Thursday 31 March 2016

गेल्यावरच कळते......ती आई होती.

आई गेली माझी ...

तीन शब्दाचा तो मेसेज मला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसला आणि तो पूर्णपणे मेंदूत पोहोचायच्या आधी डोळयात टचकन पाणी आलं.


ती कोण, कशी ती कधीही पाहीली नाही.चेहरा नजरेसमोर येण्याचा प्रश्नच नव्हता कारण कधी तो चेहरा कधी बघितलेला नव्हता, पण 'आई' ओळखीची होती कारण ती आई होती ना....।

कवी ग्रेसचे शब्द.....
.-हदयनाथाच्या स्वरातलं कारूण्य कानात झिरपायला लागलं आणि तिची ओळख पुन्हा स्मृती पटलावर आली.

ती आई होती म्हणूनी घनव्याकुळ मी ही रडलो..। 

घन व्याकुळता मनातून कघी डोळयात पाझरली ते माझं मलाच कळलं नाही.
ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता...।

 खरं आहे पाऊस नजरेतून अखंडपणे वाहणारा, इतका की डोळयासमोरचं दिसेना...पण सावरावं, स्वत:ला आवरावं तिचं ते जाणं अकाली होतं पण निसर्ग नियम सांगतो आलेल्या प्रत्येकाला जायचं हे नक्की आहे कुणीही इथं चिरंजीवी नाही... अगदी आपण देखील मग तिच्या जाण्याची ती वेदना... खरच संवेदना इतक्या ऊफाळतात की शब्द खुजे पडतात तिच्या आठवणीत.

प्रेम प्रत्येकाच्या नशिबात असतं का? याला नकारार्थी उत्तर देणारे अनेकजण भेटतील पण त्यांना सांगावं वाटतं की
तुझी या जगात येण्याची चाहूल लागली त्या क्षणापासून तुझ्यावर कुणी प्रेम केलं असेल व ती आईच रे....।

आई तिची,तुझी, माझी...काही वेगळी नसतं...... ते एक आगळं अंतरंग असतं........ नऊ महिने आपल्या रक्तामांसावर वागवणारं आणि आयुष्यभर आपल्या प्रत्येक कृतीला आणि वृत्तीला जपणारं, प्रसंगी तीळ तीळ तुटणारं.

तिच्यातून तू बाहेर आल्यावर जग बघितलं पण जग कसं आहे हे तुला कळेपर्यंत मायेची ऊब देणारं आईपण खूपच वेगळं असतं. तिच्या त्या सांभाळ करण्याच्या कृतीला तोडच नसते.

साध्या टिव्हीच्या आवाजाने झोपमोड होणारी तिची वृत्ती आपल्या पोटच्या गोळयासाठी मनापासून दूर सारते. त्या खोडया तुझ्या-माझ्या त्याचं कोण कौतूक रे तिला...... खूप खोडया केल्या म्हणून वरकरणी रागावणारी ती आतून मात्र आनंदून गेलेली असते.

तिने भले चार ठिगळाच्या लुगडयात आयुष्य काढले असेल मात्र आपल्या लेकरांना अंगभर कपडा महत्वाचा आहे तो आधी आणला पाहिजे..दोन घास कमी जेऊ आपण पण लेकरू उपाशी झोपलं नाही पाहिजे असा विचार जपणारी ती आई असते.

तुझी असो अथवा माझी आई
ती असते सा-यांची अंगाई.....

खरच ते एक अजब रसायन आहे..... आई समजायला आई व्हावं लागतं असं म्हणतात ते खरच आहे ना..... आई माझी असं म्हणत,  लेकरं समोर हट्ट करायला लागली तरी त्या लेकुरवाळीलादेखील आई हे माहेर असतं..आई हाच आधार असतो....आई..... व्यक्त करायला शब्द नाहीत. ज्यानं त्यानं आपल्या मनानं आई शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण आई शब्दांच्या पलिकडला भावनिक प्रवास असतो.

आई शब्द लिहिता येईल पण
आई शब्दात सांगता येत नाही

चित्र तिचं रेखाटता येईल
पण ती चित्रापेक्षाही मोठी आहे.

असेपर्यंत जाणवलेली ती आई
ख-या अर्थानं कळते तिच्या जाण्यानं...

म्हणूनच
मोबाईलचा तो स्क्रीन ओला होई पर्यंत कळलंच नाही की आपण काय मेसेज वाचतोय....ती गेल्यावरच ती कळली.कारण ..... ती आई होती.

-प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

No comments: