Tuesday 18 June 2019

राधा.... किशनकी

कृष्ण.. अनेक कंगोरे असणारं एक पात्र. पुराणात बघताना आपणास त्या पुराणात अनेक पात्र दिसतात मात्र त्या इतरांपेक्षा कृष्ण किती वेगळा होता हेच आपणाला जाणवतं. त्यानंतर कृष्णाच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्‌यात असणारं वेगळं रुप आणि त्याला असणारं वलय खुपच भिन्न आहे. समरसता काय असते त्याची ती आगळी कहाणी होती असं काहीसं आपणास या बाबत सांगता येतं..

बाळकृष्णाच्या त्या खोड्या ते दूध-दही-लोणी खाण्यासाठी संवगड्यांना जमवून दहीहंडी फोडणं.. . सुदाम्याशी असणारं त्याच सखा म्हणून नातं, त्याची कहाणी वेगळी. बंधू प्रेमाचा अध्याय देखील वेगळा एका जीवनात अनेक नाती जपणं आणि ती जगणं आणि त्यातून आलेलं महाकाव्य.

अर्जुनाच्या मैत्रीत त्याचा खऱ्या अर्थानं सारथी होणे आणि एक ज्ञानी तत्वज्ञाच्या रुपामध्ये जगाला दिलेलं गीतेतून आयुष्य जगण्याचे भान आणि आयुष्याचा उलगडून दाखविलेला मार्ग सारं काही अदभूत असंच आहे असे म्हणता येईल.


या संपूर्ण प्रवासात त्याचं जोडलं गेलेलं राधेशी असणारं नातं मात्र अधिक प्रचलनात आलं.. तो राधेचा कृष्णाशी असणारा आत्मसंवाद आणि तादात्म्यभाव या नात्याला अनोखं नातं बनवणारा ठरला. त्याचं अनोखेपण हेच की कृष्णाचं नाव घेण्याआधी राधेच नाव घेतल जातं.

राधाकृष्णाचं नातं शब्दातीत आहे इतकच म्हणता येईल. राधेची समर्पणाची भावना सर्वांनी इतकी पुढे नेली की या नात्यात राधेचं नाव अग्रस्थानी आलं.

राधा ही काही कृष्णाची पत्नी नव्हती. कृष्णाची पत्नी रुक्मिणी होती मात्र रुक्मीणीसारखी सुंदर पत्नी असताना देखील राधेचं नाव कृष्णाशी नुसतंच जोडलं गेलं अस नाहीतर या नावाची उंची रुक्मीणीपेक्षा अधिक झाल्याचे आपणास जाणवते. राधा आणि कृष्ण यांच्या कथेतील कृष्णाची आणि राधेची प्रिती जी सांगण्यात येते त्याचं वर्गीकरण कसं करावं हे नेमकेपणानं सांगणं अवघड आहे इतकच म्हणता येईल.

प्लॅटॉनिक लव्ह असं म्हणावं का... ते विकारशुन्य पण भावनांनी ओतप्रोत असणारं देहातील असं स्वर्गीय प्रेम होतं अस म्हणावं.. म्हणूनच आरंभीच म्हटलं की ते सारं काही शब्दातीत आहे.

तुमच्या आमच्या आयुष्यात असं नातं येत का?
अन आलं तर आपण त्या राधा कृष्णाच्या प्रितीतील पवित्र्य आपल्या नात्यात जगतो का.. पहिल्याचं उत्तर होय असं शक्य आहे असं आहे. असं प्रेम अनेकांच्या आयुष्यात नक्कीच येते स्वभाव आवडला, नजरभेट झाली आणि प्रित जडली असं घडतं पण ते विकार विरहीत असतं नाही हे मात्र खरं...! आणि ते प्रेम प्लॅटॉनिक वगैरे तर नक्कीच नसतं इतकं खात्रीनं सांगता येतं ...

मानवी मन आणि भावना या किती गतिमान आहेत याचं उत्तर विज्ञान शोधत आहे. आजवर झालेल्या याबाबतच्या संशोधनानुसार एका मिनीटात मनात साधारणपणे 21 भिन्न्‍ विचार येवून जातात. इतकं चंचल मन असताना एकाच भावनेवर मन स्थिर करणं केवळ प्रेमात शक्य होतं का... एक सहज विचार.

राधाकृष्णाच्या कहाणीकडे अनेकदा बघताना वाटतं की खरं प्रेम कशाला म्हणायचं.. कृष्णकथेत नंतरच्या काळात कृष्णाच्या प्रेमात विष पिऊन प्राण त्यागणाऱ्या मीरा .. तिचं ते काय काय ते वेगळं होतं.. राधा तर प्रत्यक्षात कृष्णासोबत गोकुळात त्याच्या आसपास होती मीरा.. तिचं तसं नव्हतं तरी ती कृष्ण प्रेमात पडली.. आता याला साऱ्यांनी कृष्णाची भक्ती म्हणणं खचितच पटत नाही. कृष्णावरील प्रेमाने (की भक्तीने?) तिचही नाव कृष्णासोबत जोडलं गेल..


इक राधा, इक मिरा,दोनोंने श्याम को चाहा |
इक प्रेम दिवानी, इक दरस (दर्शन) दिवानी |


रुक्मीणी आणि कृष्णाच नातं आणि राधा आणि कृष्णाची प्रेम कहाणी आज वेगळ्या अर्थाने प्रचलनात आली ती प्रेमाचा त्रिकोण म्हणून वापरत आहे चित्रपट आणि टिव्ही वाहिन्यांनी वापरुन आपली कलात्मकता म्हणत व्यवसायात एका अर्थाने पोटार्थी वापरली असल्याचं दिसतं.

माझ्याही आयुष्यात अशी एक राधा आहे असं सांगावं असं प्रत्येक पुरुषाला वाटतं पण ते शक्य होतं नाही कारण प्रत्येकजण कृष्ण नाही ना.. आता हे सारं आठवायचं आणि शब्दात मांडायच कारण म्हणजे माझ्या आयुष्यातील राधा होय...! आता प्रत्यक्षात जगताना राधा आसपास असते हे मनमोकळेपणे सांगायला हिंमत करताना घरातल्या रुक्मीणीची किंचितशी भिती सा-यांनाच असते आणि त्यामुळेच मनातलं मनात राहतं.. त्या भावनेतून ज्या मुलीकडे आपण बघतोय त्या मुलीला देखील न सांगण्याचा इथला रिवाज आहे..त्याला वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर इतकच म्हणता येईल की भावना प्रबल असूनही आम्ही कधी कधी

हमसे आया ना गया.... और तुमसे बुलाया ना गया .....!

असं गाणा-या त्या नायकाच्या भुमिकेत आपले वीर दिसतात ....
मला याबाबत इतकंच सांगता येईल की दान निसर्गाचं आहे ते त्याला का नाकारायचं.. आहे प्रेम तर सांगून मोकळं व्हायचं..आली होती माझ्या आयुष्यात ती राधा अशीच ते मी कधी नाकारलेलं नाही आणि नाकारणार देखील नाही.. .......मनात आहे ते मी आहे तसं मांडलय ... !

राधा माझी ... आयुष्याला वेगळा अर्थ देणारी . अर्थात रुक्मीणीवरही तितकीच प्रिती आहे म्हणून तर प्रेमविवाह केलाय..! आयुष्याच्या या वळणावर हे सारं सांगताना आयुष्यात खुप जगलो .. प्रेम भरपूर केलं याचं समाधान आहे. जिदंगी से चार पल मांगकर लाये हैं.. सारे ही इंतजारमें ना चलें जायें यार .. दो तो समझनेसे पहलेही गुजर गये.. बाकी युंही ना गुजर जायें जिंदगीसे मायुस होकर.. प्यार किया है तो जताना भी जरूरी है.. वरना ये भी इक ख्वाब समझ लेना दोस्तों.. आंख खुली और बिखर जाये.. जी लो जिंदगी जी भर के..

आता लिहिलंय .. हे उमटेल त्यानंतर एकच काम

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,
चला जाऊ पुसायला .
..




प्रशांत अनंतराव दैठणकर

9823199466

4 comments:

Anirudha Ashtaputre said...

Beautiful. Love you Prashant
Anirudha

Prashant Anant Daithankar said...

Thanks Anirudha

Vijaykumar Raut said...

So Nicely Narrating your thoughts... Superb...

Prashant Anant Daithankar said...

thank you vijay