Wednesday, 23 May 2018

तू तेंव्हा तशी....! तू तेंव्हा कशी....!

मोटार सायकलची गती वाढली तशी तू मला अधिकच बिलगतेस हे मला जाणवलं. त्यानंतर माझ्यातलं असणारं वेगाचं वेड अधिकच वाढलं...... तुझी माझी भेट झाली त्यानंतर पहिल्या वेळी तुला घेऊन राईडला निघालो तो दिवस मला चांगला आठवतो....!

महिना ऑगस्टचा.... अर्थात श्रावण.... ती श्रावणी धुंद करणारी हवा..... हवेत अधून मधून जाणवणारा तो गारवा, उन्हं पडलीत वाटतानाच येणारी हलकीशी ती पावसाची सर अन् सर्वत्र नजरेला सुखावणारी हिरव्या रंगाची पखरण.....सारं कसं स्वप्नवत अशा त्या श्रावणातल्या दुपारी साधारण चार साडेचारची वेळ...... तू होकार दिलास आणि बाईकवर बसलीस.

बाईक शहरी रस्त्यावरुन हायवेला लागली. सहाजिकच मी बाईकचा कान पिळत गती वाढवली. त्यावेळी बोललीस "सांभाळून रे..." मला तो सुर काळजीचा वाटला मग चटकन मी गती कमी केली. घाटातल्या वळणांवर वरुन डोंगरावरुन अधुनमधून पडणारे ते श्रावणी धारांचे तुषार झेलत घाटमाथ्यावर तू आणि मी........ कसलं एकाकीपण..... सगळी गर्दी जोडप्यांची झालेला हिरमोड आणि मग भाजलेली कणसं हातात घेऊन ड्राईव्ह करतच परतलो.

फिरायला मोकळीक असली तरी सगळीकडे गर्दी असल्यानं हवा-हवासा एकांत जरा दुर्मिळ.... मग ठरवलं नुसतीच राईड घेत जाऊ.... नको कुठं थांबायला ...... अशाच निवांत शनिवारी कॉलेज बंक करुन निघालो..... सवयीप्रमाणे माझी गती वाढली तू म्हणालीस "सांभाळून रे...." पण दुसऱ्या क्षणी तुझ्या त्या बिलगण्याची आणि निकट स्पर्शाची जाणीव झाली. पाठीवर गुदगुल्या होतात असं कुणी म्हटलं असतं तर मी त्याला मुर्खात काढलं असतं......पाठीवरल्या गुदगुदल्या अन् अंगभर रोमांच..... लाईफ बन गई.....

अनेकदा मुलीच्या नकारात होकार असतो म्हणतात..... या निमित्तानं मला चांगलं पटलं की खरच नकारात काहीसा होकार होता....... का वागत असतील बरं मुली अशा ...... मला कोडयात टाकणारा प्रश्न.....

मुलींचा स्वभाव आणि त्यांचं वागणं हे एक गुढ असतं ते जाणता आलं तर प्रेमात अधिक मजा येते.....प्रेमाचं ठीक आहे. हा गुढपणा जाणता आला तरच नेटका प्रपंच करता येतो नाही तर प्रपंचाचा पंचनामा ठरलेला.

ज्याला कळून घेणं केवळ अशक्य आहे अशा गोष्टी अनेक असतात आणि अशा गोष्टी आयुष्यात रंगत आणत असतात. तुझ्या एकाच प्रकारच्या प्रतिक्रियेचा दोन प्रसंगातला अर्थ वेगवेगळा आहे असं जाणवलं..... आता खऱ्या अर्थानं अक्कलदाढ आल्याचा अनुभव आला... हो म्हणतात ना प्यार सबकुछ सिखा देता है.

तु- आणि मी प्रवास चालू आहे अव्याहत.... अखंड तू मला आणि मी तुला चांगलं जाणलं असं वाटताना काही नवं घडतं आणि दोघांना एकमेकांची ओळख होते...... हो ओळख होते नव्याने.....

माझे सगळे मित्र म्हणतात की, मी कोणत्या क्षणी कसा वागेल याचा अंदाज करणं अशक्य आहे ते मला Unpredictable म्हणतात. काळाच्या पटलावर चालताना भूतकाळ आलेल्या अनुभवातून आलेली प्रगल्भता आणि त्या-त्या घटनेच्यावेळी असणारी मानसिक स्थिती यातून मी प्रत्येक परिस्थितीला React करतो. ते प्रत्येकजण याच पध्दतीने करतं असं मानसशास्त्र सांगतं मग मी इतरांपेक्षा वेगळा म्हणजे असा Unpredictable कसा ठरु शकतो.

हां..... नाही म्हणायला मी जरा तिरकस विचार करतो. आयुष्यात आपण नेहमी सरळ वळणाची वृत्ती असावी असे म्हणतो..... आजवर मी कोणतेही सरळ वळण बघितलेले नाही म्हणून कदाचित जरा विनोदबुध्दीचा वापर करुन आयुष्यातील रुक्षपणा टाळता यावा आणि रंजकता वाढावी यासाठी वेगळा विचार करुन मी रिॲक्ट होतो..... याला कदाचित सारे Predict करीत नसतील म्हणून मी Unpredictable असेल....!


माझ्या दृष्टीकोणातून बघशील तर या बाबतीत 'आयटम है हम दोनो' असं म्हणावं वाटतं......माझा हा स्वभाव तुझ्या स्वभावामुळे आलाय. घटना एक आणि प्रतिक्रीया प्रत्येक वेळी वेगळी देतेस तू.....

आठवतं तूला तुझ्या याच स्वभावासाठी मी म्हणायचो

तू तेंव्हा तशी....!

तू तेंव्हा कशी.....!

आयुष्य स्वच्छंद जगावं.....बंधन असतात अनेक पण यमकातला मुक्तछंद शोधणं काही अवघड नसतं. चाकोरीबध्द जगणं म्हणजे रुक्षपणा.....रुटीन.....! अगदी मनमानेल तसं न वागता देखील मनसोक्त जगता येतं की, ....तू शिकवलस एका वाक्यातून......सांभाळून रे.....! मी पुन्हा बाईकला गती देतो आणि पुन्हा तू बिलगते......! वयाचं वाढणं शरीराची स्थिती हेच खरं..... दिल तो रखो वैसा है कहो तो जवान....! समझो तो जवान..... तुला त्या बिलगलेल्या अवस्थेत श्रावण सरींच्या साक्षीने मी पुन्हा स्पीड घेतो यावेळी तारुण्यातल्या श्रावणात......!

- प्रशांत दैठणकर

9823199466

1 comment:

Ashtavdhani said...

Beautiful expressions Prashant .

Anirudha