Thursday 24 May 2018

कुच्चर ओटा

चण्यापासून फुटाणे बनवताना चणे भाजण्यात येतात. या प्रक्रियेत एखादा चणा तसाच राहतो (Hard Nut) आणि फुटाणे खाताना हा दातावर आदळतो. अशा फुटाण्याच्या दाण्याला मराठवाडी भाषेत कुच्चर म्हणतात. माणसांमध्येही अशी काही माणसे असतात जी इतरांची उणी -दुणी काढणे त्यांना आवडते अशी माणसे म्हणजे कुच्चर.

गावात एखाद्या मंदिराच्या पारावर बसून रिकाम्या वेळेत गप्पा मारल्या जातात. मात्र अशा ओटयावर गावगप्पा ऐवजी केवळ कुच्चर माणसं जमली तर.. तो
कुच्चर ओटा असा एक भाग जालना शहरात आहे.

आता गाव मागे राहिला नवा जमाना नव्या पध्दती आणि गप्पांची नवी ठिकाणी. तसं भारतात रिकामटेकडयांची कमतरता नाही, त्यामुळे नव्या पिढीचं तंत्र अर्थात फेसबूक आणि व्हॉटसअप सर्वांनी स्विकारलय. या वर येणारे काही नव्हे तर बहुतांश संदेश हे ' खिल्ली ' उडविणारे अर्थात TROLL करणारे असतातं. हे ट्रॉल करणे यामुळे एका अर्थाने फेसबूक आणि व्हॉटअप चा कुच्चर ओटाच करुन ठेवल आहे. सर्वात प्रसिध्द व्यक्तीची सर्वांधिक खिल्ली उडविणे या न्यायाने हा प्रकार अहोरात्र सुरुच आहे. खिल्ली उडविणे हे पक्षनिहाय चालू असल्याचे चित्र सध्या फेसबूकवर दिसते.


#MarkZukerberg ने ज्या उद्देशाने फेसबूक सुरु होते त्यात स्पर्धेचा भाग अधिक होता आणि आता स्पर्धा वेगळया स्वरुपाची अर्थात Troll ची सुरु आहे. त्यातही काही क्षण बुध्दीमत्तेचा चांगला वापर करतात.

Troll & Petrol असा एक संदेश कुणीतरी टाकलेला बघितला.

नुकतीच झालेली कर्नाटकातील निवडणूक आणि त्यानंतरचं सत्तानाटय यावर अनेक पध्दतीचे संदेश व्हॉटसअप वर अजूनही फिरतात.

एखाद्याने पंतप्रधान मोदींबाबत चांगलं लिहिल तर त्याच्या विरोधात भक्त आहे म्हणून त्याला ट्रोल केल जातं हे सारं खूपच गंमतशीर आहे. यावरुन मला एक जुनी जाहिरात आठवली.

क्या करें कंट्रोल ही नही होंदा..!

मारुती कारची ती जाहिरात होती त्यातील छोटया सरदार प्रमाणे हे ट्रोल करणारे नवं काही लक्षात आलं की त्यावर तुटून पडतात.
या नव्या समाजमाध्यमांचा वापर चांगल्या आणि सकारात्मक पध्दतीने करणे शक्य आहे. अनेक जण तो करतात. एका लहान मुलाला हृदय शस्त्रक्रिये दरम्यान B - ve ( बि निगेटिव्ह) रक्त हवे होते. अनेकांनी या बाबतचं आवाहन फेसबूकवर बघून स्वत:ची उपलब्धता त्वरित कळवली. रक्तगट B-ve असला तरी विचारांनी B+ve आहोत हे त्यांनी दाखवलं ही औरंगाबादेतील घटना आहे.

अनेकदा चांगले विचार मांडले जातात आणि चांगल्या विचारांचं पिक या माध्यमात येत आहे असं वाटत असताना कुठूनतरी 'ट्रोल धाड' येते. आहे तो चांगुलपणा नष्ट करते.

इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि अभिव्यक्तीला वाव देणाऱ्या फेसबुक सारख्या माध्यमाचाही वापर वाढत आहे. मात्र याचा 'कुच्चर ओटा' झालेला पाहून कधी कधी वाईट वाटतं.


व्हॉटसअपवर सकाळी सकाळी येणारे संदेश ही त्या कंपनीसाठीच नव्हे तर सर्वांसाठी डोकेदुखी ठरली आहे. नववर्षाच्या क्षणी अख्खं व्हॉटसअप हँग करायचा पराक्रम भारतीयांनी करुन दाखवला होता.

भारतात सर्वाधिक पीक कोणतं येतं ? या प्रश्नाचं उत्तर 'अफवांचं पीक ' असं द्यावं लागतं. तशा अफवा हा व्हॉटसअप मधील भल्या-बुऱ्यांच्या जत्रेत सतत येत असतात.

मात्र एक गोष्ट या माध्यमांनी चांगली केलीय डॉक्टर लोकांना शांततेने काम करता यायला लागलय. ओपीडी काढताना पेशंट म्हणून येणारे अधिक 'इम्पेशटपणे' माझा नंबर कधी येणार म्हणून त्रास द्यायचे. आता हे सारे पेशन्ट या नेटवर्कची मजा घेत शांततेने बसलेले दिसतात.

नाण्याच्या दोन बाजू तसं या माध्यमांच्याही. विनंती इतकीच की याला 'कुच्चर ओटा' करु नका.



- प्रशांत दैठणकर


9823199466

2 comments:

Unknown said...

Great

Anirudha Ashtaputre said...

मस्त लिहिलस प्रशांत
अष्टपुत्रे