Thursday 10 March 2016

पर हम वफा कर ना सके...

स्वयंवरात अर्जुनाला द्रौपदी प्राप्त झाली त्यावेळी पांडवांचा वनवास सुरु होता. ते द्रौपदीला घेऊन आपल्या कुटीत पोहचले त्यावेळी त्यांची माता कुंतीने काय आणलय हे न बघताच जे आणलय ते पाच भावात वाटून घ्या. असं सांगितलं त्या क्षणी द्रौपदी पाच जणांची पत्नी अर्थात पांचाली झाली.

स्त्री-पुरूष संबंधांमधील हे आगळं प्रकरण आहे. महाभारतामधलं. मानव वंश इतिहासात भिन्न रुढी परंपरा पालन करणारे आपणास दिसतील. भारतात हिंदू संस्कृतीत रामायण आणि महाभारत या महाकाव्यांना धार्मिक आस्थेची बाब म्हणून बघितले जाते. रामायणात प्रभू रामचंद्र हे एकवचनी आणि एकपत्नी असणारे होते. राम हा विष्णुचा अवतार मानला जातो.

रामायणानंतरचा काळ अर्थात श्रीकृष्णाचा काळ इथं श्रीकृष्णाची प्रतिमा वेगळीच रंगविली जाते. त्याची पत्नी रूक्मिणी होती. रूक्मिणीलाही स्वयंवरातून आणले. मात्र श्रीकृष्णाचे चरित्र वेगळया पध्दतीने सांगितले जाते. १६ सहस्त्र नारींचा पती अशीही उपमा दिली जाते. आणि कृष्णाचे नाव सिता आणि राम असे न घेता राधा आणि कृष्ण असे घेतले जाते. राधा-कृष्ण हे आजही प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. त्या नात्यात सात्विकता आणि पावित्र्य आहे.

लहानपणी आजीकडून ऐकलेल्या गोष्टीत एक राजा असायचा आटपाट नगरचा आणि त्या राजाला हमखास दोन राण्या असायच्या. त्यापैकी एक नावडती आणि एक आवडती असायची. मला प्रश्न पडतो आवडती होती मग त्याने नावडतीशी लग्न का बरे केले असेल.

मानव वंशाच्या इतिहासात एकपत्नी राहणं
ही बाब हिंदू धर्मात मान्य करण्यात आली असल्याने सर्वाधिक टिकून राहणारे विवाह भारतात आढळतात. ख्रिश्चन धर्मामध्ये एकपत्नी मान्यता आहे पण तिथं त्यांनी एका वेळी एक पत्नी, असा प्रकार मान्य केला आहे.

विवाह म्हणजे
गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. या न्यायाने टिकेल तोवर संसार करून घटस्फोट घेण्याची वृत्ती अधिक आहे. त्यामुळे अनेक विवाहाची प्रथा तेथे आपणास दिसते. एलिझाबेथ टेलरचे ८ विवाह झाले ही सहज मान्य बाब म्हणून आपण वर्तमानपत्रात वाचतो. त्याचवेळी हिंदी चित्रपटसृष्टीची उमराव जान रेखाने चार विवाह केले ही इकडे मोठी बातमी असते.

ख्रिश्चन धर्मात एका पत्नीसोबत रहाणारे (अर्थात मोनोगॅमी) आहेत तसेच एका वेळी तीन किंवा चार विवाह करणारे बहुपत्नी पद्धतीचे ( अर्थात पॉलिगॅमी) आचरण करणारेही आहेत. मार्च याला चर्चची आणि समाजाची मान्यता नाही. अशी जी काही मोजकी माणसे आहेत त्यांना शहराबाहेर किंवा गावाबाहेरच रहावे लागते हे चित्र आज २१ व्या शतकातही आपणास दिसेल. इस्लाम मात्र असा एक धर्म आहे ज्या धर्मात चार विवाहांची पुरूषाला मुभा देण्यात आली आहे आणि त्याचा मोठया प्रमाणावर आज २१ व्या शतकातही प्रचार व प्रसार होताना दिसत आहे.

आपल्या देशात समान नागरी कायदा असण्याची मागणी असली तरी तो कायदा प्रत्यक्षात आलेला नाही. याला कारणही मुस्लीम पर्सनल लॉ हेच आहे. मात्र त्या दिशेने पावलं टाकली जात आहेत. न्यायपालिका विविध माध्यमातून या प्रकारचे आदेश देत आहे. तोंडी तलाक तलाक तलाक असे तीन वेळा उच्चारण करून पत्नीला घटस्फोट देण्याच्या मुस्लीम पर्सनल लॉ मधील तरतुदीला नाकारून कायदेशीर घटस्फोट व्हावा असा आग्रह धरला जात आहे.

हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. कमाल पाशा यांनी नुकतच थिरूवअनंतपुरम येथील एका परिसंवादात केलेले वक्तव्य. गेल्या काही वर्षात इस्लाम मानणा-या अनेक देशांनी एकपत्नी कायदा
आणला मात्र भारतात आजही चार पत्नी ठेवण्याची मुभा देणारा मुस्लीम पर्सनल लॉ अस्तित्वात आहे. यामुळे पुरुषी वर्चस्व निर्माण होत आहे आणि महिलांना हक्कांपासून वंचित रहावे लागत आहे. अशा स्थितीत महिलांनी चार पती का ठेवू नयेत असा सवाल न्यायमूर्ती पाशा यांनी केला.

विषय वेगळया वळणावर नेणारे हे वक्तव्य आहे मात्र मानववंशाच्या उत्क्रांतीपासून आजवरच्या वाटचालीकडे बघावे असे हे वक्तव्य आहे. पूर्वी टोळयांचे अस्तित्व होते त्यावेळी पशू आणि मानव यात लैंगिकतेबाबतीत कोणताही फरक नव्हता. सिंहाने कळप बनवावा व आपलं क्षेत्र निश्चित करावं मग त्या क्षेत्रातील प्रत्येक मादी त्याची असा निसर्ग नियम मानवही टोळीचा प्रमुख आणि इतर स्त्रिया या पध्दतीने वापरत होते.

उत्क्रांतीत माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला याचं सार समाजरचनेत आहे. आजही आदिवासींच्या अनेक प्रजातींमध्ये मुलींना वयात आल्यानंतर अनेक मुलांसोबत शरीरसंबंध ठेवण्याची मुभा आहे त्यानंतर त्या अंतिमत: कुणाशी विवाह करायचा याचा निर्णय घेतात. इथं गडचिरोलीतही मुलांच्या जन्मानंतर विवाह करणारे अनेक आहेत. ही मातृसत्ताक पध्दतीची रचना.

आता जी रचना आहे ती पुरूष प्रधान आणि पुरूषी वृत्तीचा पुरस्कार करणारी आहे पण धार्मिक स्तरावर जिथं देवाची पूजा करताना त्याच्या दोन पत्नींचीही प्रतिमा आपल्याकडे पूजली जाते. अशा स्थितीत घराबाहेर विवाहापलीकडे संबंध पुरूष ठेवतात (हा गुन्हा आहे हे माहिती असून देखील) हे वास्तव देखील आहे मग अशा स्थितीत त्याची ही 'हम बेवफा ना थे...पर हम वफा कर ना सके' स्वीकारणा-या तिलाही थोडीसी बेवफाई करण्याचा अधिकार का नको.. विचार करा.. सोचो.. सोचो

-प्रशांत अनंतराव दैठणकर

९८२३१९९४६६

No comments: