Wednesday, 5 October 2011

सिमोल्लंघन सोनेरी हे ... !          गरबा रंगत रंगत रात्री दोन अडीच वाजेपर्यंत चालण्याचा काळ अर्थात 10 वाजेचे बंधन येण्याच्या आधीचा. रंगलेला गरब्यानंतर त्या मध्यरात्रीच्या निरव अशा शांततेमध्ये गप्पा मारत शांततेचा भंग करीत घरी परतायचं आणि झोपेच्या नादी न लागता मस्तपणे गरम पाण्यात अंघोळ करायची आणि एकमेकांना आवाज देत गल्लीच्या कोप-यावर सारे जमा व्हायचे.
     त्याकाळी फोनच नव्हते तर मोबाईल आणि मिसड् कॉल ही भानगड कुठली. ग्रुपची विशिष्ट अशी एक शिट्टी होती. आणि ती सा-या गल्लीला परिचित झाली होती मग पहाटवा-यात सारी गँग गुलमंडीवरुन कर्णपु-याकडे मार्गक्रमण करायला लागायची.
     आदल्या रात्रीपासून झेंडूचा सोनेरी ढीग आणणारे शेतकरी एव्हाना सा-या रस्त्याची किनार सोनेरी करुन टाकायचे तो सोनेरी  बहर डोळ्यात साठवेपर्यंत कर्णपूरा कधी यायच हे कळायचं नाही.
     इथंही रस्त्याच्या बाजूला झेंडूची फूलं आणि आपण ज्याला सोनं म्हणतो त्या आपट्याच्या झाडाची पानं विकणारे असायचे. एव्हाना तांबडं फुटायला लागलेलं. झेंडूची ती फूले आणि आपट्याची पानं घेऊन पहाटे पहाटे तुळजामंदिरात दर्शन घ्यायचं.
     मागच्या बाजूला बालाजी मंदिरात वर्षभर उभा भव्य लाकडी रथ पून्हा कायापालट होवून सायंकाळच्या रथयात्रेसाठी सज्ज झालेला... तिथं फूलं आणि पानं वाहून परतीचा प्रवास त्यात घरी जाताना मस्त वाफळत्या चहाचा `कट ` आवश्यकच ठरायचाच.
     घरी आल्यावर साधारण 9 ते 10 वाजेपर्यंत झोपणे, तोवर स्वयंपाक रेडीच आणि मेन्यू देखील ठरलेलाच श्रीखंड आणि पूरी सोबत कांदा बटाटा भाजी सोबत भजी आणि कुरइई व पापड्या. गरमागरम जेवण चोपल्यावर पुन्हा दुपारी फुल्ल पडी मारायची.
      सायंकाळी फ्रेश होवून डोक्यावर टोपी त्यावर पहिल्या माळेला घटी पेरलेल्या गव्हाचे उगवलेले सुंदर पोपटी इवले इवले तुरे लावायचे ही आवड.     कोप-यावर रंगारगल्लीत असणा-या हिंगुलांबिका मंदिरात दर्शन घ्यायला निघायचं.
     दर्शन  घेऊन परत आल्यावर ओवाळणीचं ताट तयारच असे. त्यापूर्वी बळीराणा कापणे अर्थात दोन राक्षस प्रतिमा गव्हाच्या राशीतून तयार केलेल्या त्यापैकी एकामध्ये सोन्याची अंगठी लपवलेली असे ती अचूकपणे ओळखून त्या राक्षसाचं पोट चाकूने कापून छोट्टासा शूरपणा करायचा मग घरोघरी जाऊन सोनं लुटणं अर्थात खिसे भरुन जातील इतकी आपटयाची पानं गोळा करणं.
     औरंगाबाद 52 पुरे आणि 52 दरवाजांचं शहर याची सिमा पैठण गेटला संपे पूढे कर्णपूरा देवी चं दर्शन म्हणजे सिमा ओलांडणे अर्थात सिमोल्लंघन. दस-याची खरी मजा म्हणजे घराच्या आणि दाराला गाड्यांना झेंडूच्या माळा लावायच्या . अगदी खरं असल्याप्रमाणं ते आपट्याच्या पानाचं सोनं लुटायचं.. आणि  आठवण म्हणून माझ्या मिनूकडून ( त्यावेळचं ते प्रेम.. आता पत्नी ) मिळालेलं ते जुन्या 1986 च्या डायरीत ठेवलेलं आपट्याचं पान नुसतं पानातच नाही तर मनातही जपलं गेलय. तिचं नाव विजया आणि त्यामुळेही हा विजयादशमीचा सण खास हे वेगळं सांगण्याची गरज नको..
विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

                        - प्रशांत दैठणकर

No comments: