Wednesday, 2 May 2018

जी ने को तो जी ते है सभीं .... !

आपण त्या सोबत रहा अथवा न रहा त्याची गती थांबत नाही, अर्थात काळ.. वर्तमान क्षणाक्षणाला एका विशिष्ट
गतीने भूतकाळात बदलत जात असतो.. या अर्थाने दर क्षणाला आपण आठवणींनीं समृध्द होत असतो.

बघता बघता पाचवा महिना लागला !

सकाळी सहज भिंतीवरल्या कॅलेन्डरवर नजर पडली आणि मनात हा विचार आला.

दिवस कसे जातात हे कळतच नाही.. !

यातला विनोद बाजूला सोडला तर त्यातलं सत्य आपणास मान्यच केलं पाहिजे अगदी काल रात्रीच आपण ' थर्टी फर्स्ट ' साजरा करुन नववर्षाच स्वागत केलं असं सकाळी वाटतं पण कॅलेन्डर काहीतरी वेगळं चित्र आणि वस्तुस्थिती दाखवत असतं.

मनाला सवाल पडतो की जगण्याच्या धावपळीत हा मधला काळ कुठे हरवला. आपण तो कसा जगलो. या मधल्या काळात काही उभारीचे तर काही नैराश्याचे ही क्षण आले. नैराश्याच्या क्षणात आपण स्वत:ला कसं गोळा केलं. धावताना काळाच्या वेगासवे रोज भावनांचा पसारा मांडलेला. हा पसारा कसा आवरला ... दाटून कंठ कधी कसा मी स्वत:चा सावरला . . . !

इंग्रजीत एक म्हण आहे.


Calander shows how the time passing.

your face shows how you pass the time.


काळ कसा जातोय हे कॅलेंडर दाखवते आणि तो काळ कसा घालवला हे तुमचा चेहरा दाखवतो.

जगण्याची धावपळ थांबत नसते. सामान्यजन यात व्यवस्थित जगता यावं म्हणून कदाचित श्रध्देचा आसरा घेत असतात. श्रध्देसाठी माणसानं देव बनवला की काय असं वाटायला लागतं.

अदम्य अशा आशेवर कालक्रमण करत जायचं असा काहीसा भाव भक्तीमागे तर नाही ना.

तंत्रज्ञान असो की गती जगात उगवणारी प्रत्येक नवी पहाट नवं आव्हान घेऊन येत असते. आव्हान असतं ते बदलत्या ऋतूचं, भावनांचं, तंत्राचं, अगदी महागाईचं देखील अशा या बदलत्या जगात जगण्याची उर्मी कायम रहावी यासाठी का उपयोग करीत असतील सामान्यजन आस्था आणि श्रध्देचा . . . आज नाही तर उद्या आयुष्यात काही ना काही चांगलं घडवेल तो परमेश्वर म्हणत त्याच्या पायावर नतमस्तक व्हायचं आणि आला दिवस ढकलायच.

मला मात्र श्रध्दा- आस्था फारसा नाहीत मी जगतो प्रेरणेवर . . तुझा चेहरा आणि तुझी आस हीच प्रेरणा . . . असा एक चेहरा प्रत्येकाच्या मनातही असतो का ? . . . तुला पाहिलं . . तू अबोल, अव्यक्त . . अनामिक पण प्रेरणा . .!

आवश्यक नाही की माझ्या मनात तुझ्याविषयी ज्या भावना आहेत त्या तुझ्याही मनात माझ्याविषयी असतील . . पण माझ्या भावना प्रामाणिक असतील तर माझ्या जगण्याची प्रेरणा तुला मानून मी नैराश्याकडे वळणार नाही याची खात्री असते मनात . . Platonic की काय म्हणतात ते प्रेम असच असावं.. मी काही जगात असा एकटा नाही
कुणीतरी अशा भावना व्यक्त करताना म्हटलय ना.

इक बूत बनांऊगा .. और पुजा करुंगा !

अर्थात प्रेमाचं विश्वच वेगळं असतं. आयुष्याचा संबंध प्रेमाशी आहे. भावनांचा संबंध प्रेमाशी आहे. त्याचा विवाह संस्थेशी संबध जोडण्याची चूक आपण करुन खूप मोठी गल्लत करतो ... एकपत्नित्वाचं काव्य रचून आपण आपल्या समाजात किती जणांचा भावनिक कोंडमारा करुन त्यांचं जीवन रुक्ष करतो याचा जमाखर्च कुणी कधी मांडलाय का !

देव माणसानं निर्माण केला स्वत:च्या मानसिक स्थैर्यासाठी आणि त्यासोबत समाजानं आपली गणितं मांडत जाळं विणलय.....राम आणि सीता यांचा आदर्श समाजानं जपला पाहिजे हेच खरं.....!

देव आणि आस्थेच्या पलिकडे जगताना आपण जगात सर्वात बुध्दीमान प्राणी म्हणून उत्क्रांत झालोय याची जाणीव ठेवत जगावं असं मला वाटतं.....!

अरे तुझा तर प्रेम विवाह ...... मग तू या वयात पुन्हा प्रेमात पडलास.....! एक आणखी सवाल प्रेमविवाह केला याचा अर्थ प्रेमाचा कॉपीराईट एकाला दिला असा आहे का ? ...... जग सूंदर आहे आणि मन जर निर्मळ आहे तर भावना जपणारं मन खऱ्या सौंदर्याला दाद देणं आणि प्रेमात पडणं थांबवूच शकत नाही.....! फक्त हिंमत लागते ती प्रेम व्यक्त करायला..... भावना मनमोकळेपणांन सांगायला......! प्रेम व्यक्तच करायचं नाही....अव्यक्तच रहायचं या समाजाच्या भिंतीच्या भितीने.....! नाही कारणं असं करणं भावनिक कोंडमारा..... त्यातुन नैराश्य आणि पुढे वैफल्य...... सारा नकारात्मक प्रवास घडवतं...... मला आनंद आहे माझ्या व्यक्त होण्याचा.....

कुछ तो लोग कहेंगे
लोगोंका काम है कहना....
!


कारण माझ्या बाबत काही मत देणारा हा समाज कुठे असतो माझ्या भावनांचा गुंता सोडवायला..... जग तुम्हाला दोन्ही बाजूंनी बोलायला मोकळं असतं.... सल्ले देणे हा स्वभाव आहे. समाजाचा अडचणीच्या प्रसंगी मोठयासोबत माझ्या भावना, आठवणी आणि फक्त माझी सावली असते.

माझ्या प्रामाणिक भावनांमधून प्रेरणा मिळाली पाहिजे. माझ्या आठवणी कदाचित बऱ्या अन् काही वाईट देखील. त्यांनाही मी प्रेरणा म्हणालं पाहिजे.... व्यक्त झालं पाहिजे....

आज जगलेला क्षण उद्याची आठवण म्हणून राहणार आहे. त्यामुळे प्रेम आणि त्याची प्रेरणा घेऊन मला जगायला आवडतं..... माझी प्रेरणा माझ्या डोळयासमोर येते....मनाचा थांग शोधायचा तर त्यासाठी मार्ग डोळयातून जातो. त्या तुझ्या गहिऱ्या डोळयात मनाचा थांग शोधायला मला आवडतं......कारण मला जगायला आवडतं..... प्रेम करायला आवडतं..... कारण तू आणि हे जग सुंदर आहे आणि जगात माझ्या सारखा मी एकच आहे.
  I am unique....!
मग मीच माझी प्रेरणा होतो पुढचा क्षण जगण्यासाठी........

- प्रशांत दैठणकर
9823199466


1 comment:

Renu Agrawal said...

Yes...I am unique...Superb article...