांस्‍कृतिक धिंगाण्‍यात जात असे. सोबतच समीर पाटील सम्‍या , जितेंद्र पानपाटील जितू अशी मंडळी नाटकाच्‍या कंपूत होतीच.
     ते दिवस कधी कॉलेजला पोहोचतो मी असं म्‍हणायचे दिवस होते. त्‍यावेळचा क्षण न क्षण आजही ताजा आहे अगदी पहाटे पडणा-या प्राजक्‍तासारखा आठवणींची ही फूलं कधीच कोमेजणार नाहीत हे देखील सत्‍य आहे.
                                   - प्रशांत दैठणकर 

No comments: