Thursday 17 May 2018

' भंगार ' ......

मुळात शब्द स्वत: परिचय देतात एखाद्या वृत्तीचा आणि स्वभावाचा या जगात सजीव आणि निर्जीव असा भेद आपण करतो मात्र यापैकी कोणालाही शब्दात व्यक्त करायचे असेल तर शब्द त्यावर असणारा प्रभाव टाकल्याशिवाय राहत नाही. आणि मानवी मेंदूची ताकद इतकी मोठी आहे की, मिटल्या डोळयांनी जरी शब्द ऐकले तरी बंद डोळयाआड एक विशिष्ट प्रतिमा उभी राहते. असाच एक शब्द म्हणजे ' भंगार ' .

आता ' भंगार ' हा शब्द ऐकताना कोणाच्या डोळयासमोर कोणती प्रतिमा आली हे स्पष्ट करणं अवघड असलं तरी एक व्याख्या नक्कीच मांडता येते. 'उपयोग संपलेल्या आणि काळाच्या ओघात मागे पडलेल्या अडगळीचा ढीग ' म्हणजे भंगार असं म्हणता येईल का.

आपण बोलताना नेहमीच म्हणतो .. काय भंगार काम आहे त्याचे.. किंवा भंगार जमा करायची सवयच आहे त्याला..वेगवेगळ्या अर्थाने याचा वापर आपण करीत असतोच ना.

भाषा दर दहा कोसांवर बदलते असं म्हणतात त्यामुळे आपल्या कोकण ते विदर्भ अशा विस्तीर्ण महाराष्ट्रातील तमाम मराठी जन आणि जगाच्या पाठीवर विविध देशांमध्ये वसलेल्या मराठी व्यक्ती त्यांना याचा अर्थ वेगवेगळया पध्दतीने लागेल.

हल्ली आपल्याकडे इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढला आहे त्यामुळे आपण चटकन पर्यायी मराठीतून इंग्रजी शब्द शोधतो. SCRAP या शब्दाच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रतिमा वेगळया आहेत.

आता हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे एक फोटो.
मला सवय आहे काही फोटो मी माझ्या FB वॉलवर शेअर करतो जे फक्त मी पाहू शकतो असा दोन वर्षांपुर्वीचा फोटो आज समोर आला. घराच्या खिडकीतून खाली रस्त्यावर भंगार सामान खरेदीसाठी उभ्या असलेल्या एक हातगाडीवाला आणि त्याच्या गाडीवरील भंगार सामान याचा तो फोटो आणि तो काढण्याचं कारण म्हणजे कधी काळी घराघरात श्रीमंतीचं प्रतिक असलेल्या टोल देणाऱ्या घडयाळाला कुणीतरी भंगारात विकलं होतं.

....घडयाळ.... की काळ नेमकं काय भंगारात विकलय ?

त्या गाडीवरच्या भंगारात इतरही अनेक गोष्टी होत्या मात्र माझी नजर त्या घडयाळावर खिळली. 70 च्या दशकाचं प्रतिनिधीत्व करणारं ते घडयाळ.

काळ बदलला की फॅशन बदलते आणि आम्ही आजकाल Whats Treanding ! म्हणत नव्या मागे धावतोय. कधी कधी धावण्याची गती इतकी होते की, कालची वस्तू आपल्याला आज अडगळ अर्थात भंगार वाटायला लागते.

' लोहा लोखंड के भारोभार फल्ली ' !

अशी हाळी देत गल्लोगल्ली फिरणारे भंगारवाले लहानपणी पाहिले होते. यातून जीवनाचे दोन आयाम समोर यायला लागतात. एक आयाम झटपट बदल स्वीकृत करणाऱ्यांचा. याला बदलांचा स्विकार केला असं म्हणायचं जरा जास्त होईल. माझ्या मते नव्याची क्रेझ असणारे असं म्हणायला पाहिजे. आपल्याकडे जगात सर्वोत्तम जे आहे ते उपलब्ध आहे आणि ते मी वापरतो अशी वृत्ती याला अधिक कारणीभूत आहे.

दुसरा आयाम आहे तो या भंगारातून आयुष्य शोधणाऱ्या आणि उपजिविका भंगारवर आधारित आहे अशा लोकांचा. इतरांनी भंगार म्हणून टाकून द्यायचं आणि या लोकांनी त्याचं सोन म्हणून जगण्याची संधी म्हणून वापर करायचा ही त्यांची जीवनशैली आहे.

फोटो काढताना मला घडयाळ दिसलं पण फोटो नीट न्याहाळताना त्यात एक कॅलेंडर देखील आहे असं लक्षात आलं. कालगणना करुन काल आज आणि उद्या या परिभाषेत तारखा अथवा तिथी दाखवण्याचं काम करणारे कॅलेंडर.

काळ ही एकमेव बाब आहे की, ती सतत चालत असते आणि त्या काळासोबत आपल्या आयुष्यात स्थित्यंतरे येतात. यांचा संग्रह आठवणींच्या रुपात जमा होत राहतो. आपण थांबवायचं ठरवलं तरीही काळ थांबणार नाही मग आपणच थांबून विचार करावा की आपल्याला नेमकं काय हवं आहे.

आज खरेदी केलेली वस्तू खरेदी करताना नवी असते उद्या ती जुनी होणारच आहे. आणि मग अशाच पध्दतीने आपण सहली करताना हौसेने त्या-त्या ठिकाणच्या वस्तू खरेदी करुन घरी आणायला लागतो..... कालांतराने घर छोटं पडायला लागतं मग नव्यासाठी जुन्याला अडगळीत व काही दिवसांनी भंगारात विकण्याची वेळ आहे.

वृत्तपत्राची रद्दी होणार, जुने कपडे आऊट ऑफ फॅशन होणार आणि हळूहळू नवं ते जूनं होत राहणार.
एका बाजूला टाकावूतून टिकावू करणारे दिसत आहे. जूनं ते सोनं ही मानसिकता जपणारे आहेत परंतू नव्याचा ध्यास आणि प्रसंगी हव्यास, अट्टाहास या मानवी स्वभावामुळे हे "भंगार" तयार होत राहणारं..... अन् भंगार विकून कुणीतरी श्रीमंत होणार आपण मात्र चाकरमानी राहून आम्ही बदलत्या काळासोबत स्वत:ला बदलतोय याचा फुकटचा अभिमान जपत राहणार.....
- प्रशांत दैठणकर 
9823199466



4 comments:

dbt said...

मार्मिक

gamjada said...

sir jee aap koi jabab nahi.

Prashant Anant Daithankar said...

धन्यवाद

scienc computer maths said...

Sir chan