Saturday 19 May 2018

बोंबाबोंब....!

मराठी भाषा राहणार की संपणार असा लेख दर रविवारी कोणत्या ना कोणत्या वृत्तपत्राच्या पुरवणीत दिसतोय. माझी मातृभाषा म्हणून मला वाटणारी काळजी योग्य आहे, पण त्यामध्ये भितीचा सूर दिसायला लागतो. त्यावेळी मात्र मलाच चिंता वाटायला लागते.

इतक्या वर्षांच्या प्रवासात भाषेसमोर अनेक संकटे आली. मात्र मराठी भाषा संपलेली नाही उलट मराठी भाषा संक्रमित झाली, प्रगत झाली आणि अधिक संपन्न झाली . जगाची संपर्क भाषा असणाऱ्या इंग्रजीसाठी ऑक्सफर्डचा शब्दकोष हा आधार आहे. या शब्दकोषात जगातील विविध भाषांमधील शब्द स्विकारुन इंग्रजी भाषा संपन्न होत आहे. त्याच पध्दतीने मराठी देखील इतर भाषांमधील शब्दांनी अधिक खुलत आहे.

मातृभाषा म्हणून मराठीचा अभिमान बाळगताना मराठीत असणाऱ्या काही शब्दांचे स्वभाव आणि त्यांची रंजकता मला अधिक भावते. काही शब्द दुसऱ्या भारतीय भाषात जसेच्या तसे असले तरी त्याचा अर्थ त्या भाषेत वेगळा असल्याने नानाविध गंमतीचे प्रकार देखील घडतात. या शब्दांशी खेळण्याची ताकद अनेक लेखकांमध्ये आहे व होती, त्यामुळे त्यांनी यातून मोठया प्रमाणावर विनोद निर्मीती केलेली आपणास दिसते.

शब्द हे दुधारी शस्त्र आहे. या अर्थाने की शब्दाचा अर्थ लागण्यावर आणि लावून घेण्यावर देखील अवलंबून असतो. यातून व्दैअर्थी संवाद आणि त्यातून विनोद तयार होतात. मराठी भाषा खेळवाल तशी खेळते याच्या वानगीदाखल अनेक उदाहरणे देता येतील.

सचिन पिळगावकरच्या चित्रपटांमध्ये याचा अधिक वापर आपणास दिसतो.


अशोक सराफ बंदूक घेऊन निशाणेबाजी करीत असतानाच्या एका दृष्यात ' काय हो कसा नेम आहे यांचा ? असा सवाल विचारल्यावर मार्मिकपणे पूढील वाक्यात उत्तर येतं ' त्याचा काहीच नेम नाही ! ' हा मराठी भाषेतला शब्दच्छल विनोदाची पेरणी करतो, म्हणून मराठी भाषा अधिक गोडवा राखून आहे.

ज्यांनी मराठी भाषेचा एक नागरी भाषा म्हणून वापर सुरु केला त्यांनी चिंता व्यक्त करावी याला कारण त्यांना ग्रामीण लहेजा रुचत नाही. ते 'गावंढळ' ठरवतात पण शुध्द मराठीचा आग्रह हा का केला जातो ते अनाकलनीय तुम्हाला आवडत नाही म्हणून ती भाषा मराठी राहत नाही का ?

दादा कोंडके यांनी सलग 9 चित्रपट मराठीत रौप्यमहोत्सवी दिले, त्यातली भाषा तर शुध्द नव्हती. आमचा मक्या ऊर्फ मकरंद अनासपुरे मराठवाडी शैलीचा वापर करतो म्हणून तो अधिक लोकप्रिय झालाय हे विसरता येणार नाही. अगदी नंतरही भारत गणेशपुरेने वऱ्हाडी टोन मध्ये संवादफेक जारी ठेवत यश प्राप्त केले. नागरीपणा, शुध्दता याच्या फंदात न पडता ज्या शब्दातून भावना हमखास पोहोचतात आणि जी भाषा थेट ऱ्हृदयाला भिडते ती खरी भाषा.

दहा कोसावर बदलण्याचा गुणधर्म कायम राखत मराठीत देखील प्रांतनिहाय स्वतंत्र शब्दावली. आणि शब्दफेक यांचा वापर होतो, पण ती देखील मराठीच आहे ना.

मोबाईल आणि इंटरनेटच्या वापराने भाषा आता चित्रमय वळणावर आली असा एक लेख आजच वाचण्यात आला. यात आक्षेप ईमोजी वापरावर आहे. यातून आपण मागील काळात परत जातोय की काय असा काहीसा सूर यात जाणवला.

भाषा हे संवादाचे माध्यम आहे. एकमेकांशी संवाद साधण्यात जी भाषा वापरली जाते ती सोपी असावी. आणि दैनंदिन संवाद साधणारे शब्दप्रभू असतील आणि प्रत्येकाचा शब्द संग्रह दांडगा असेल असे अपेक्षित नाही. मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे ज्याला लिहिता वाचता येत नाही असे लोकदेखील बोलतात एकमेकांशी अगदी सहजतेने ती त्यांनी बोललेली भाषा खरी मराठी असं माझं मत आहे.

अनपढ अर्थात शिक्षणाचा गंध नाही किंवा कमी शिक्षण झालय अशांना चित्रलिपी समजायला अवघड जात नाही. म्हणून नव्या पिढीने अशा चित्रलिपीचा अर्थात ईमोजीचा वापर केल्याने कितीसा फरक पडणार आहे. अगदी प्रकांड पंडित होवून साहित्यात डॉक्टरेट मिळवली तरी आपण सुरक्षितता म्हणून नव्या तंत्रज्ञानाच्या काळात पुन्हा एकदा अंगठेबहाद्दरच झालो ना !

तुमचा वैयक्तिकपणा, आयुष्यातील खाजगीपणा जपण्यासाठी तुम्ही आज हाताचे ठसे आणि चेहरा किंवा डोळयातील बुभुळे यांचा वापर करीत आहात. त्यामुळे नव्या पिढीला मागासलेपणाकडे जाताय असं म्हणणं चुकींचं ठरेल.

भा. पो. ...... असा संदेश मोबाईलवर दिला तर अडचण आमची आहे..नव्या पिढीला याचा अर्थ कळतो आणि चटकन भावना पोहोचतात ती भा. पो. हे भाषेचं बदलतं रुप होय.

मानवी उत्क्रांतीत चित्रलिपी ते लिपी असा प्रवास घडला त्याला पुन्हा चित्रलीपीची गरज वाटतेय ही देखील एक प्रकारची उत्क्रांतीच म्हणावी लागेल. मराठी भाषेचं स्वत:चं असं वेगळेपण आहे खास गंमत आहे, त्याचा आनंद आणि रसग्रहण याकडे वळण्याची खरी गरज आहे.

एकच अक्षर वापरुन शब्द तयार होणारे दोन खास शब्द फक्त याच भाषेत आहेत...  मराठी मला त्यामुळेच श्रेष्ठ वाटते. ' तंतोतंत' हा शब्द फक्त मराठीतच आहे आणि त्यामुळेच असाच वैशिष्टपूर्ण दुसरा शब्द आपण वापरावा जरुर पण वास्तवात टाळावा. तो शब्द ..... Any guess ? .... तो शब्द आहे ' बोंबाबोंब '.

- प्रशांत दैठणकर
9823199466

No comments: