Wednesday 9 March 2016

देवदास.....

कभी कभी मेरे दिल मे... खयाल आता है..
के जैसे तुझको बनाया गया है मेरे लिये...

महानायक अमिताभ बच्चनच्या घनगंभीर आवाजातलं भावनात्मक निवेदन अनेकांच्या काळजाला भिडतं मग तिथून स्वप्न आणि सत्य यातील प्रवास सुरू होतो

कधी कॉलेजमध्ये कटटयावर गप्पा मारताना अचानक दिसलेली 'ती' तिचे ते वेध घेणारे डोळे आणि अल्लडपणे त्यावर येणा-या केसांच्या बटा .. गालावरचा तो गुलाबीपणा आणि किंचित थरथरलेले ओठ... चालीच्या हिंदोळ्यावर नृत्य करणा-या यौवनखुणा .... काळीज खल्लास. कोणत्या वर्गात आहे. नाव काय आहे,.. कुठे रहाते असा तपास.... तिच्या नकळत जडलेलं ते प्रेम... जपलं मनात. आणि दुस-याच वर्षी तिच्याशी संवाद साधण्यापूर्वी तिच्या लग्नाच्या बातमीसह तिची ती आयुष्यातून झालेली एक्झिट...

विवाह वेदीवर सप्तपदी चालताना नव्या नवरीचा लाजरेपणा आणि तिचं ते बावरणं ..नव्या विश्वात सारं जुनं वाहून गेलं विसरून गेलं. लग्नानंतरचा मधुचंद्राचा गोडवा आणि नंतर अवतरलेलें बोबडया बोलांनी घर भरून टाकणारं बालपण यातून मग करिअरची धावपळ आणि धावत धावत क्षणाची उसंत म्हणून थांबल्यावर आरशातलं आपलं रुप बघताना दिसलेलं पांढरे केस.. ( काही जणांचे तर रागावून सभात्याग करून गेलेले..) ... मग पुन्हा कॉलेजचे दिवस आठवायला आणि खुणवायला लागतात.

त्याच कट्टयावर मन पुन्हा जाऊन बसतं आणि 'ती' पुन्हा नजरेसमोर तरळून जाते. ती दिसताच अगदी चित्रपटासारखं आजूबाजूला संगीत ऐकू यायला लागतं..
.जरा, हो जरा हिंमत केली असती तर ती आज आपल्यासोबत असती. अशी भावना मनात डोकावून जावे आणि मग मन एकाच वेळी दोन दिशांच्या प्रवासाला निघतं...

जर-तर... च्या या जगण्याला आणि विचारांना कधीच अंत नसतो. हे सारं घरात दिसलेल्या सापासारखं असतं. साप दिसला की त्याला मारून टाकणारे आपणाकडे आहेत. मात्र याबाबत जनजागृती मोठया प्रमाणात झाल्याने साप पकडून जंगलात सोडायला आता सुरूवात झाली, पण साप दिसला आणि पकडला गेला नाही तर तो साप मनात भिती होवून फिरत राहतो. साप एका जागी थांबत नाहीत हे सत्य असलं तरी मनातला साप आणि सापाची भिती मात्र कधीच जात नाही त्याप्रमाणेच संशय आणि मिस झालेल्या प्रेमाचंही होतं....

घरात सारं काही सुरळीत असताना अचानक गाफिल क्षण आलेली तिची आठवण वयाच्या चाळीशीत पुन्हा आपल्याला देवदास बनवते.... शहराच्या एखाद्या बार मध्ये बसून दोन पेग रिचवून संगीताच्या सुरावटीवर तिचं ते रुप आठवायला हा देवदास बाहेर पडतो...हे एका रात्री घडतं आणि मग रात्रीचीही संख्या वाढते आणि भरलेल्या प्याल्यांचीही..

पारुच ती,....
देवदास अखेरीस तिच्या दारात प्राण त्यागण्यासाठी गेला पण तिला गुतंलेल्या आपल्या त्या नव्या आयुष्यातून बाहेर येता आलं नाही... सारं कळतं पण वळत नाही..सलमा आगाच्या 'दिलके अरमा आंसुओंमे बह गये' ने मैफल सूरु होते...मन पुन्हा धावतं त्या कटटयावर पुन्हा मित्र येतात बसतात. ... गप्पाष्टकं सुरू होतात...मग तिची एन्ट्री..आसमंतात संगीत....मन उल्हासित होतं, नजरेत आगळी चमक दिसायला लागते.... हळूच तिच्या दिशेने बाहू पसरून तिच्याकडे जाताना दिसतं की 'ती' हो ती देखील आपल्या बाहुपाशात येण्यासाठी आसूसली आहे...

आणि मोबाईलची रिंग वाजते..घरचा फोन.. कधी येणार,किती उशीर होणार अशी काळजी करणारा....स्वप्नातून सत्यात एक क्षणात पोहचल्यावर वास्तवाचं भान येतं.

आवरून निघताना यो यो हनी चा कंठशोष कानावर पडतो..

चार बोतल व्होडका.....काम मेरा रोजका
चार बोतल व्होडका.....काम मेरा रोजका

-प्रशांत अनंतराव दैठणकर.

9823199466

No comments: