Monday 14 May 2018

ना जाने इस शहर को हुवा क्या है.....!

औरंगाबाद का दिल यानेकी.....गुलमंडी..
शाळेचे ते दिवस मंतरलेले म्हणतात तसेच होते. नुसता शाळेचा फोटो दिसला तरी आपण लहान होवून पाठिवर दप्तर टाकत शाळेच्या दिशेने धावायला लागतो. त्यावेळी वर्गात सारा कल्ला करणारे, सतत काय बोलत होते असा सवाल आता या वयात पडतो.

काही प्रमाणात सिनेमा तर कधी क्रिकेट तर कधी ..... नाही आठवत आता पण त्यावेळी तोंडाची टकळी चालूच असे.

काल औरंगाबाद शहरात जातीय दंगल उसळली त्यावेळी कोणकोणत्या भागात गडबड झाली याची नावे वृत्तपत्रात वाचली. त्यात मोतीकारंजा हे नाव समोर आलं, माझी शाळा आठवली मला.

माझं पहिली ते तिसरी हे शिक्षण त्यावेळच्या नगरपालिकेच्या शाळेत झालं. रहायला दलालवाडी भागात बाजूने अखंड वाहणारा एक नाला आणि नाल्याच्या पलिकडे ज्याला आता न्यू गुलमंडी रोड म्हणतो त्याच्या दुसऱ्या बाजूला दोन मजली चाळवजा असणारी शाळा.

शाळेत जाताना त्या छोटयाशा गल्लीत डाव्या बाजूला बेकरी होती. बेकरीच्या जाळीवर नाक दाबून आत काय चालू आहे हे बघण्यात चांगला टाईमपास व्हायचा. माझा वर्ग पहिल्या मजल्यावर पायऱ्या चढल्या की तिथून नाल्यापलीकडे असणारं घर दिसायचं. पावसाळयात भरुन वाहणारा नाला अर्थात त्याचा पूर आम्हाला " महापूर " वाटे.

आज शिक्षकांची नावं आणि चेहरे आठवत नाहीत. मात्र तीनही वर्ष शाळेत पहिला नंबर पटकाविला त्यामुळे मिळणारा इतर विद्यार्थ्यांचा " जेलस " प्रतिसाद आणि शिक्षकांनी केलेलं कौतूक आठवतं. तिसरीत असताना वर्ग सुरु झाले आणि पावसाळा देखील या पावसाने आधीच जीर्ण झालेल्या शाळेच्या इमारतीचा एक भाग खचला त्यावेळी 'रिस्क' नको म्हणून नगरपालिकेने आमच्या अख्या शाळेची रवानगी मोती कारंजा मधल्या ऊर्दु शाळेत केली.

याच इमारतीच्या जागेवर ती ऊर्दू शाळा होती मोती कारंजात
माझ्या मुळ शाळेची दुरुस्ती होईपर्यंत जवळपास चार महिने मी मोती कारंजा भागातल्या शाळेत जात होतो. घरुन निघाल्यावर गुलमंडीला वळसा घालून अरुंद अशा दिवाण देवडीतून चालत- चालत, अगदी रमत गमत कोपऱ्यावरील मशीद ओलांडून मोती कारंजाची शाळा गाठायची. मध्येच त्या मशीदमधून होणाऱ्या अजानचा आवाज. औरंगाबादेत अजान हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक म्हणून समावेश करावा लागेल.

मोती कारंजा भागात जायला आणखी मार्ग होता अर्थात त्यासाठी नाला ओलांडून फकीरवाडी मार्गे जावे लागे. नाल्याला पाणी कमी असताना दगडावरुन उडया मारत नाला ओलांडायचा. त्याच्या समोरील बाजूस एक चुनाभट्टी होती, त्याचा गोल दगड चुना घोटत असतांना पाहणे तसेच चुन्याचा भला मोठा हौद हे आमचे कुतूहलाचे विषय होते.

त्याकाळी साधारण 40 वर्षांपूर्वी औरंगाबाद शहर खूप छोटे होते. मोठे खेडे म्हणता येईल इतके छोटे. हैदराबाद मुक्ती संग्रामानंतर भारतात सामिल झालेल्या औरंगाबादवर पूर्ण निजामी शैलीचे वर्चस्व कायम होते. घराला रंग देण्याची पध्दत नव्हती केवळ चुन्याची सफेदी केली जायची. आता सर्वांना आश्चर्य वाटेल पण त्यावेळी औरंगाबाद शहरात सकाळ-संध्याकाळ दोन वेळा धो-धो पाणी किमान दीड तास नळ सुरु असायचे. पाण्यावरुन भांडणं त्याकाळी नव्हती.

त्या वयात पडणारे प्रश्न साधारण वयाला साजेसेच होते. गुलमंडी हे शहराचे हृदयस्थान. या ठिकाणी फुलांची दुकाने होती त्यामुळे रुईतून त्यासाठीचा गुलमंडी शब्द प्रचलित झालेला. मोती कारंजा हा भाग कधी काळी येथे कारंजे (फाऊन्टन) असतील असे आम्हाला वाटायचे पण फकिरवाडीचा अर्थ लागत नव्हता. नाही म्हणायला गावात अनेक फकिरांचा वावर होता मात्र फकिरवाडीत एकही फकीर राहत नसे.

लहानपण ज्या गावाच्या कुशीत गेले त्या गावच्या साऱ्या गल्या आणि रस्ते खडा न खडा पाठ झाले आहेत. त्यामुळेच अशा भागात काही घटना घडली तर सहाजिकच आठवणी ताज्या होतात.

या शहरात 1986 साली झालेली दंगल बघितली. 1992 साली झालेल्या दंगलीचे प्रत्यक्ष वार्तांकन केलेले पण कालच्या या घटनेने मन ढवळून गेले. पुन्हा पुन्हा एक वाक्य कानावर यायला लागले.

ना जाने इस शहर को हुवा क्या है !

ना जाने ...... हुवा क्या है !

- प्रशांत दैठणकर
9823199466



          गणेशोत्सव हा आमच्यासाठी ख-या अर्थानं स्वर्णीम काळ असायचा वर्षातला. सातव्या-आठव्या वर्गात असताना कळायचं तसं किती, मात्र खरा आनंद ज्याला निर्भेळ आनंद म्हणता येईल असा आनंद त्याच वयात आणि गणेशोत्सवातच मिळायचा.
     सराफा बाजारचा गणपती शहरातला सर्वात श्रीमंत गणपती मात्र त्यावेळी त्या श्रीमंतीचं फारसं कौतुक नसायचं त्यावेळी शहर इतकं पसरलं नवहतं. सकाही आवर्जून मराठवाडा लोकविजय, अजिंठा आणि लोकमत बघायचा कारण आकर्षण होतं सिनेमाचं. समर्थनगर असो की स्नेहनगर कुठं आज सिनेमा आहे याची माहिती काढून ठेवायची.
     विश्‍वास नगर, नवीन वाटतं का नाव ?  हो विश्‍वास नगर , विश्‍वास पानीपतावर गेला तसा या भागाचं नावही गेलं. विश्‍वास नगर म्हणजे लेबर कॉलनी होय. त्याच प्रमाणे कोटला कॉलनी या शासकीय कर्मचा-यांच्या वसाहती, इथं आवर्जून सिनेमा दाखवला जायचा.
     मोठ्या पटांगणात बांधलेला पडदा. त्यावर सिनेमा सुरु व्हायचा आणि त्यासोबत गाणं सुरु व्हायचं `  गाडी बुला रही है , सिटी बजा रही है ` धर्मेंद्रचा चित्रपट ` दोस्त `  आणखी एक आवडता आणि वारंवार बघितलेला चित्रपट म्हणजे मनोज कुमारचा ` रोटी कपडा और मकान `  त्यातही गंमत डावखुरा अमिताभ पडद्याच्या दुस-या बाजूने उजवा असायचा आणि गर्दी पडद्याच्या दोन्ही बाजूनी रहायची.
     पडद्यावरच्या चित्रपट चालू आपण रस्त्यावर एखादं पोतं घेऊन त्यावर मांडी घालून बसायचं ... आपण असं रस्त्यावर बसलोय यात काही वाटायचं नाही त्या वयामध्ये. ब-याचदा पावसानं ओल्या मातीवर बसायचं ती ओल अंगभर पसरायची पण सिनेमाचं ते आकर्षण उठू देत नसे.
     अगदी भरपूर वेळा पाहिलेला आणखी एक चित्रपट म्हणजे ` आम्ही जातो आमच्या गावा ` त्यातला प्रत्येक प्रसंग स्मरणात राहिलेला आहे. त्याच काळात ` हाच मार्ग एकला `  तसेच `वहिनींच्या बांगड्या `   असे चित्रपटही औरंगाबादच्या रस्त्यांवर बसून पाहिलेत.
     आज कुंभारवाडा परिसर पूर्ण गजबजलाय. तिथून मुलांसोबत जाताना जूना गणेशोत्सव आठवतो त्यावेळी मुलांना मी सांगतो बेटा इथं रस्त्यावर बसून आम्ही सिनेमा बघायचो त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया `  काय बाबा काही सांगता काय ?  अशी असते फेम, आणि पीव्हीआर मध्ये सिनेमा बघणा-यांनी अशी प्रतिक्रिया देणं सहाजिकच आहे.
     रस्त्यावरचा तो सिनेमा दाखवायचं काम माहिती कार्यालयाचे कर्मचारी करायचे. 2000 साली मी ज्यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मी औरंगाबाद येथे रुजू झालो त्यावेळी त्या माहिती कार्यालयाचा बॉस म्हणून मला प्रथम आठवण त्या रस्त्यावरच्या सिनेमाची झाली ..... काळाच्या ओघात बरच चित्र बदललं आहे पण स्मृतिचित्रातला रस्त्यावरचा सिनेमा आजही बघावा वाटतो.
औरंगाबादची ओळख.. दख्खन ताजमहल अर्थात बीबी का मकबरा

No comments: