Monday, 14 March 2016

ये पल भी जाएगा

जागुनी ज्याची वाट पाहिली ते सूख आले.... गाण्याची धून अचानक कानात रुंजी घालू लागली. कामाच्या व्यस्ततेत गडचिरोली जवळील पुलखल या गावात एका शेतात असताना फोन आला मोबाईलवर कन्या जान्हवी आनंदाने सांगत होती. बाबा परिक्षा संपली....हो बारावीची परिक्षा संपली..

वयाच्या तिच्या या टप्प्यावर बारावी हा आयुष्याच्या प्रवासातील एक मैलाचा दगड म्हणता येईल. तिने बारावी एन्जॉय केलं. हो ख-या अर्थाने एन्जॉय केलं.. आजू-बाजूला मुलं-मुली बारावीच्या ताणाखाली दबून गेलेले दिसत होते. मुलगी किंवा मुलगा बारावीच्या वर्गात गेल्यावर अख्खं घर बारावीत प्रवेश करतं असा माझा अनुभव आहे. थोड्याफार फरकाने आपणासही हा अनुभव आलाच असेल की..

या मुलांना अभियांत्रिकी आणि मेडिकलचं गाजर लावून गाढवाला  गाडीला जुंपाव तसं जुंपलं जातं. आपल्या स्वप्नांची पूर्तता मुलांनी करावी ही
अपेक्षा समजणं शक्य आहें. मात्र मूल हे आपल्या आकांशापूर्तीचं साधन (Extenuation) मानणं कितपत योग्य आहे.. मात्र इथं सारं चित्र वेगळं असल्याचं आपणास दिसतं.

महाविद्यालयीन जीवनाचा निखळ आनंद घेता यायला हवा कारण हे दिवस पुन्हा येत नाहीत. आयुष्यात मग अशावेळी करिअरची टांगती तलवार डोक्यावर घेऊन ही मुलं क्लासेस आणि कॉलेजच्या धावपळीत गुंतून पडतात आणि तणावात राहतात. इथं भौतिकशास्त्राचा साधा नियम आपण विसरतो की, इतराला ताण देण्याची एक विशिष्ट मर्यादा असते त्यापेक्षा अधिक ताणलं तर ते तुटतं आणि असा ताण असह्य झालेल्यांनी भौतिकशास्त्राचा पेपर अवघड गेला म्हणून आत्महत्या केल्याची बातमी वाचायला मिळते.

पनवेलमधील मैत्रीण माधूरी हेगडे हिच्याशी बोलताना तिने जो किस्सा सांगितला तो तर खूपच धक्कादायक होता. पेपर अवघड गेला असं घरी कळल्यावर पालकांनी त्या मुलाला तासला. सकाळी ते पोर घरातून निघून गेलं. पोलिस तपासात त्याच्या एटीएम वरील व्यवहार तपासला त्यावेळी तो सूरत मध्ये असल्याचं कळलं.

सूरत सारख्या मोठया शहरात शोधायचं कसं आणि कुठे कुठे याची चिंता. पुन्हा एक संधी म्हणून त्यांनी त्याच्य खात्यात पैसे जमा केले. तर पुढील व्यवहार सिमला येथे झाला मग अजूनच चिंता अखेर त्या मुलानेच फोन करून सांगितलं की सुखरूप आहे आणि सिमला येथे मला घ्यायला या.

एकूणच काय तर बारावी किंवा दहाचीचा हा काळ मुला-मुलींसाठी अभ्यासासाठी आव्हानात्मक असते असे नाही. तर या काळात शारिरीक बदल मोठया प्रमाणावर होत असतात. इतके सारे बदल एका वेळी ॲडजस्ट करणं खूप अवघड असतं.

मुलांवर जरूर संस्कार करा पण सक्ती करू नका. त्या व्यक्तीमत्वाचा तो घडण्याचा आणि खुलण्याचा तो महत्वाचा काळ असतो. आईच्या उदरातून जन्म झाल्यावर, वयात येणं हा दुसरा जन्मच असतो.

जान्हवी या वर्षाच्या कालावधीत कॉलेज स्तरावर ज्युदो खेळली अगदी राज्य स्तरापर्यंत तिनं वाटचाल केली. सोबत जर्मन भाषेची तिसरी याच वर्षात केली आणि आता चौथी लेव्हल ती महिनाभरात पार करेल. त्यातही परिक्षा संपल्याचा उत्साह आनंद ऐकल्यावर मला दहावीचे माझे परिक्षांचे दिवस आठवले. संपेपर्यंत त्याची उत्सुकता शेवटचा पेपर झाल्यावर थेट जितेंद्र- श्रीदेवीचा हिंमतवाला बघायला आम्ही सादिया टॉकिजला गेल्याचे आजही आठवते.

सध्या एक सुंदर जाहिरात टिव्ही व इतर माध्यमात फिरतेय ती जाहिरात बघितल्यावर जान्हवी मला म्हणाली बाबा तुम्ही तर आम्हाला अगदी लहानपणापासून हेच शिकवत आलात..बारावीला ५८ टक्के असले तरी मी शासनात वर्ग एक पद मिळवलेच ना...
अगदी आज ते त्या जाहिरातीत पडद्यावर ती म्हणते ना की मुझे बारवी में 59 परसेंट थे और आज मै इस कॉलेजकी प्रिंसिपल हूं.. तसं

काही घटना, किस्से आपल्याला प्रतिबिंबित करतात तसा हा किस्सा... सुख आणि दु:ख ही मनाची तर वेदना ही शरीराची भावना असते..कितीही कठिण क्षण असला तरी 'ये पल भी जाएगा' हेच खरं... हर पल यहां जी भर जियो....

-प्रशांत अनंतराव दैठणकर९८२३१९९४६६

No comments: