Friday 11 May 2018

आयुष्यात चालताना--(१); क्षण जगलेले

फुरसतीचा काळ अर्थात सुटी किंवा शाळेच्या भाषेतील सुट्टी शाळेत असताना सुट्टीचं कोण ते कौतूक असायचं. तसा मी शाळेत आवडीने जाणारा विद्यार्थी रहायला औरंगाबादेतील टिळकपथ लगतच्या बढई गल्लीमध्ये आणि शाळा सरस्वती भूवन अर्थात आमची सर्वांची प्रेमाची एस. बी.

घर ते शाळा हे अंतर फारसं नव्हतं फार तर 300 मीटर. खर सांगतो याच्यासारखं सूख नसतं. शाळेत एक शिपाई तो नेपाळी होता, नाव नंदलाल. शाळेच्या घंटेचा आवाज आरामात घरापर्यंत यायचा . शाळेचा टोल म्हणजे काय तर इलेक्ट्रीक पोलचा साधारण दीड फूट लांबीचा तुकडा. त्यावर हातोडीने बडवायचं टण....टण....टण.... तालात सलग चढत समेवर जाऊन पुन्हा भैरवीपर्यंत मैफल असावी असे 52 टोल अथकपणे बडवणं ही खासियत.

यातील पहिला टण.... वाजताच घरुन धावत सुटायचं शेवटच्या टण... पुर्वी वर्गात दप्तर ऐकून एस.बी.च्या सुंदर अर्धचंद्रांकीत इमारती समोरच्या भव्य अशा प्रांगणात प्रार्थनेला हजर....

मधली सुटी याच्या उलट पहिल्या टोलाला, रेड्डी, स्टेडी-गो.... शेवटच्या ठोक्यापूर्वी घरात आई कुकरमधून गरमा गरम वाफाळता भात आणि त्यावर साधं तुरीचं वरण एका थाळीत द्यायची वरुन तुपाची हलकी धार..... खाणं कुठे तो पातळसा भात झटपट गिळायचा हात धुवून पुन्हा शाळेकडे धुम ठोकायची या ताज्या जेवणाच्या सवयीमुळे मी डबा किंवा टिफीन कधी कॅरी केला नाही.... सवयच लागली नाही. आजही या वयापर्यंत ही टिफीन संस्कृती माझ्या आयुष्यात शिरु शकली नाही याचं कारण कदाचित शाळेच्या रुटीन मध्ये असावं.

आमची शाळा अतिशय सुंदर परिसर विस्तीर्ण अशी मैदाने खेळायला भरपूर जागा आणि खेळण्यावर अटकाव नाही. मधली सुटी संपवून शाळेत आल्यावर बऱ्याचदा आम्ही थेट मैदानावर वर्गात 60-64 विद्यार्थी .... सारा गोंगाट त्यात एक दोन विद्यार्थी दिसले नाही. तर शिक्षकांनाही काळजी नाही त्यामुळे शाळेत मुक्त छंदात बालपण आणि शिक्षण याची आनंदयात्रा घडली.

नाही म्हणायला चौथ्या वर्गात शिष्यवृत्ती मिळालेली अन् शाळेतही सर्वप्रथम क्रमांक मिळवल्याने पाचव्या वर्गाच्या प्रारंभातच शाळेत सत्कार झाला . त्यात 3 गोष्टीची पुस्तक बक्षीस मिळाली होती. 'मेरीट' वाला म्हणून शिक्षकांची नजर असायची पण एखाद्या तासाभराची ' बुट्टी ' मारली तर ते Ignore देखील करायचे.

इतकी सुंदर शाळा , सुंदर वातावरण असल्यानं शाळा बुडवावी आणि घरी बसावं असं कधी वाटलं नाही. पाचवी ते दहावी एकही दिवस शाळा बुडवली नाही, याचा आज मनापासून अभिमान आहे. दोन प्रसंग त्यातल्या त्यात लक्षात आहेत. आठव्या वर्गात असताना शाळा दुरुस्तीमुळे प्राथमिक शाळेच्या बाजूला चाळवजा खोल्यांमध्ये आमचे वर्ग चालायचे त्यावेळचा प्रसंग. 

शहरात रात्रीपासून पावसाची झड लागलेली..... मुसळधार पाऊस पडतोय त्याही स्थितीत भिजत भिजत आस्मादीक शाळेत. तेथे एक दोन शिक्षक वगळता कुणीही नाही. आमचे एन.सी.सी.चे शिक्षक कलाल यांनी मला तसं येताना पाहून ओरडून थांबायला सांगितलं...... माझ्या वेडेपणाचा परिचय देत हातावर दोन छडया देवून 'भाग घरको' म्हणत घरी पिटाळलं होतं...

असाच एक प्रसंग पाचव्या वर्गात घडला होता. मधल्या सुटीत आलेल्या पावसाची मजा म्हणून आम्ही वर्गासमोरच्या वाळूत साचलेल्या पाण्याच्या तळयात पडणाऱ्या पावसाला साथ देत मस्त पैकी 'रेनडान्स' केला. भिजल्या आणि निथळणाऱ्या अंगांनी वर्गात जाताच आमचे पी.टी. शिक्षक काळे यांनी बाहेर जा असे फर्मावले. मी आणि माझा मित्र अविनाश दंडे वर्गाबाहेर. त्यानंतर काळे सरांनी ओणवं उभ करुन पाठीवर गुद्दे मारले.... ती त्यांची स्टाईल होती. त्या गुद्दयांचा आवाज खूप मोठा येत असे, आणि मार लागत नसे. त्यांचं ते कसबच....! मग आमची खाजगी दप्तरासह घरी....

एकूण काय शाळा एन्जॉय करायला शिकल्यामुळे सुटीची धमालही लूटता आली.

आज मागे वळून बघताना हे सारं काल- परवा जगलो की काय असं वाटतं.... याचाच अर्थ ते क्षण खऱ्या अर्थाने मनापासून जगलेले होते.

- प्रशांत दैठणकर

9823199466

1 comment: