Monday 30 July 2018

गारूड.... गॉसिप.....अन् ..... रेखा....!




काही लपवायचं ज्यावेळी आपण ठरवतो त्यावेळी ती गोष्ट असंख्य प्रयत्न करुन लपत नाही..... प्यार और खुशबू लाख छुपाओ छुप नही सकती असं म्हणतात ते अगदी खरं आहे.

अर्थात सुचण्यास कारण की, आयफा अवार्डस् मधलं अभिनेत्री रेखाचं वय 20 मिनिटांचं नृत्य. या नृत्यानं इन्डस्ट्रीला खूप मोठी सफर घडवली. जुन्या काळाची आणि जुन्या स्मृतींना उजाळा दिला.

फार काही कळण्याचे ते दिवस नव्हते. मात्र त्या काळात जमा झालेल्या आठवणीच्या खात्यात सर्वात अधिक प्रमाण सिनेमा आणि सिनेमातली गाणी यांचेच होते . .
यासाठी मी आजकाल कधीच संगीत ऐकत बसत नाही पण कानावर एखाद्या गाण्याची लकेर आली तर ते तबकडीवर सुई अडकावं तसं ते गाणं दिवसभर कानामध्ये नाद करीत राहतं.

आपली चित्रपटसृष्टी ग्लॅमर आणि गॉसिपचा प्रचंड मोठा महासागर आहे. 1975 ते 1985 च्या काळात टिव्हीचा शिरकाव झालेला नव्हता त्यावेळी मनोरंजन हे केवळ मासिक , साप्ताहिके आणि रेडिओच्या आधारे व्हायचं . . त्याकाळी चित्रपट बघणे हा साप्ताहीक उपक्रम होता . . . हमखास ठरलेला उपक्रम . . ! चित्रपट सृष्टीवर अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चनचं राज्य सुरु झालं आणि विस्तारत गेलं तो खरा सूपरस्टार होता आणि त्यामुळेच त्या काळात ज्यांचं बालपण गेलं त्यांना आठवणींचा हा खजिना गोळा करता आला. ' मायापुरी ' नावाचं साप्ताहीक त्या काळी लोकप्रिय होतं त्यात ' मगर हम चूप रहेंगे ' असं सदर हे गॉसिपला अर्पण केलेलं होतं . . .
त्यानं मोठया प्रमाणावर चर्चेची राळ उठवून देण्याचा जणू चंग बांधला होता आणि लोकांनाही ते आवडत होतं . . आम्हीतर लहान होतो . . . पण अाजही छापून आलेल्या शब्दावर विश्वास ठेवणाऱ्या ( अगदी डोळेझाकून . . ! ) या देशात त्याकाळी विश्वास ठेवण्याखेरीज पर्यायच नव्हता.

अठरा बरस की तू . . होने को आयी रे
कौन पुछेगा . . . जतन कुछ करले . . !

रेखा आणि अमिताभचं अफलातून गाजलेलं गाणं . . ते नंतरही लक्षात राहिलं त्याला वेगळं कारण आहे . . कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये म्यूझीकल फिशपाँन्ड अर्थात शेलापागोटयांचा कार्यक्रम असे . . . यातील गाण्यांच्या रेकॉर्डिगची जबाबदारी अर्थातच गाण्यांचं अधिक ज्ञान असल्यामुळे माझ्यावर होती महाविद्यालयातली ती सर्वात सुंदर मुलगी ( नाव सांगत नाही ) तिला बघण्यासाठी सेकंड इयरची मुलं फर्स्टइअर च्या वर्गात बसत असत इतकी सुंदर

                                                                   हे अठरा बरस की . . . !    गाण तिला फिशपॉन्ड म्हणून टाकलं . . . कौतूक वाटलं पाहिजे होतं पण ती रडायला लागली . . . सारा रुदनकल्लोळ झाला . . प्रिन्सिपलकडे तक्रार झाली आणि त्या वर्षापासून आजपर्यंत फिशपॉन्ड चा कार्यक्रम कॉलेजमध्ये झालेली नाही . . . . याला आता तब्बल 30 वर्षे झालीत .

त्या काळी चर्चा केवळ अमिताभ आणि रेखा यांचीच होती . . . नेमकेपणानं वास्तवाच्या बाबती माहितीची गॅप जिथं निर्माण होते तिथं गॉसिप सुरु होतं अशी माझी गॉसिपची मी स्वत: केलेली सोपी व्याख्या आहे . . . हे गॉसिप आजचं नाही हे महाभारताच्या काळापासून चालत आलय . . धर्मराज्य सत्याखेरीज काही बोलत नाही हे माहिती असल्यानं युध्दात अश्वस्थामा मरण पावला का असं गुरुवर्य होणाचार्यांनी विचारलं त्यावेळी धर्मराजाचं उत्तर होतं . . . हो परंतु पुढे पुस्ती जोडली होती . . . . नरो वा कुंजरोवा . . . ! अश्वस्थामा मेला पण नर की हत्ती माहिती नाही . . . हे नरो व कुंजरोवा म्हणजे ज्ञात इतिहासातलं पहिलं गॉसिप होतं.

अमिताभ असो की रेखा दोघांनीही आपल्यात प्रेमसंबंध आहेत की नाही याचा
आजवर खुलासा केला नाही..... त्यांच्या प्रमाच्या गॉसिपला सत्य असल्याचा दर्जा देणारा ' सिलसिला ' चित्रपट आला आणि पब्लीकने त्यावर पुर्णपणे ' आहेच ' असं शिक्कामोर्तब केलं.....!

रुपेरी पडद्यावरील रेखा-अमिताभ यांची केमिस्ट्री मात्र अफलातूनच होती... तो मग ' मुकंदर का सिकंदर ' असो की सुहाग वा सिलसिला.... नात्यातला मोकळेपणा गॉसिपला वाव देणारा होता आणि तेच आजवर कायम आहे. दोन व्यक्तींमधील वेवलेंग्थ जुळणं आणि त्यातून पुढे कलाकृती सादर होणं यात अमिताभ आणि रेखा यांची तोड कुणालाच नाही..... अमिताभचा विवाह जया भादुरी सोबत झाला आणि तो आजवर कायम आहे. तर रेखाचे 4 विवाह झाले पण आजही तिचं स्टेटस सिंगल आहे.....!

प्रत्येक व्यक्तीला स्वत:मधील नायक खुलवण्यासाठी अशी जवळीक आवश्यक असते. बहुतप्रसंगी ती जवळीक पत्नीच्या नात्यात मिळत नाही म्हणून अशा नात्याला नावं ठेवण्याची गरज नाही... असं नातं कधी कधी वरदान असतं..

रेखाचं नृत्य ते देखील सलग 20 मिनिटे.... आजचं तिचं वय 63 वर्षांचं आहे...
. तिचं सौंदर्य वादादीत आहे. आणि तिचा स्टॅमिना थक्क करुन सोडणारा आहे. आज चाळीशी ओलांडलेल्या केवळ स्त्रियाच नव्हे तर पुरुषांनीही स्वत:ला ' मेन्टेन ' करण्यासाठी रेखाची प्रेरणा घ्यावी असं सांगावं वाटतं....!

वय आणि सौंदर्य .... काय संबंध ? वयानुसार सौंदर्य वाढत जाणं ही खरी कमाल आहे. ती रेखाच्या रुपानं बघायला मिळते.... या सलग नृत्यात असलेल्या अखेरच्या गाण्यात तिने अमिताभ बच्चनच्या नाचातील स्टेप्स साकारल्याने आता पुन्हा गॉसिपला नवा मार्ग खुला झालाय असं म्हणायला हरकत नाही. रेखा गणेशन.... खरं नाव भानुरेखा गणेशन. जन्म 10 ऑक्टोबर 1954 .... बाल कलाकार म्हणून वयाच्या 12 व्या वर्षी तामीळ चित्रपट ' रंगुला रतनम ' व्दारे चित्रपट सृष्टीत पदार्पण .... चित्रपट सृष्टीत सुवर्ण महोत्सव पुर्ण करुन त्यापुढील वाटचाल सुरु केलेली.... तिचं आयफातलं नृत्य सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का देणारं होतं....!

सातत्य ...आणि सराव याच्या बळावर आपण किती मोठं यश मिळवू शकतो हे रेखाच्या आजवरच्या वाटचालीतून दिसलय..... ये जो पब्लीक है.... ये गॉसिप करनेसे खुद को रोक नहीं सकती.... आपणच आपली वाटचाल जारी ठेवायची....
आयुष्याला कोणतीही ' लक्ष्मणरेखा ' न आखू देता चालत रहायचं... रेखाचं गाॅसिप जितकं आहे त्याहीपेक्षा अधिक तिच्या सौंदर्याचं गारुडही विलक्षण आहे हे मान्य करावंच लागेल...

- प्रशांत दैठणकर

9823199466

No comments: