Thursday, 3 November 2011

मी चांदभूल व्हावे ...!


          त्या मावळत्या सूर्याचं प्रतिबिंब घरातल्या आरशात पडलेलं आणि त्याची प्रभा घरभर पसरलेली. दिवसभर चैतन्याचा सूर आळवून रजा घेणारा दिनकर मला निराश भासत होता. पण त्याचंही मोठेपण कबूल करावं लागतं कुठलीही अपेक्षा न ठेवता तो आपली दिनचर्या पार पाडत असतो.
     त्या सूर्याचं प्रतिबिंब प्रत्येक तासाला वेगळं रुप दाखवणारं मन त्या रुपाकडे बघत कुठतरी विचारांच्या धारेत वहायला लागलं. खरच मलाही कधी असं जगता येणार आहे का, निरपेक्ष वृत्तीने निसर्गात मानव प्राणी सोडला तर सा-यांची जगण्याची वृत्ती ही निरपेक्ष आहे असं मला जाणवायला लागलं.
     काळ आपलं दळण दळत असतो त्याबर हुकुम ऋतू येतात आणि जातात. नभ त्यांच्या क्षमतेने पूर्ण बरसून सर्वार्थानं रिते होवून या धरतीला आयुष्याचं दान देवून जातात. मग ही धरती देखील रोज मानवाने पायाखाली तुडवली म्हणून न रागावता आपले पणानं पेरल्या बियांमधून धान्य देते. आपल्या उदरातून साठवलेलं पाणी देते.तिला काहीच मागावं असं वाटत नसेल का ? इतक्या निरपेक्ष वृत्तीने मलाही कधी जगता येइल का ?
     विचार आणि त्याचं वर्तुळ याचा भोवरा होवून मन त्यात गरा-गरा फिरायला लागतं. नभीचा तो चंद्र... बालपणीचा चंदामामा, चांदोबा मोठेपणी नातं बदलून आपण त्या चांदण्या रात्रीत फिरताना त्याला वेगळं स्थान दिलं. तो प्रितीचं प्रतिक झालेला. अन् चंद्र आहे साक्षीला असं आळवत आपण तिच्यासवे घराच्या टेरेसवर मारलेल्या चकरा, तिचं ते हळूवारपणे चाललेलं प्रणयाचं गीत  ` चांदण्यात फिरताना माझा धरलास हात ... सखया रे आवर ही सावर ही चांदरात.... ते चंदेरी लेणं मनसोक्त प्रकाशाचं धरतीवर सांडणं... असं मनसोक्त प्रेम ओतायला जमेल का ? समजा ते जमलं तर सगळ्यांना ते रुचेल का...
      चांद रात येते आणि जाते नाही म्हणायला रात्रीच्या त्या सावल्यांच्या खेळाला एका आमावस्येच्या दिवसाचा अडसर असतोच ना. कसं दिवसा नाही बघता आलं तर रात्री बघावं जगून.. रात्र जागत जागत बिछान्यावर तळमळत संपता संपत नाही असं नेहमीच का होतं ? पुन्हा प्रश्नांचं मनात पाझरणं सूरुच राहातं.
     मनातल्या या आंदोलनातून मग शब्द नकळतपणे मनाच्या टोकापासून बाहेर पडतात.
              मी सूर्य फूल व्हावे
              मी चांद भूल व्हावे
              वाटे प्रिये मला मी
              आयुष्य धुंद हे जगावे
          काव्य सुरु होतं ते न संपण्यासाठी अन् मन पुन्हा वेगानं आतल्या मनाचा वेध घेत विचारत रहातं.. असं मुक्त छंदातलं यमक आयुष्यात कधी जुळणार माझ्या... !

No comments: