Thursday 13 June 2019

बोन्साय...

ती आणि मी.... एक प्रवास आयुष्याचा....! 
आपण आपलं चालत रहायंच इतकच आपल्याला कळतं पण, हो इथ एक अल्पविराम असायलाच हवा कारण आपण चालत असताना आरंभ कुठे केलाय याचा विसर पडायला नको आणि कुठवर चालायचं चाची आठवण आपणास सातत्याने असायला हवीच ना ... ! आपल्यापैकी बहुसंख्य या चक्रात आहेत कारण क्षणभर थांबून आपण स्वत:ला विचारायला विसरुन जातो. रोजच्या रहाटगाडग्यात आपण स्वत:ला उत्तमरित्या गुंतवून घेतो आणि येत्या काळात समाधानी होवून याची अपेक्षा बाळगत जगत राहतो.. धावतो... ठेचकाळतो.... पडतो आणि पुन्हा उठून चालायला लागतो... त्या सावरण्यात आपण हळूहळू सराईत होतो आणि त्यातच आपलं मोठेपण आहे असंहीह मानायला लागतो इतकच नव्हे तर आपण किती योग्य असे आहोत, याचं वकिलपत्र घेतल्याप्रमाणे आपली भूमिका साऱ्या जगाला पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतो. 

आपली भूमिकाच योग्य आहे हे पटवून देताना आपण नेमकपणानं जगायचं म्हणजे काय करायचं हे विसरतो असं मला हल्ली जाणवायला जागलय...!

आपण जन्माला आलो त्याक्षणी सारं जग मोकळं असतं.. खुलं आकाश, हा धुंद करणारा गंधीत वारा आणि निसर्गानं दिलेलं दान.. ते दान निसर्ग इथं जन्माला आलेला प्रत्येकाला मिळालेलं असतं मात्र नंतरच्या काळात आर्थिक बंधनात बांधायला आरंभ होतो.

...पालकांची कुवत इथं पाल्याला घडवते. त्याच्या ठायी असणांर
नैसर्गिक कसब आणि कौशल्य इंथ महत्वाचं ठरत नाही... पाल्याच्या शाळा प्रवेशापासून त्याच्या वस्त्र प्रावरणांवर एक Price Tag लावला जातो.. कधी या Tag च्या आसपास तर कधी त्या समाजातील रुढी आणि परंपरा व ज्यांच्या समवेत राहतो त्यांच्यात असणारी स्पर्धा यातून आपणच कसं वागायचं...कसं बोलायचं याचं "सलायन" त्या बालकाला चढवतो.... याला घडवणं म्हणालचं की अडवणं असाही सवाल मनात येतो ...! यात त्या जिवाची होणारी घालमेल आणि त्याचं गुदमरणं आपणास कळतं.. .. पण केवळ परिस्थिती ....आणि आर्थिक स्थिती म्हणत त्या वाढत्या जिवाच्या आशा- आकांक्षांना आम्ही मुरड घालत राहतो. त्यांची वेदना आपणापर्यंत पोहोचली तरी दोन क्षण अश्रु ढाळून आपण आहे त्याला रुजू करुन घेतो आणि त्यालाही ते स्विकारायला भाग पाडतो... हो त्याला आपण अपरिहार्यतेचं रुप देतो... !

अपरिहार्यता मानत वागणारा समाज अशी खुरटी पिढी घडवताना पाहून खेद वाटतो... ! ही वेळ आपणा सर्वांवर का आली आहे याचा विचार करण्यासाठी क्षणभर विश्रांती घ्यावीच लागेल... !

पालक म्हणून नवी पिढी घडवताना बाप आपलं सर्वस्व पणाला लावतो आणि आई आजन्म सेवारत राहते... हे देखील एक वास्तव... हेवास्तव नाकारता येणार नाही मात्र त्यांनाही विचाराव वाटतं की तुम्ही किमान एक क्षण स्वत:ला मुलांच्या भूमिकेतून वळून बघितल आहे का... ? त्यांना मोठं करणं...
त्याचं आयुष्य घडवण इथवर ठिक आहे.. पण त्यांना तुमच्याकडून नेमकी काय अपेक्षा आहे याचा कधी विचार केलात का आपण ?

प्रत्येक क्षणी आयुष्य म्हणजे तडतोड हे म्हणण चुकीचं आहे...कधी त्यांच्याही भावनांना जाणलं पाहिजे , त्या भावनांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या त्या भावनांना हात घातला पाहिजे.. त्यांची साद ऐकली पाहिजे आणि त्याला प्रतिसाद दिला पाहिजे.

मुळात आई-बाप आयुष्य घडवतात ते आपले गुरु आहेत या आदरापोटी मुलं संवाद साधत नाहीत... तिथं त्यांना मैत्रीची साद घातली गेली नाही तर असे family ही भावना संपून मुलांसाठी we are being ruled झाली की त्यांच्या आशा-अपेक्षांची पंख वाढत नाहीत...जन्माला आला त्या क्षणी गरुडभरारी घेण्याची ताकद असणाऱ्या त्या चिमणपाखरांना आपण चिमणी पाखरं ठेवणार की
त्यांच्या पंखात बळ देणार याचाही विचार आपण करा असं आवर्जून सांगावं वाटतं..

आजकालच्या स्पर्धेच्या युगात असं जगावंच लागतं असं म्हणणं कितपत योग्य आहे याचादेखील आपण विचार करावा... आयुष्याला सर्व प्रकारची शिस्त आवश्यक आहे, व्यवहार कौशल्य आणि जगाचं भान आणि जगण्याचं जाण देखील त्यांना आवश्यक आहे पण त्याही पेक्षा अधिक महत्वाचं आहे ते प्रेम. एक कुटुंब म्हणून असणारी आत्मीयता आणि जिव्हाळा.. त्यासाठी आर्थिक मर्यादा असू शकत नाहीत...

आपली पुढची पिढी आपल्यापेक्षा सरस आहे हे आपण प्रथम स्वत:शी कबूल केलं पाहिजे आपली पुढची पिढी म्हणजे आपलं दुसरं रुप हे मान्य करा मग सारं सुरळीत होईल हे नक्की... 

प्रशांत दैठणकर
९८२३१९९४६६

No comments: