Wednesday 19 June 2019

पाऊस ... विलंबित ख्यालातला ..... !



पावसाची वाट बघणारा चातक ऐकण्यात आहे पण यंदा पावसानं इतका विलंबित ख्याल लावला की माणूस देखील चातकाइताकाच या पावसाची वाट बघायला लागला... वाट त्याच्या येण्याची असते मग त्याला उशिर होताच खूप काही विचार केला जातो.... संकल्प केले जातात आणि यंदा तरी आला थेंब साठवायचं असं ठरवलं जातं... उशिरा का होईना तो येतो आणिसारं काही धूवून टाकतो... त्याच्या वाट बघण्यातले संकल्प देखील मग त्याच्याच वर्षावात वाहून जातात.

पावसाची मजा कही आगळीच म्हणावी लागेल नाही म्हणायला त्याचे उदाहरण तर हक्काने दिले जाते... ssमी पावसाळे पाहिलेत असं सांगून आपला मोठेपणा दाखवला जातो. तिथं पावसाचं परिमाण अनुभवाशी जोडलं जातं पण अनुभव हाच आहे की इतके पावसाळे बघून देखील कुणाचीही वृत्ती बदलत नाही.

पाऊस आपल्याकडे चार महिन्यांचा पाहुणा आहे. आमच्या लहानपणी कशी झड लागायची म्हणून सांगू असं सांगणारी आज चाळीशीतून पन्नाशीकडे जाणारी पिढी त्या पावसाचं ते कोणकौतुक करताना थकत नाही पण आढयावरचं पाणी इतके वर्षे ओढयाकडे जातं राहिलं आणि आताशा त्याचं येणं कमी झालं पण त्याची ओढयाकडे धावण्याची ओढ आम्ही रोखली नाही... पावसानं जरा ओढ दिली की शेतकऱ्याचे डोळे बरसायला लागतात पंरतु काँक्रीटच्या जंगलातील तुन्हा-आम्हाला काही दिवस कौतुक आणि नंतर तो खोळंब्याचा पाऊस ठरतो.

हल्ली सोशल मिडियाचं प्रस्थ खूप वाढलय त्यामुळे त्या पावसाच्या दोन सरी बरसताच त्यावरच्या पोष्टी आणि त्यावरील कवितेच्या गोष्टींचा पाऊस या मिडीयावर दिसतो. स्मार्टफोन आणि प्रत्येक हाती आलेला इंटरनेट यामुळं पाऊस माझ्या नजरेतून म्हणत कॅमेऱ्यातून टिपलेला पाऊस मिडीयावर जास्त बरसतो. इलेक्ट्रॉनिक मिडीयाला दरवेळी यात ब्रेकींग वाली खबर गवसते त्यात आम्हीच प्रथम म्हणत मान्सूनच्या आगमनापूर्वीच त्याचा होणारा पाठलाग आणि त्यातून रंगलेली ब्रेकींग ची स्पर्धा असा प्रवास होताना दिसतो.

त्याच्या आणि तिच्यासाठी पाऊस हा केवळ भिजण्यासाठी असतो उगाच भिजून त्यानं मेसेज पाठवायचा बघ तुला माझी आठवण ... वगैरे वगैरे.. ! 
पाऊस हा सर्वात मनोहारी आणि स्मृतीत जपण्याचा काळ... पावसाच्या  थेंबांचं कोंदण घालून चमकणारे तिचे गेसू हे हिऱ्यापेक्षाही अधिक मोलाचे असतात... माणसापासून सर्व प्राणीमात्रात या वर्षाउत्सवाचा आगळाच आनंद आपणास दिसेल.

इंटरनेटच्या पसाऱ्यात आभासी जगात जगताना पावसात अवचित भिजंण खऱ्या अर्थानं वास्तवात आणणांर असत... मात्र त्या पिढीला बिरबलानं पावसावर दिलेल्या प्रश्नांच उत्त्तर ठाऊक आहे असं मला वाटत नाही 27 मधून 9 वजा केले तर शिल्लक किती याचं उत्तर झटकन मोबाईलच्या कॅलक्युलेटरवर शोधण्याचा प्रयत्न ही नीव पिढी नक्कीच करेल पंरतु ते हमखास चुकणारं आहे... 27 मधून 9 गेले तर शिल्लक शून्य राहते हे फक्त मेहनतीनं मातीतून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यालाच सांगता येईल.

पाऊस म्हणजे आंनद... पाऊस म्हणजे जीवन... ग्रीष्मात पोळलेल्या धरतीला तृषार्थ करणार कृतार्थ असा काळ पावसाच्या येण्यासोबत जागे होणाऱ्या त्याच्या यापूर्वच्या आठवणी आणि त्या आठवणींचा पाऊस... आपल्या जीवनाशी निगडीत एक सत्य आणि दूरावणांर सत्य... काळ बदलला असं का म्हणतात तर काळ स्थिर नाही तो बदलत असतो पण माणसाच्या स्वार्थी जगण्यातून त्याच्या बदलण्यात असणारा धोका आता दिसायला लागलाय.. !

मनोज कुमारच्या पानी रे पानी तेरा रंग कैसा  गाण्यात पाण्याचा बदलणारा रंग त्यांच वैश्विक रुप सांगणार आहे पण असं गाणं म्हणायचं तर तो पावसाच्या धारांमधून बरसला तर पाहिजे ना !

पावसाला येण्याची आळवणी करणारं बालपणीचं गीत या निमित्त आठवतं... ये रे ये रे पावसा म्हणताना त्याची विनवणी करताना तुला देतो पैसा  असं बाळकडू अनेक पिढयांनी पाठ केलं त्यावेळी पैसा लागणार भविष्यकाळात आपणास कुठे माहिती होत...!
आज ती वेळ कुणी आणली आहे याचं उत्तर शोधताना स्वत:ला पाण्यात न पहाता आपण स्वत:ला आरशासमोर उभं रहायची वेळ आलीय हे निश्चित.

प्रश्न इतकाच आहे की धोक्याची घंटा सातत्याने वाजतेय .आपणच कान बंद करुन बसलो आहोत नाहीतर आपल्या कानात हेडफोनचे स्पीकर लावून बसलो आहोत असं वाटतं... !

तो पावसाळा आणि त्यासाठीची पूर्वतयारी... ती छत्री घेण... आता दरवर्षी नव्याने घेण कारण छत्री दुरुस्ती करणारी मंडळी काळाच्या ओघात संपून गेली असं म्हणावं लागेल...! पाऊस हवाहवासा म्हणताना तो सुरुवातीला हवा वाटतो मग तो सतत बरसायला लागल्यावर त्याच्या रिमझिम पडण्याची मजा विसरुन आपणच त्याला आधी रिपरिप आणि नंतर पीरपीर म्हणायला लागतो.

आपण आपल्या भूमिका बदलत असलो तरी तो त्याची भूमिका बदलत नाही बरसताना या अंगणात बरसायचं आणि त्या अंगणात नाही असा भेद तो करीत नाही... आता त्यानं त्याचा धर्म सोडला नाही हेच आपल्या जगण्यासाठी महत्वाचं आहे... त्यानं कुठे बरसावं हे त्याचं काम मात्र आम्ही बंधारे बांधत जिल्हया-जिल्हयात त्याच्या या दानाचं राजकारण करतो आणि आतातर युध्दाची तयारी पण... !

                                                                                                                           सारं सोड राजा तू बरस ....
त्या बळीराजासाठी बरस... ! जो आर्जवं करतोय..
पडं रे पाण्या.... शेत माजं लई तान्हेल चातकावानी...

प्रशांत दैठणकर
९८२३१९९४६६

No comments: