Thursday 20 June 2019

जब्रा फॅन.. आणि मर्लिन...!


नशिब कुणाचं कसं आणि कधी बदलेल हे सांगता येत नाही आणि सोबतच काही जण प्रसिध्दी आणि वादाचं वलय घेऊन जन्माला येतात. अशांच व्यक्तीमत्व आणि वाद यांच नातं कर्णच्या त्या कवचकुंडलासारखं असतं... त्याची कवच कुंडलं काढली गेली पण काही जणांची ती निघत नाहीत आणि जन्मानंतर मृत्यूपर्यंत वाद आणि ब-याचदा मृत्यूनंतरही त्याचा प्रवास पुढे सुरु राहतो अगदी मृत्यूनंतरही.

जगताना सौंदर्याचं परिमाण ठरलेही आणि जिला शापीत सौंदर्याची साम्राज्ञी असं म्हटलं जातं ते मेरेलीन (की मर्लिन ) मन्‍रो.. तिच्या मृत्यूचं गुढही तिच्या इतकं टिकलय आता तर तिचा पुतळा चोरुन नेण्याची घटना घडली... वाद - विवाद आणि सतत चर्चेत राहणं, अगदी मृत्यूनंतरही.

कालच तिच्याबाबतची एक पोस्ट कुणीतरी सोशल मिडियावर शेअर केली, ती बघण्यात आली... आम्ही तारे आहोतर आमचं टिमटीमणं हे दिसलंच पाहिजे अशा आशयाची ती पोस्ट होती... चाहत्यांना तेच आवडतं आणि त्यांची आवड जपण्याचं काम जे करतात त्यांना डोक्यावर घेऊन नाचणारे "जब्रा फॅन"  अर्थात जबरदस्त फॅन हाे... कमी नाहीत. त्यातच हा शर्विलक
चाहता वेगळा म्हणावा लागेल कारण त्यानं लेडिज ऑफ हॉलीवूड गझेबो येथून चक्क करवतीने कापून हा पूतळा जागेवरुन वेगळा केला आणि चोरुन नेला.

1955 सालच्या मर्लिनच्या " द सेव्हन इयर इच " चित्रपटातील भूमिकेवरुन हा पुतळा तयार करण्यात आला होता. आयुष्यात ग्रहांची साथ किती मिळाली हे ठाऊक नाही परंतु आयुष्य संपल्यानंतरही ग्रह बदलत असतात. याचंच हे एक उदाहरण म्हणता येईल.

हॉलीवूडचं हे आरसपानी सौंदर्य असणारी व्यक्ती म्हणून मर्लिनला जिवंतपणी खूप चर्चेत राहण्याची सवय होती. आता इतक्या वर्षांच्या कालावधीनंतर देखील त्यात काही कमतरता राहिलेली नाही हेच स्पष्ट होतय या चोरीच्या घटनेवरुन...!

सौंदर्याला असणारी शापीतपणाची किनार हा विषय सर्वच क्षेत्र थोडयाफार फरकाने लागू पडणारा आहे. रुपेरी पडदयावर जे दिसतं आणि घडतं त्याबाबत चर्चा होते आणि इतर बाबतीत चर्चा होताना दिसत नाही इतकच सांगता येईल परंतु सर्वच क्षेत्रात हा प्रकार आहे.

लहानपणी शिकवलेलं वाक्य आठवतं या संदर्भाने " जो आवडे सर्वांना तो ची आवडे देवाला " संदर्भ मर्लिन मन्‍रोचा आणि तिच्या पुतळयाबाबत घडलेल्या ताज्या घटनेचा असला तरी या संदर्भाने होणारे अंधानुकरण आणि त्यातून बळावणा-या अंधश्रध्दा हा देखील आहे.

आचार्य प्र. के. अत्रे यांच याकडे लक्ष वेधणारं " बुवा तेथे बाया " हे नाटक गाजलं होत. पण अनुकरणाचा हाच एक प्रकार नाही. जगाच्या इतिहासासोबत भुगोलही बदलणारा "ॲडॉल्फ हिटलर" याचे फॅन देखील मोठया प्रमाणात होते. राजकारण हे क्षेत्र देखील चाहत्यांचं आणि "जब्रा फॅन" असणा-यांच क्षेत्र आहे. याचा प्रभाव दक्षिण भारतात अधिक असल्याचं आपणास जाणवतं.

चाहतेपणाची मर्यादा आपण ठरवणारे कोण असा सवाल या निमित्तानं विचारता येतो. चित्रपटसृष्टीत वेगवेगळे अभिनेते, नायक आणि नायिका
आहेत त्या प्रत्येकाचे चाहते वेगळे आहेत आणि ज्याचे चाहते सर्वाधिक तो सूपरस्टार अर्थात चलनी नाणं असा इथला हिशेब

राजेश खन्ना असो की, अमिताभ बच्चन हे दोघेही सुपरस्टार राहिले असले तरी त्यांचे सर्वच चित्रपट तिकिटबारीवर स्विकारले गेले अशाही स्थिती नाही. या अभिनेत्यांनी राजकारणात जाण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना सपशेल नाकारण्याचा प्रकार देखील आपण अनुभवला याच्या नेमका उलट प्रवास दशिण भारतात आपणास दिसेल एम. जी. आर, जयललिता, एन.टी.रामाराव आणि अलिकडच्या काळात कमल हसन आणि रजनीकांत यांचा प्रवास रुपेरी पडदयावरुन राजकारण असा झालेला आपणास दिसेल.

एकुणच काय तर सर्वच क्षेत्रात सर्वांचा काळ बदलतजातो, आणि ग्रह बदलतात त्याप्रमाणे मृत्यूपूर्वीच नव्हे तर त्यानंतरही चर्चेत राहण्याचं किंवा ठेवण्याचं काम जगात सर्व क्षेत्रात सुरु असलेलं आपणास दिसेल
"मार्लिन" तर त्यातील शिरोमणी राहिलेली आहे... अगदी आजपर्यंत तिची लोकप्रियता कायम आहे हेच ताज्या पुतळा चोरीच्या घटनेवरुन स्पष्ट होते.

आकर्षण ही बाब नैसर्गिक आहे त्यात भिन्नलींगीआकर्षणाचा निसर्गनियम कुणालाच टाळता आला नाही. इतर प्राणी आणि मानव यात एक महत्त्वाचा फरक अर्थातच इतर प्राण्यात नर अधिक सुंदर आहे. आणि मानवात नेमका उलटा प्रकार आपणास दिसतो. याच विषयावर Men from mars, women from venus अशी सुंदर कांदबरी आहे. सां

सौंदर्य आहे तेथै आकर्षण असणारच अगदी ग्रामीण भागात सांगतात तसं धोका आहे तिथ खतरा असं काहीसं हे आकर्षणाचं गणित... याच आकर्षणाचा परमोच्च बिंदू म्हणजे असे शर्विलक असणारे "जब्रा फॅन" असतात... चाहते कोणती मर्यादा कधी ओलांडतील याचा अंदाज येण कठीण.. आणि त्याचा  अंदाज बांधून ते कसे वागतील याबाबत सांगणं देखील अवघडच आहे.
.पण चाहते असावेत आणि अधिकाधिक असावेत असा साऱ्यांचा आग्रह न दिसला तरच नवल.  आजच्या युगात सा-यांना प्रसिद्दीचं वेड आहे आणि त्याचं वलय हवं असं सा-यांनाच वाटतं.... आता ज्यांना ते मिळालं आहे त्याचं तर यानिमित्तानं कौतूक करायलाच पाहिजे ना... असे जब्रा चाहते कोणास नकोत बरं...

प्रशांत दैठणकर

9823199466

No comments: