Wednesday, 16 March 2016

फेअरचं अफेअर....

यशोमती मैंयासे बोले नंदलाला

राधा क्यों गोरी...मै क्यों काला....

गाण्यात ऐकायला चांगलं वाटतं ना. पण हाच सवाल विचारुन कोटयवधींचा व्यवसाय उभा राहिला आणि अनेक कंपन्यांनी गोरेपणाचा वादा करून 'फेअर' जाहिराती करून लाखो भारतीयांचे खिसे रिकामे होत आहेत.

लग्न झाल्यावर बायको नव-याचा खिसा रिकामा करते असं म्हणतात काळी बायको असेल तर ती गोरं होण्यासाठी क्रीम खरेदी करून खिसा रिकामा करते तर गोरी बायको रंग काळा पडू नये म्हणून सनक्रीमवर खर्च करण्यासाठी नव-याचा खिसा रिकामा करते.

आपल्या शरिराला कोणता रंग असावा हे आपल्या हाती नसतं तो जन्मासोबत आपल्याला प्राप्त होतो या रंगावरून वर्णन करणं आणि त्याची वर्गवारी करणं यातून चांगलेच विनोद घडतात.

खूप गोरी असेल तर

सपीठाचा (मैदा) उंडा (गोळा) असं मराठवाडी मराठीत म्हटलं जातं.

दूसरं वाक्य अर्थात.... पांढरीपाल आहे ती ...असं असतं. इथं वर्गवारीकडे वळता येईल.

गोरा - निमगोरा - गहूवर्ण - सावळा - काळसर अशा शेवटचा एक रंग काळेपणापर्यंत पोहोचतात पण ते इथं थांबत नाहीत तर शेवटचा एक रंग असतो.'कलर गया तो पैसा वापिस'...

काळा रंगाच्या व्यक्तीचं आडनाव गोरे असणं आणि मुलीचं नाव जुई किंवा चमेली, चांदनी आणि अगदी शुभ्रा देखील असू शकतं.

रंगांच्या गमती-जमती मोबाईलच्या युगात असाच नवा विनोद हा मोबाईल माझ्यापर्यंत घेऊन आला. आमचा एक मित्र काळा
म्हणजे शेवटच्या पटटीत 'कलर गया तो....' कॅटेगरीतला त्याचा फोन लावला आणि मला धक्का बसला कारण टयून कानावर आली ती होती.

.....माझा रंग तुला घे तुझा रंग मला दे....
शॉक.....शॉक...शॉक...


मराठीवर त्याचं असणारं प्रेम कबूल मराठी गाण्याची आवड कबूल पण हे काही तरी खतरनाकच म्हणावं लागेल ...आपण कोणती टयून ठेवावी याचं गांभीर्य का असत नाही लोकांना. हा काळेपणा जसा गंमतीचा तस तो मार्केटींगचाही विषय आहे. हमखास गोरे व्हा असे म्हणून जाहिरात करणा-या कंपन्यांचे उखळ 'पांढरे' झाले मात्र कुणालाही गोरेपणा आला नाही. आधीच गो-या असणा-या मॉडेलचा रंग काळा करून तिचा रंग १५ दिवसात बदलल्याचा दावा करणा-या कंपन्या लाखो व्यक्तींना करोडोचा 'चुना' नियमित लावत आहेत हे वास्तव आहे.

मधूर भांडारकरने आपल्या 'ट्रॅफिक सिग्नल' या चित्रपटात ही बात नेमकेपणाने मांडली आहे. त्सुनामीत कुटुंबापासून दुरावलेला १२-१३ वर्षाचा मुलगा या ट्रॉफिक सिग्नल जवळ असतो. रोजच्या कमाईतून त्याचा एकच उद्योग चेन्नईला सरकारी कार्यालयात फोन लावून आई-वडिलांचा पत्ता लागला का हे विचारणे आणि आपला काळा रंग जावा आणि आपण गोरे व्हावे यासाठी क्रीम खरेदी करणे.... अखेर एका प्रसंगात तो त्या क्रिमच्या जाहिरातीच्या पोस्टरवर आपला राग काढतो.

Opposite attracts हा निसर्ग नियम आहे.
हा या रंगांच्या बाबतीत लागू पडतो. काळयांना जसं गोरं व्हायला आवडतं तसं गो-यांना तो गोरेपणा उन्हात 'टॅन' ( मराठीत ज्याला करपणे असा शब्द आहे ) करावा असं वाटतं गोवा हे सर्व विदेशी पर्यटकांचं आवडतं टॅनिंग सेंटर' हे इथं सांगावंच लागेल. इंग्रजांनी आपल्यावरा साधारण 'ये गोरे लोग' असेच म्हणत होतो.

गोरे आणि काळे याबाबत आपल्याकडे अनेक पध्दतीने सांगितले जाते. युरोपातून भारतात आलेले आर्यन्स (आर्य) हे गोरे होते आणि भारतातले मुळ निवासी दक्षिण भारतात असणारे द्रविड होते. त्यांचा रंग काळा होता. असा दाखला काहीजण देताना आपल्याला दिसतील.

पृथ्वीवर विषववृत्तापासून किती अंतरावर आपण राहता त्यावर तेथील तापमान ठरते आणि हे तापमान मुलत: आपल्या रंगासाठी अवलंबून असते. असा एक तर्क दिला जातो. पण त्यातही फारसा अर्थ नाही कारण मानव हे आफ्रिकेतून उत्क्रांत झाले असे मानले जाते. असे असेल तर सर्वांचा रंग ठरविणारे 'जींन्स' सारखेच असते आणि सर्वांचा रंग सारखाच असता.

काळेपणा काही जणांच्या बाबतीत अतिशय गंभीर समस्या बनते त्यामुळे समाजात आपल्याला टिकेला सामोरे जावे लागेल या भितीमुळे अनेकांमध्ये न्यूनगंड तयार होतो.

वर्ण आणि वर्णभेद याचा लढा अगदी २१ व्या शतकातही थोडयाफार प्रमाणात शिल्लक आहेच. न्युयॉर्क सारख्या शहरात देखील श्वेतवर्णी आणि कुष्णवर्णी असे ध्रुवीकरण निवासाच्या बाबतीत आपणास दिसून येईल.

ते काळं पण त्याला गोरी पोरगी पाहिजे अशी कमेंट आपण आजूबाजूला ऐकतो. खरच आहे प्रत्येकाला गोरीच का हवी असा सवाल विचारायला पाहिजे.

गोरी गोरी पान, फुलासारखी छान..

दादा मला एक वहिनी आण.. (आता एकच का )

आपणच या पध्दतीच्या गाण्यातून आपणच असे संस्कार केले म्हणून तर असं होत नाही.

धून मै निकला ना करो रूप की रानी
गोरा रंग काला ना पड जाये

हे बिग बी च्या सिनेमातलं गाणं असो की,

गोरे गोरे मुखडेपे काला काला चष्मा

हे गाणं. आपण आपल्या माध्यमांमधून गो-या रंगाचा प्रचार करतो. हे चुकीचे आहे असुही आपणास कबूल करावे लागेल.

काळयांनाही सारख्याच भावना आहेत ना. मी कॉलेजमध्ये असताना कॉलेज घराजवळ असल्याने आम्ही मित्र पायीच जात असू त्या रस्त्यावर एक डिपार्टमेंटल स्टोअर होते. साधारण आमच्याच वयाची मुलगी होती. खूप जास्त काळा रंग असल्याने ती हसली तरच रस्त्यावरून तिचे दात आणि फक्त दात दिसत अशी ती मुलगी त्या दुकानासमोरुन जाताना मी तिला दरवेळी झकास आणि दिलखुलास स्माईल द्यायचो. त्यावेळी सोबतचे मित्र 'पश्या काहीही चॉईस बरं तुझी' अशी कमेंट करायचे त्यावेळी माझं उत्तर असायचं की, तिलाही भावना आहेत कुणीतरी आपल्याकडे प्रेमानं बघतयं याचं समाधान काही क्षण का होईना तिला मिळत असेल ना...

माझा विचार वेगळा पण त्या गोरेपणाचं मनामनामधील हे वेड मन सुरू ठेवतं...बाय द वे नितळ कांतीचं गोरं पान प्रेम मला मिळालं माझ्यावर मनापासून असणारं तिचं ते प्रेम तिच्या समोर मी सावळा नाही तर काळाच म्हणावं लागेल. असलं नशिब असं पण प्रेमात पडलो अन् थेट प्रेमाचा रंग पाहिला. ती भाषा नजरेची होती त्यावेळी तिचा रंग दिसलाच नाही आणि नंतर इतरांनी सांगितल्यावर कळालं अरे हो तिचा रंग गोरा आहे.

मी सावळा आहे ही वास्तविकता आहे मात्र आजवर माझा रंग गोरा व्हावा यासाठी कधी एखादी क्रिम आणावी असं मला कधीच वाटलं नाही कारण मला इतकं कळतं की माझ्या सारखं या जगात दुसरं कुणी नाही.. काळा रंग आणि त्याचं हे पुराण काळासोबत असच सुरू राहणार हो आपण काय विचार करता यावर आपलं नियंत्रण असतं इतरांचं नाही...
पुन्हा गाणं आठवतं ते काका अर्थात राजेश खन्ना आणि मुमताज यांचं...

गोरे रंगपे ना इतना गुमान कर
गोरा रंग दो दिन में ढल जायेगा...

प्रशांत अनंतराव दैठणकर
९८२३१९९४६६
No comments: