Thursday 24 November 2011

काहीच तं नी ....!


     महाराष्‍ट्राचं शेवटचं टोक असलेल्‍या बेळगाव जवळील निपाणीला आम्‍ही पोहोचलो. मी आणि माझा मित्र अश्‍वीन अर्थात अश्‍वीन वसंतराव देशपांडे कारने भटकण्‍याचा  दोघांनाही छंद जडलेला. अख्‍खा महाराष्‍ट्र आम्‍ही त्‍याच्‍या 766 क्रमांकाच्‍या मारुती कार मधून फरलो, सकाळी कोल्‍हापूरात दर्शन झालं होतं. महालक्ष्‍मीला नमन करुन निघालो. ब्रेकफास्‍ट बेळगावजवळ कुठंतरी करायचा आणि जेवण बेळगावात असा बेत.
     चांगलं मराठी पाटी असलेलं हॉटेल दिसलं. चला थांबू या म्‍हणत आम्‍ही  गाडी पार्क केली. खांद्यावर कळकट झालेल्‍या कपड्यासह वेटर आला त्‍यानं त्‍या  कपडयानं टेबल पुसलं आणि काय आणू साहेब असं विचारलं. अश्‍वीनने सांगितलं दोन प्‍लेट आलू वडा आणि रस्‍सा आण. हा आमच्‍या दोघांचा आवडता पदार्थ. त्‍यावर त्‍या वेटरनं सांगितलं ते उपलब्‍ध नाही. बरं दुसरं काय मिळेल असं विचारल्‍यावर त्‍यानं सांगायला सुरुवात केली इडली, सांबार, मेदू वडा, दोसा और आलूबोंडा है साहब.
     आलूबोंडा क्‍या होता है असं विचारल्‍यावर आम्‍हाला कळलं की आलूवड्याला इथं आलू बोंडा म्‍हणतात. भाषा बदलते तसं नावं बदलतात हेच खरं.
     असं भाषिक अंतर पडलं की कधी कधी धक्‍का बसतो. असाच काहीसा प्रकार वर्धेत माझ्याबाबतीत घडला. एक पत्रकार मित्र भेटायला घरी आले त्‍यांच्‍या हातात पेढ्यांचा डबा होता. मला मुलगी झाली असं आनंदात सांगताच मी अभिनंदन केलं त्‍यापुढचं त्‍यांच वाक्‍य मला धक्‍का देणारं होतं. मुलगी झाली सांगायला यायचंच होतं, म्‍हटलं की सायबाले पेढे चारु या .... चारु या .... ?  माझ्या तोंडातला पेढा घशात अडकला आणि जोरदार ठसका लागला. चारायला आपण काय गाय किंवा बकरी आहोत का आणि पेढे म्‍हणजे चारा हे का ?  माझा चेहरा प्रश्‍नांकित होता. पण ते पत्रकार सहजरित्‍या बोलत होते. त्‍यांना आपण काही वावगं बोललो असं वाटलेलं नव्‍हतं.
     सुरुवातीला ही विदर्भाची भाषा मला थोडी ऑड वाटली तरी महिनाभरात मी सरावलो. आणि आता कुठे गेलो तर तुम्‍ही वर्धेचे का ? असं लोक विचारतात इतकी इथली भाषा पक्‍की रुजली.
     लहेजा वेगळा असला तरी या भाषेत एक आगळा गोडवा आहे. इथले काही शब्‍द सहज कळतील काही कळायला अवघड जातात. जोरु का भाई अर्थात साला... म्‍हटलं की शिवी दिल्‍यासारखं वाटतं इथं मात्र साळा म्‍हणतात. त्‍यात गोडवा नक्‍कीच आहे पण साडभाऊ अन् अक्‍कडसासू सारखी नाती समजून घेतल्‍याशिवाय कळत नाही.
     याकाळात सिरोंचा पासून अगदी पत्रादेवीपर्यंत सारा महाराष्‍ट्र फिरुन झाला त्‍यात वर्धेची ही भाषा  आताशा आपुलकीची आणि आपली भाषा वाटायला लागली. कोरडेपणा, औपचारिकता न ठेवता थेट होणारा संवाद काळजाला भिडणार आणि कायम त्‍याचा गोडवा राहणार हेच खरं कुणी विचारलं आता काय चालू ... तर चटकन उत्‍तर निघतं काहीचतनी... (काहीच नाही).
                                     - प्रशांत दैठणकर

No comments: